भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी तृणमूलच्या एका मंत्रीमहोदयांनी वादग्रस्त विधान केलं असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रपतींच्या पदाचा आदर, मान-सन्मान हा राखला गेलाच पाहिजे, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून या विधानाचा समाचार घेतला जात असून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनाही लक्ष्य केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं घडलं काय?

पश्चिम बंगाल मंत्रीमंडळातील एक मंत्री आणि तृणमूलचे नेते अखिल गिरी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात उपस्थितांशी चर्चा करताना हे वक्तव्य केलं आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार सुवेंदू अधिकारी यांच्यावर टीका करताना अखिल गिरी यांची जीभ घसरली आणि त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींविषयी हे वादग्रस्त विधान केलं.

“सुवेंदू अधिकारी म्हणतात मी चांगला दिसत नाही. मग तुम्ही किती सुंदर दिसता? आपण कुणाचंही परीक्षण त्यांच्या दिसण्यावरून करत नाही. आपण देशाच्या राष्ट्रपतींचा नक्कीच सन्मान करतो. पण आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?” असा प्रश्न उपस्थित करून गिरी उपस्थितांकडे बघून हसू लागले. ते पाहून उपस्थितांमधील काही लोकही हसू लागले.

विश्लेषण: एक राष्ट्र, एक निवडणूक प्रत्यक्षात येणार का?

सुवेंदू अधिकारी यांच्यावरही टीका

दरम्यान, यावेळी अखिल गिरी यांनी सुवेंदू अधिकारी यांना उद्देशूनही टीका केली. “सुवेंदू अधिकारी मला चड्डीतला मंत्री म्हणतात. जर मी चड्डीतला मंत्री आहे, तर मग तुमचे वडील कोण होते? अंडरवेअर मंत्री? माझ्या विभागात माझ्यावर कोणताही मंत्री नाही. पण तुमच्या वडिलांना त्यांच्यावर मंत्री होते. सुवेंदू अधिकारी महिलांना म्हणतात की ‘मला स्पर्श करू नका’. त्यांना महिलांनी स्पर्श केला तर काय होईल?” असा खोचक प्रश्नही गिरी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या विधानाचा भाजपानं समाचार घेतला आहे. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातल्या आहेत. अखिल गिरी यांनी त्यांच्याविषयी दुसऱ्या एका मंत्र्याच्या उपस्थितीत आक्षेपार्ह विधान केलं. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस हे आदिवासीविरोधी आहेत”, अशी टीका पश्चिम बंगाल भाजपानं आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc minister akhil giri controversial statement president draupadi murmu look pmw