लोकसभेत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आल्यापासून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. सभागृहातील प्रचंड गदारोळातही मोदींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेत तुफान चर्चा झडत आहेत. राहुल गांधींचं कालचं (१ जुलै) भाषण प्रचंड चर्चेत राहिलं. आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर नरेंद्र मोदी बोलत आहेत. परंतु, त्यांना आज सभागृहात बोलूच दिलं जात नाहीय. मोदी सभागृहात येताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. तसंच, मोदींनी भाषणाला सुरुवात करताच विरोधकांचा गोंधळ वाढू लागला. हा गोंधळ इतका होता की मोदींना भाषण अर्धवट सोडून खाली बसावं लागलं.

मोदींनी भाषण अर्धवट थांबवल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना समज दिली. तुम्हाला हे शोभत नाही, तुमच्यामुळे संसदेची गरिमा डागाळते आहे, असं म्हणत ओम बिर्ला यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शांत राहण्याची तंबी दिली. परंतु, विरोधक ऐकायला तयार नाहीत. विरोधकांनी शांत बसणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर मोदींनी विरोधकांकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा भाषणाला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत दोनवेळा भाषण थांबवून पुन्हा भाषणाला सुरुवात केली आहे.

मोदींनी विरोधकांना डावलून भाषणाला सुरुवात केल्याने विरोधक अधिकच संतापले. त्यांनी पूर्वीपेक्षा मोठ्या आवाजाने घोषणाबाजी करायला सुरुवात केली. मोदींचं भाषण सुरू असतानाच मागून मणिपूर मणिपूरच्या घोषणा ऐकू येत आहेत. आम्हाला न्याय हवाय, हुकुमशाही बंद करा अशी घोषणाबाजी लोकसभेत ऐकू येत आहे. या गोंधळाच्या वातावरणातही नरेंद्र मोदींनी भाषण सुरू ठेवलं. मोदींनी भाषण सुरुच ठेवल्याने भारत छोडोच्याही घोषणा विरोधकांनी केल्या.

दरम्यान, मणिपूरचं नाव ऐकताच मोदींना तहान लागते अशी टीकाही काँग्रेसने त्यांच्या एक्स खात्यावरून केली आहे.

गदारोळातच मोदींनी नव्या खासदारांचं अभिनंदन आणि स्वागत केलं. भारताच्या पुढील लक्ष्याविषयी माहिती दिली. आतापर्यंत आणलेल्या योजनांची माहिती दिली.

मोदींचा काँग्रेसवर निशाणा

दरम्यान, विरोधकांनी गोंधळ घातलेला असतानाही मोदींनी काँग्रेसविरोधातही भाषण केलं. काँग्रेसने गेल्या तीन निवडणुकांमध्येही १०० जागाही निवडू शकली नाही. त्यांनी पराभव स्वीकारून आत्मचिंतन केलं असतं तर चांगलं असतं. पण ते शीर्सासन करत आहेत. काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम दिवसरात्र वीज चालवून भारताच्या नागरिकांच्या मनात हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांनी आम्हाला हरवलं आहे.

हेही वाचा >> मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका, “बेशरमपणे हे मान्य केलं जायचं की १ रुपयातले ८५ पैसे…”

काय म्हणाले नरेंद्र मोदी

“पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर जे प्रतिनिधी आले आहेत आणि त्यांनी जे विचार व्यक्त केले. या सगळ्यांनी नियमांचं पालन करुन भाषणं केली आणि विचार मांडले. पहिल्यांदा निवडून येऊनही खासदार म्हणून भाषण करताना त्यांनी लोकसभेचा सन्मान वाढवला” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “देशात एक उत्तम निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामुळे जगासमोर हे उदाहरण ठेवलं गेलं की हे जगातला सर्वात मोठा निवडणूक कार्यक्रम भारतात झाला. मी काही लोकांची वेदना समजू शकतो. कारण वारंवार खोटं बोलूनही त्यांचा पराभव झाला. आम्हाला भारताच्या जनतेने देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही बाब लोकशाही मानणाऱ्या आपल्या देशासाठी महत्त्वाची घटना आहे. हा लोकशाहीचा गौरव आहे.” असं मोदी या गदारोळात म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The prime ministers speech and the confusion of the opposition this scene in the lok sabha made president rahul gandhi angry sgk
Show comments