Supreme Court refuses to entertain plea seeking SIT probe into Rahul Gandhi vote chori allegations : सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘वोट चोरी’च्या आरोपासंदर्भातील याचिका सोमवारी फेटाळून लावली आहे. या याचिकेत बेंगळूरू मध्य मतदारसंघातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.

न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते रोहित पांडे यांना त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) जाण्यास सांगितले आहे.

या याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने म्हटले, “आम्ही याचिकाकर्त्याच्या वकिलांचे म्हणणे ऐकले आहे. कथितपणे सार्वजनिक हितासाठी दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी घेण्याकरिता आम्ही इच्छुक नाही. जर सल्ला दिला गेला असेल तर, याचिकाकर्ता निवडणूक आयोगाकडे (ECI) दाद मागू शकतो.”

स्वतंत्र तपासाची मागमी करत पांडे यांनी दावा केला होता की त्यांनी स्वतः काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी केली आहे आणि “प्रथमदर्शनी हे निश्चित करण्यासाठी पुरेसा आधार आढळून आला आहे” की ते “कायदेशीर मतांची किंमत कमी करण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न झाल्याचे उघड करतात, ज्यामुळे लोकांच्या व्यापक हितासाठी सन्माननीय न्यायालयाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.”

पांडे म्हणाले की, “त्यांना हजारो अवैध आणि बनावट नोंदी आढळल्या आहेत आणि हे घटनात्मक हमीच्या मुळावर घाव घालते आणि कलम ३२४ चे उल्लंघन करते.”

तसेच याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे असे निर्देश देण्याची विनंती केली की, मतदारयाद्यांची पुढची पडताळणी किंवा त्यांना अंतिम स्वरूप देण्याचे काम तोपर्यंत केले जाऊ नये जोपर्यंत स्वतंत्र ऑडिट पूर्ण केले जात नाही.

लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर ऑगस्ट महिन्यात निवडणूकांमध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकमधील बंगळूरू मध्य लोकसभा मतदारसंघात मत चोरी कोमत्या’पाच वेगवेगळ्या मार्गांनी’ करण्यात आली, याबद्दल माहिती दिली होती.

त्यांनी या आरोपांबरोबरच बंगळूरू मध्य मतदारसंघाचा भाग असलेल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने केलेल्या तपासातून आढळून आलेली माहिती देखील प्रसिद्ध केली होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने बंगळूरू मध्य मतदारसंघात ३२,७०७ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.