Priyanka Chaturvedi Slams BCCI And Central Government: पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. यानंतर अफगाणिस्तानने पुढील महिन्यात होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी क्रिकेट मालिकेतून माघार घेतली आहे. अफगाणिस्तानच्या या निर्णयाचा दाखला देत शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बीसीसीआय आणि केंद्र सरकारला खेळांपेक्षा देशाला कसे प्राधान्य द्यायचे याबाबत अफगाणिस्तानकडून शिकण्याचे आवाहन केले आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. अशात गेल्या महिन्यात झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, यासाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) भूमिका घेतली होती. तरीही भारत आणि पाकिस्तानमध्ये या स्पर्धेत तीन सामने खेळले गेले. त्यावर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

अफगाणिस्तानच्या तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा पाकिस्तानी हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्यांचा कर्णधार रशीद खानने एक्सवर एका पोस्टमध्ये पाकिस्तानवर टीका केली व अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत सहभागी न होण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

रशीद खानच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, “पाकिस्तानचे सत्ताधारी हे भ्याड लोकांचे एक टोळके आहे, जे निरपराध लोकांच्या रक्तावर जगते आणि सीमेवर सातत्याने मार खाते. त्यांना लाज वाटली पाहिजे.”

त्या पुढे म्हणाल्या, “अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने पाकिस्तानबरोबरची मालिका रद्द केली हे पाहून आनंद वाटला. कदाचित बीसीसीआय आणि केंद्र सरकारने देशाला खेळापेक्षा कसे प्राधान्य द्यायचे, हे त्यांच्याकडून शिकायला हवे.”

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने या “क्रूर” हवाई हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्याने तिरंगी मालिकेतून माघार घेण्याच्या अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे.

रशीद खान आपल्या पोस्टमध्ये म्हणाला की, “पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक नागरिकांचे मृत्यू झाल्याने मी दु:खी आहे. या हल्ल्यात महिला, मुले आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे.”

“निष्पाप जीव गमावल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानविरुद्धच्या आगामी क्रिकेट सामन्यांमधून माघार घेण्याच्या एसीबीच्या निर्णयाला माझा पाठींबा आहे. या कठीण काळात मी आमच्या नागरिकांसोबत आहे, आपली राष्ट्रीय प्रतिष्ठा महत्त्वाची आहे”, असे रशीद खानने पुढे म्हटले आहे.