Tejashwi Yadav : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं, तर विरोधी महाआघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. खरं तर बिहारच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने ८९, जदयूने ८५, लोजपाने (रामविलास) १९ जागा जिंकल्या असून एनडीएने एकूण २०२ जागा जिंकत बिहारमध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे. मात्र, विरोधकांना अपयशाला सामोरं जावं लागल्यामुळे मोठा धक्का बसला.
दरम्यान, बिहारच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तेजस्वी यादव यांच्या राजदची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राजदच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडणुकीतील पराभवाबाबत भाष्य करत पराभवाचं दुःख नाही आणि विजयाचा अभिमान नाही, तसेच आमचा गरिबांचा पक्ष असून गरिबांसाठी आवाज उठवत राहील असं म्हटलं आहे.
राजदची पहिली प्रतिक्रिया काय?
“सार्वजनिक सेवा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, एक अंतहीन प्रवास आहे. चढ-उतार येणारच. पराभवाचं दुःख नाही आणि विजयाचा अभिमान नाही. राष्ट्रीय जनता दल हा गरिबांचा पक्ष आहे आणि गरिबांसाठी आवाज उठवत राहील”, अशी प्रतिक्रिया राजद पक्षाने एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये दिली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारच्या निवडणुकीत विरोधकांच्या महाआघाडीला आलेल्या अपयशाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मी बिहारच्या कोट्यवधी मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. आम्ही एका अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही, जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल आणि लोकशाही वाचवण्याचे आपले प्रयत्न अधिक प्रभावी करेल”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
बिहार निवडणुकीबाबत शरद पवार काय म्हणाले?
“बिहारच्या निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो तेव्हा मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत मतदान महिलांनी हातामध्ये घेतलं होतं. ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला, याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा. महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले, म्हणजे प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्या वतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले, म्हणजे लाडकी बहीण योजना”, असं शरद पवार म्हणाले.
“आता प्रश्न असा आहे की यापुढे होणाऱ्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे, तसेच निवडणूक आयोगानेही याचा गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. १० हजार रुपये देणं, ही रक्कम काही लहान नाही. त्यामुळे निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतात का? याबाबत लोकांच्या मनात नक्की शंका आहेत आणि याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे”, असं शरद पवारांनी म्हटलं.
