Kay Kay Menon In Congress Vote Chori Video: काँग्रेस पक्षाच्या “मत चोरी” विरोधातील मोहिमेचे समर्थन करतानाचा एक कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेता के. के. मेनन यांनी काँग्रेस पक्षाच्या “व्होट चोरी” विरोधातील मोहिमेत कोणतीही भूमिका नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर होणाऱ्या क्लिपवर के. के. मेनन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
याबाबत बोलताना के. के. मेनन म्हणाले की, त्यांनी असा कोणताही व्हिडिओ केलेला नाही. त्यांची क्लिप परवानगीशिवाय वापरण्यात आली आहे. ही क्लिप काँग्रेसच्या ‘मत चोरी’ मोहिमेतील आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला के. के. मेनन लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. हे पाहून असे वाटते की, त्यांनी काँग्रेसच्या या जाहिरातीत अभिनय केला आहे.
व्हिडिओबात के. के. मेनन काय म्हणाले?
व्हायरल क्लिपच्या कमेंट सेक्शनमध्ये के. के. मेनन यांनी लिहिले की, “कृपया हे लक्षात घ्या की, मी या जाहिरातीत कोणत्याही प्रकारे काम केलेले नाही. माझ्या स्पेशल ऑप्स च्या प्रमोशनमधील एक क्लिप कोणत्याही परवानगीशिवाय एडिट करून वापरण्यात आली आहे.”
व्हिडिओत काय आहे?
इंडियन नॅशनल काँग्रेसच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये केके मेनन म्हणतात, “अरे मित्रांनो थांबा. जर तुम्ही ही रील पाहत असाल तर स्क्रोल करणे थांबवा.” त्यानंतर दुसरा एक व्यक्ती येतो आणि म्हणतो, “तुम्ही मत चोरीविरुद्धच्या मोहिमेत सहभागी होत नाही आहात. अरे, आता जा, बायोमध्ये एक लिंक आहे, त्यात फॉर्म भरा. कॅप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा. तुमचा आवाज उठवा. तुमचे मत चोरीला जाण्यापासून वाचवा.”
दरम्यान इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हिम्मत सिंह काहीतरी सांगत आहेत. ते लवकर ऐका.” त्याच पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये के. के. मेनन यांनी लिहिले आहे की, ही क्लिप त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आली आहे.
काय आहे मतचोरी विरोधातील मोहीम?
काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेत आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणूकीत गैरप्रकार झाल्याचे म्हणात मतचोरीचे आरोप केले होते. यानंतर काँग्रेस पक्षाने एक वेब पेज सुरू केले आहे आणि मत चोरीची निवडणूक आयोगाने जबाबदारी घ्यावी असे म्हटले आहे. या व्हिडिओमध्येही पक्ष नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.