Sonam Wangchuk Arrested: लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंदोलन झाले होते. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी हिंसक संघर्ष झाला होता. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू आणि ८० जण जखमी झाले होते. सरकारने या हिंसाचारासाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले असून, आज त्यांना लडाख पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी कठोर भूमिका घेत, सोनम वांगचुक यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखचा FCRA परवाना तात्काळ रद्द केला होता.
सोनम वांगचुक यांना आंदोलनादरम्यान हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, जेव्हा आंदोलक हिंसक झाले तेव्हा सोनम वांगचुक यांनी कोणालाही रोखले नाही. ते आंदोलनस्थळावरून शांतपणे निघून गेले.
शिवाय, त्यांची काही विधाने देखील हिंसाचाराचे कारण मानली जात आहेत. दरम्यान, सोनम वांगचुक यांनी अटकेपूर्वी अटकेची भीती व्यक्त केली होती आणि लडाखसाठी आवाज उठवल्यामुळे अटक होत असेल तर त्यांना आनंद होईल असे म्हटले होते.
सोनम वांगचुक यांनी म्हटले होते की, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे जर अटक झाली तर त्यांना आनंद होईल. एनडीटीव्हीशी बोलताना वांगचुक म्हणाले, “मी अटकेसाठी तयार आहे. मी त्यापलीकडे विचार करत आहे. मला कोणत्याही भ्रमात राहायचे नाही. जर मला अटक झाली तर लोकांना देश कसा चालवला जात आहे याची जाणीव होईल.” त्यांनी सांगितले की आमच्या मागण्या लडाख आणि देशाच्या हिताच्या आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी म्हटले होते की, लडाखमध्ये झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीसाठी वांगचुक यांनी नेपाळमधील जेन झेडच्या आंदोलनाचा दिलेला संदर्भ जबाबदार आहे. वांगचुक यांनी आरोप केला की सरकार त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी हा खटला रचत आहे.
हिंसाचारानंतर एक्सवर केलेल्या व्हिडिओमध्ये वागचुक म्हणाले होते की, “हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. काही लोकांना वाटते की ते आमचे समर्थक आहेत. पण, संपूर्ण लेह आमचे समर्थक आहे. हा तरुणांचा राग आहे, ही जेन झेड क्रांती आहे. ते गेल्या पाच वर्षांपासून बेरोजगार आहेत. त्यांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. मी नेहमीच म्हणतो की, तरुणांना बेरोजगार ठेवणे आणि त्यांचे लोकशाही अधिकार हिरावून घेणे सामाजिक अशांततेचे कारण आहे.”