नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) कधी काळी ‘माकप’ची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘एसएफआय’चे आक्रमक नेता राहिलेले आणि त्यानंतर पश्चिम बंगालमधील प्रमुख अर्थतज्ज्ञांपैकी एक अशी ओळख असलेले प्रसेनजीत बोस यांनी काँग्रेसबरोबर जाणे पसंत केले आहे. दशकभराच्या वनवासानंतर बोस राजकारणात सक्रिय झाले आहेत.
‘माकप’च्या पॉलिटब्युरोचे सदस्य राहिलेले बोस हे कडवे काँग्रेसविरोधक होते. काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना ‘माकप’ने पाठिंबा दिल्यानंतर बोस यांनी स्वत:च्याच पक्षावर कठोर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते, पण ‘माकप’च्या पॉलिटब्युरोने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे २०१२ पासून बोस राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे राजकीय विचारांशी सहमत असल्याचे सांगत बोस यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे रविवारी जाहीर केले होते. देशाच्या संविधानावर सातत्याने हल्ला होत असताना फक्त काँग्रेस व राहुल गांधी त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करत आहेत, असे बोस यांचे म्हणणे आहे. इतकी वर्षे काँग्रेसला विरोध केल्यानंतर त्याच पक्षाचा बोस यांनी राजकारणासाठी आधार घेतला आहे.
‘जेएनयू’ ते काँग्रेस
‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटना आणि निवडणुकांमध्ये सक्रिय राहिलेले अनेक नेते काँग्रेसमध्ये गेले. सुरुवातीच्या काळात ‘एसएफआय’मध्ये असलेले नासीर हुसेन, भाकपची विद्यार्थी संघटना ‘एआयएसएफ’मध्ये राहिलेले कन्हैय्या कुमार हे दोघेही आता काँग्रेसमध्ये आहेत. दोघेही ‘जेएनयू’ची विद्यार्थी संघटनांची निवडणूक जिंकून ‘जेएनयूएसयू’चे अध्यक्ष झाले होते. आता हुसेन काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य आहेत, तर, कन्हैया कुमार काँग्रेसची विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’चे प्रभारी आहेत.