नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक कमालीचे आक्रमक झाले असताना, सत्ताधाऱ्यांच्या आसनांवर शांतता होती. कामकाजाच्या सकाळच्या सत्रामध्ये सभागृहांमध्ये एकही वरिष्ठ केंद्रीय मंत्री उपस्थित नव्हता. विरोधकांच्या गदारोळात दोन्ही सभागृहे तहकूब झाली.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या संसदेच्या कक्षामध्ये सकाळी अकरा वाजता बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्रीयमंत्री अमित शहा, एस. जयशंकर, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान, किरेन रिजीजू, अर्जुनराम मेघवाल आदी सहभागी झाले होते. त्यामुळे मंगळवारी संसदेच्या सभागृहांचे कामकाज सुरू झाले तरी, हे वरिष्ठ नेते गैरहजर होते. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अधिवेशनाचे कामकाज वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले होते.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, ‘ऑपरेशन सिंदूर’ व बिहारमधील मतदार फेरतपासणीच्या मुद्द्यांवर काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीचे सदस्य लोकसभाध्यक्षांच्या समोरील जागेत येऊन प्रचंड घोषणाबाजी करत होते. या गोंधळात सभागृहाचे कामकाज काही मिनिटांत तहकूब करण्यात आले. त्यानंतर १२ वाजेपर्यंत व नंतर २ वाजेपर्यंत लोकसभा तहकूब केली गेली. त्यानंतरही गोंधळ न संपल्याने लोकसभा व राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब केली गेली.
नड्डांचा इशारा कोणाकडे?
राज्यसभेत सोमवारी विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्यासाठी नियम २६७ अंतर्गत नोटीस दिली होती. त्यावरून खरगे व सभागृहनेते जे. पी. नड्डा यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. ‘‘आम्ही जे सांगू त्याचीच कामकाजाच्या इतिवृत्तांतामध्ये नोंद होईल,’’ असे नड्डांनी ठणकावून सांगितले होते. नड्डांनी अप्रत्यक्षपणे धनखडांनाच इशारा दिल्याचे मानले गेले. पण, विरोधकांचा हा आरोप नड्डा यांनी मंगळवारी फेटाळून स्वत:चा बचाव केला.
आम्ही अनभिज्ञ!
संसदेचे कामकाज तहकूब होत असल्यामुळे दोन्ही सभागृहांतील खासदार लॉबीमध्ये ये-जा करत होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांना धनखड यांच्या राजीनामानाट्यामागील कारणांची चौकशी करत होते. मात्र, आम्हाला यासंदर्भात काहीही माहिती नाही, असे सांगून भाजपचे खासदार या मुद्द्यापासून स्वत:ला अलिप्त होताना पाहायला मिळाले. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा असेल तर त्यावरून राजकारण करणे योग्य नाही, असेही काही खासदारांचे म्हणणे होते.