पीटीआय, नवी दिल्ली
मुंबईमधील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी गुंड छोटा राजनला मंजूर करण्यात आलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. २००१च्या या गुन्ह्यासाठी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी २३ ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.
न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सीबाआयचे अपील मान्य केले. छोटा राजनचा जामीन रद्द करताना तो गेल्या २७ वर्षांपासून फरार असून चार खटल्यांमध्ये दोषी असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच अशा माणसाची शिक्षा का थांबवायची असा प्रश्न न्यायालयाने विचारला. राजनविरोधात कोणताही पुरावा नाही असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.
त्याच्याविरोधात ७१ खटले असून त्यापैकी सीबीआयला ४७ खटल्यांमध्ये कोणताही पुरावा सापडलेला नाही आणि त्यांनी ती प्रकरणे बंद केली आहेत, असे राजनच्या वकिलांनी सांगितले. मात्र, ते न्यायालयाने अमान्य केले. सीबीआयची बाजू अतिरिक्त महान्यायअभिकर्ता एस व्ही राजू यांनी मांडली.