कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या निवडणुकीच्या अनुषंगाने आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), जनसेना पार्टी (जेएसपी) आणि भाजपा यांच्यातील जागावाटपाच्या सूत्रावर एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. लवकरच या तिन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी या तिन्ही पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक झाली. त्यानंतर जागावाटपाच्या सूत्रावर एकमत झाल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशमध्ये जनसेना पार्टी आणि भाजपा यांना लोकसभेच्या २४ जागांपैकी ८ जागा देण्यात आल्या आहेत. उर्वरित जागा या टीडीपी पक्षाला देण्यात येतील. आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १७५ जागांपैकी २८ ते ३२ जागा जनसेना पार्टी आणि भाजपाला देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
लवकरच अधिकृत युतीची घोषणा होणार
टीडीपीचे नेते किंजारापू अचानायडू यांनी विजयवाडा येथे या युतीवर भाष्य केले. या तिन्ही पक्षांत प्राथमिक चर्चा झालेली आहे. भाजपा, टीडीपी आणि जनसेना पार्टी या तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचे ठरवले आहे. लवकरच चंद्राबाबू नायडू हे भाजपाच्या नेत्यांना भेटणार आहेत. या भेटीत कोण कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे ठरवण्यात येईल. त्यानंतर कोण कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार याची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
टीडीपी, भाजपा, जनसेना पार्टीच्या नेत्यांची बैठक
शुक्रवारी टीडीपीचे नेते तथा राज्यसभेचे खासदार के रविंद्र कुमार यांनीदेखील या युतीवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणुकीत एकत्र काम करण्याचे या तिन्ही पक्षांनी ठरवले आहे, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही क्षणी या तिन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होऊ शकते. या युतीबाबत टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बैठक झाली होती. या बैठकीत जनसेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण हेदेखील सहभागी होते.