Video Of New York Flood: सोमवारी रात्री अमेरिकेच्या ईशान्येकडील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. यामध्ये न्यू यॉर्क शहराचाही समावेश होता. या पावसामुळे अनेक शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, सबवे बुडाले आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला. याचबरोबर अनेक विमानांच्या उड्डाणांना बराच विलंब झाला.
सोमवारी संध्याकाळपर्यंत न्यू यॉर्क, वॉशिंग्टन डी.सी., बाल्टिमोर, नेवार्क, न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया यांसारख्या अनेक भागांत पूरस्थिती आणि सतर्कतेचे इशारे जारी करण्यात आले होते. दरम्यान, सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमध्ये मुसळधार पावसामुळे तेथे निर्माण झालेली परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सोमवारी संध्याकाळी स्टेटन आयलंड आणि मॅनहॅटनच्या काही भागांत वादळासह एक इंचापेक्षा अधिक पाऊस पडला असून रात्री आणखी पावसाची शक्यता असल्याने, राष्ट्रीय हवामान सेवेने न्यू यॉर्क शहरातील पाचही प्रशासकीय विभागांत पूराचे इशारे जारी केले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये न्यू यॉर्क शहरात बचाव पथकांच्या मदतीने अनेक वाहने पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच, अनेक वाहने पाण्यात अडकलेली दिसत आहेत. पुराचे पाणी पेट्रोल पंप आणि सबवेमधून वाहत असून, ते अनेक वाहनांमध्ये घुसल्याचे दिसून येत आहे.
एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, खराब हवामानामुळे अमेरिकेत तब्बल १,९६६ उड्डाणे रद्द करण्यात आली असून, १०,००० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला आहे.
न्यू जर्सी, न्यू यॉर्क, पेनसिल्व्हेनिया आणि आसपासच्या भागांत मंद गतीने सरकणारे वादळ या प्रदेशातून पुढे सरकत असताना अचानक पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. न्यू जर्सीमध्ये गव्हर्नर फिल मर्फी यांनी अचानक पूर आणि मुसळधार पावसामुळे आणीबाणीची स्थिती जाहीर केली असून, लोकांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसून येते की, पुरामुळे न्यू जर्सीमधील स्कॉच प्लेन्स येथील एक प्रमुख रस्ता पाण्याखाली गेला असून, त्यामध्ये बसेस अडकल्या आहेत.