Bullet Train Update : भारतात पहिली हाय स्पीड बुलेट ट्रेन कधी धावणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. बुलेट ट्रेन कधी सुरु होईल, याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी शनिवारी सुरत बुलेट ट्रेन स्टेशनला भेट देत पाहणी केली. यावेळी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड बुलेट ट्रेन कधी धावणार? याविषयीची माहिती त्यांनी सांगितली.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा ५० किमीचा भाग गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा या दरम्यान २०२७ मध्ये सुरू होईल. तसेच २०२९ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुंबई आणि अहमदाबाद या दरम्यानचा संपूर्ण भाग कार्यान्वित होईल. जो दोन प्रमुख शहरांमधील अंतर फक्त दोन तास आणि सात मिनिटांत पूर्ण करेल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

बांधकाम सुरू असलेल्या सुरत बुलेट ट्रेन स्टेशनला भेट दिल्यानंतर आणि ट्रॅक बसवण्याच्या कामांची पाहणी करताना अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली. यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले की, “पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण प्रगती खूप चांगली आहे. सुरत ते बिलीमोरा दरम्यानच्या प्रकल्पाचा पहिला ५० किमीचा भाग २०२७ पर्यंत सुरु होईल. आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत. २०२८ पर्यंत ठाणे-अहमदाबाद विभाग सुरू होईल आणि २०२९ पर्यंत संपूर्ण मुंबई-अहमदाबाद विभाग सुरू होईल.”

रेल्वे मंत्री पुढे म्हणाले की, मुख्य मार्गाची वेग क्षमता ताशी ३२० किमी आणि रिंग रोड मार्गाची ८० किमी प्रतितास आहे. गाड्यांची सुरक्षित आणि कार्यक्षम हालचाल सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. गाड्यांची हालचाल खूपच गुंतागुंतीची आहे, त्यामुळे सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या ठिकाणी अनेक कंपन यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत. जेव्हा ट्रेन ३२० किमी प्रतितास वेगाने जात असेल तेव्हा युटिलिटी केबल कंपन घेईल. कोणत्याही कंपनांना शोषून घेण्यासाठी ट्रॅकमध्ये अनेक यंत्रणा ठेवण्यात आल्या आहेत. ट्रॅकवर खूप खास सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.”

रेल्वेमंत्र्यांनी असंही सांगितलं की, सुरत स्थानकाचं संपूर्ण जड काम पूर्ण झालं आहे. फिनिशिंग आणि युटिलिटी कामे सुरू आहेत. आज बुलेट ट्रेन प्रकल्पात सुरत स्थानकात पहिला टर्नआउट बसवण्यात आला आहे. टर्नआउट म्हणजे अशी जागा जिथे ट्रॅक जोडला जातो किंवा वेगळा होतो. येथे बरीच नवीन तंत्रज्ञाने वापरली गेली आहेत. उदाहरणार्थ, हे रोलर बेअरिंग ज्यावर ट्रॅक हलतील. ही पुन्हा एक पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान आहे, जी आम्ही वापरत आहोत. स्लीपर कंपोझिट मटेरियलपासून बनलेले आहेत”, असं ते म्हणाले.