Donald Trump on Nuclear Power: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा अण्वस्त्रांवर भाष्य केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी ‘अण्वस्त्र प्रसारबंदी’ (Denuclearization) वर त्यांनी चर्चा केली. जगभरात ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत त्यांनी तात्काळ ते कमी केले पाहिजेत, अण्वस्त्र अनावश्यक आणि घातक आहेत, असेही ते म्हणाले. तसेच आमच्याकडे इतके अण्वस्त्र आहेत की, आम्ही जगाला १५० वेळा उडवू शकतो, असेही ते म्हणाले.

व्हाईट हाऊसमध्ये अण्वस्त्र बंदीबाबत बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली. ते म्हणाले, “जगात सर्वाधिक अण्वस्त्रांच्या बाबतीत आम्ही प्रथम स्थानावर आहोत, त्यानंतर रशिया दुसऱ्या स्थानावर आणि तिसऱ्या स्थानावर चीन आहे. पण गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि चीनही शस्त्र विकसित करण्यासाठी वेगाने काम करत आहे.”

मला जगात शांतता हवी

आम्ही पुन्हा अण्वस्त्र चाचण्या सुरू करू, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यातच सांगितले होते. पेटांगॉनला अण्वस्त्र चाचण्या घेण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले होते. इतर देश अशाप्रकारच्या चाचण्या करत आहेत. जर ते चाचण्या करणार असतील तर आम्हीही त्या करू.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दक्षिण कोरिया येथे भेटण्याच्या काही वेळ आधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, त्यांनी पेंटागॉनला समान आधारावर (on an equal basis) अणुचाचण्या सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत आणि ही प्रक्रिया तात्काळ सुरू होईल.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी (५ नोव्हेंबर) म्हटले होते की, जर अमेरिकेने अणुचाचण्या पुन्हा सुरू केल्या तर रशिया देखील त्याबाबत विचार करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इतर देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत असा दावा पुन्हा एकदा केला होता. त्यांचा दावा आहे की पाकिस्तान, उत्तर कोरिया, चीन आणि रशिया हे देश गुप्तपणे भूमिगत अणुचाचण्या करत आहेत आणि म्हणून अमेरिका देखील अणुचाचण्या सुरू करेल.

जगाला१५० वेळा उडविण्याची आमची क्षमता

अणुचाचण्यांची चर्चा सर्वच देश करत असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचे आवाहन केले आहे. पुतिन आणि जिनपिंग यांच्याशीही हीच चर्चा केली असल्याचे ते म्हणाले. अण्वस्त्र संचारबंदीचे धोरण महत्त्वाचे आहे. कारण आमच्याकडे इतके अण्वस्त्र आहेत की, आम्ही जगाला १५० वेळा उडवू शकतो.