Bhide Bridge History : पावसाळा आला की पुण्यात दोनच गोष्टी चर्चेत असतात, एक म्हणजे गरमा गरम मिसळ आणि दुसरे म्हणजे ‘भिडे पूल.’ असा क्वचितच कोणी पुणेकर असेल ज्याने पावसाळ्यात भिडे पुलाविषयी ऐकले नसेल. कारण पावसाळा आला की पुणेकरांना एकच प्रश्न पडतो, भिडे पूल पाण्याखाली गेला का? हा पूल पाण्याखाली गेला की दुचाकीस्वारांसाठी मोठी पंचाईत होते. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडला का की या पुलास भिडे पूल का म्हणतात? आणि हे नाव कसे पडले? लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात या पुलाच्या नावामागची गोष्ट सांगितली आहे.

बाबा भिडे कोण होते?

भिडे पूल हे नाव ज्यांच्या नावावरून दिले गेले ते होते बाबा भिडे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे बाबा भिडे कोण होते? बाबाराव भिडे यांचे पूर्ण नाव होते बळवंत नारायण भिडे. बाबाराव भिडे साताऱ्यातील माण तालुक्यातील सबनीसवाडी गावचे. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या भिडेंनी प्राथमिक शिक्षण साताऱ्यात घेतले. इ.स. १९२० मध्ये भिडे कुटुंब पुण्यात आल्यावर त्यांनी पुढील शिक्षण घेतले. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून इ.स. १९२३ मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. इ.स. १९२७ मध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली; तर इ.स.१९२९ साली एलएल.बी.ची पदवी घेऊन वकिलीस प्रारंभ केला.
सुरुवातीच्या काळात बाबाराव भिडे खडकी कोर्टात वकिली करायचे. ते फौजदारी आणि दिवाणी अशी दोन्ही प्रकारची कामे करायचे. पुढील काळात वकिलीत जम बसवून फक्त फौजदारीची कामे करून त्यांनी नाव गाजविले. पुण्याच्या इतिहासात फौजदारी वकिलीत त्यांचे स्थान वरचे होते. पुणे बार असोसिएशनचे ते अध्यक्षदेखील होते. वकिली ही समाजसेवा असे त्यांचे धोरण होते.

पाहा व्हिडीओ

या पुलास ‘भिडे पूल’ हे नाव कसे पडले?

इ.स. १९३८ साली सरसंघचालक डॉ. हेडगेवार पुण्यात आले होते तेव्हा बाबाराव भिडे यांचा प्रथम संघाशी संबंध आला. हवेली तालुका संघचालक म्हणून भिडेंनी इ.स. १९३८ ते १९४२ काम पाहिले. तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे जीवन संघरूपच राहिले. इ.स. १९६७ साली त्यांना महाराष्ट्र प्रांत संघचालक पदाची सूत्रे मिळाली. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. स्वतःची जमीन त्यांनी नाममात्र रुपयात शिक्षणसंस्थांना दिली होती. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी त्यांचा संबंध आला. अनेक ठिकाणची त्यांनी अध्यक्षपदे भूषविली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र दरारा होता. लोकमान्य टिळकांना ते आदर्श मानायचे. आणीबाणीच्या वेळेस त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला होता. ९ मे १९८३ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी नाशिकमध्ये त्यांचे निधन झाले.

शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. अशा या कै. ॲड. बाबाराव भिडे यांचे नाव महानगरपालिकेने पुण्यातील डेक्कन जिमखाना ते केळकर रस्त्यास जोडणाऱ्या मुठा नदीवरील पुलास दिले आहे. २४ जून २००० मध्ये पुलाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या पुलाची लांबी ८८ मीटर असून बांधकामास ८१ लाख रुपये खर्च आला होता.