भारताने २० व्या शतकामध्ये केलेल्या चुका २१ व्या शतकात सुधारल्या जात आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचं (एएमयू) नाव बदलून राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाने ठेवण्याची मागणी भारतीय जनता पार्टीची मागणी असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाने एएमयूच्या बाजूलाच तयार होणाऱ्या नवीन विद्यापिठाचं भूमिपूजन केलं. तसेच मोदींनी अलिगढमध्ये उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडोअर आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रतिकृतीचं अनावरणही केलं. यावेळी शस्त्रनिर्मितीसंदर्भात भाष्य करताना मोदींनी भारतामध्ये आज ग्रेनेडपासून युद्धनौकांपर्यंत सर्वकाही तयार केलं जात असल्याचं सांगितलं. यावेळी मोदींनी यापूर्वी उत्तर प्रदेश कसा होता आणि आता कसा आहे याबद्दल भाष्य केलं आहे. मोदींनी या भाषणामधून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला आज हे पाहून फार आनंद होतो की ज्या उत्तर प्रदेशला देशातील विकासाच्या मार्गातील अडथळा समजलं जायचं तेच उत्तर प्रदेश राज्य आज देशातील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये देशाचं नेतृत्व करत आहे. पूर्वी येथे कशापद्धतीचे घोटाळे केले जायचे हे उत्तर प्रदेशमधील जनता विसरु शकणार नाही. आज कशाप्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय हे सर्वांना माहितीय. योगी सरकार संपूर्ण निष्ठेने उत्तर प्रदेशच्या विकासाठी काम करत आहे. एक काळ असा होता जेव्हा शासन आणि प्रशासनामध्ये गुंड आणि माफियांची मनमानी चालायची. मात्र आता वसूली करणारे आणि माफियाराज चालवणारे तुरुंगात आहेत,” असं म्हणत मोदींनी राज्यातील कायदा सुव्यवस्था योगी सरकारच्या सक्षम हातात असल्याचं म्हटलं आहे.

शस्त्र उद्योगाबद्दल भाष्य आणि योगी सरकारचं कौतुक

“आज देशच नाही तर संपूर्ण जग हे पाहत आहे की अत्याधुनिक ग्रेनेड आणि रायफल्सपासून लढाऊ विमाने, ड्रोन आणि युद्धनौका भारत स्वत: बनवत आहे. सुरक्षेसंदर्भातील सर्वात मोठा आयात करणारा देश ही आपली ओळख बदलून भारत हीच यंत्रणा निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,” असं म्हणत मोदींनी भारतामधील शस्त्रनिर्मितीसंदर्भातील उद्योग वाढत असल्याचं सांगितलं. कालपर्यंत टाळे निर्मितीसाठी ओळखलं जाणार अलिगढ आधी घर, दुकानांचं संरक्षण करायचं आज २१ व्या शतकामध्ये ते भारताच्या सीमांचं रक्षण करणार आहे. एक जिल्हा एक प्रकल्प या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारने टाळे आणि हार्डवेअर निर्मितीमध्ये अलिगढला एक वेगळी ओळख मिळवून दिलीय, असं म्हणत मोदींनी राज्यात सत्तेत असणाऱ्या योगी सरकारचंही कौतुक केलं आहे. उत्तर प्रदेश आज देश आणि जगभरातील लहान मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करणारं राज्य ठरत आहे. गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण निर्माण केलं जातं, आवश्यक सुविधा मिळतात तेव्हा हे शक्य होतं. आज उत्तर प्रदेशमधील डबल इंजिनचं सराकर हे दुप्पट विकासाचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगत मोदींनी राज्य सरकारची पाठ थोपटली.

कल्याण सिंह यांची आठवण काढली

“आजचा दिवस पश्चिम उत्तर प्रदेशसाठी फार मोठा दिवस आहे. आपले असे संस्कार आहेत की एखादं शुभ कार्य असेल तर मोठ्यांचं स्मरण केलं जातं. आज मला कल्याण सिंहजी यांची फार आठवण येत आहे. आज कल्याण सिंह आपल्यासोबत असते तर विद्यापीठ आणि डिफेन्स कॉरिडोअर पाहून फार समाधानी झाले असते. त्यांची आत्मा जिथे कुठे असेल तिथून ते आपल्याला आशीर्वाद देत असतील हे नक्की,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

प्रकल्पांच्या कामाला वेग दिला जात आहे

“आपली इच्छाशक्ती, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यासाठी काहीही करण्याची शिकवण आपल्याला राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्याकडून मिळते. त्यांना भारतासाठी स्वातंत्र्य हवं होतं आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण या कामासाठी खर्च केला,” असंही मोदी म्हणाले. “आज देश आपल्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असतानाच अशा प्रकल्पांच्या कामाला वेग दिला जात आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी दिलेलं योगदानानिमित्त त्यांना नमन करण्याची संधी या कार्यक्रमाच्यानिमित्ताने मिळालीय. राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाने सुरु होणाऱ्या विद्यापीठाचं भूमिपूजन करण्याचा मान मला मिळाला हे माझं सौभाग्य आहे,” असंही मोदींनी म्हटलं आहे. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उप मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री दिनेश शर्मा उपस्थित होते.

अटल बिहारी वाजपेयी यांना पराभूत करणारे महेंद्र प्रताप सिंह

स्वातंत्र्य सैनिक असणारे महेंद्र प्रताप सिंह हे अलिगढ मुस्लीम विद्यापिठाचे विद्यार्थी होती. १९१५ साली काबूलमध्ये स्थापन करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या प्रोव्हिजनल सरकारचे ते राष्ट्रपती होते. मुरसान राज कुटुबाशी संबंध असणाऱ्या राजा यांनी १९१४ मध्ये कुटुंबासहीत अलिगढ सोडलं आणि ३३ वर्ष जर्मनीमध्ये वास्तव्य केलं. १९४७ साली ते भारतात परतले. १९५७ साली त्यांनी मथुरामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली आणि जनसंघाचे उमेदवार असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांना पराभूत करुन खासदार झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was a time when the administration was run by goons now such people are behind the bars pm modi in aligarh scsg