शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरपूर रेकॉर्ड मोडले असले तरी प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपट आल्यानंतरही बऱ्याच लोकांनी चित्रपटावर टीका केली. चित्रपटाच्या कथानकाची तर्कहीन मांडणीमुळे बऱ्याच लोकांनी या चित्रपटाला ट्रोलही केलं. हा एक तद्दन मसालापट जरी असला तरी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर पडेल अशी एक गोष्टसुद्धा यात पाहायला मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पठाण’मध्ये शाहरुख खानच्या पात्राच्या तोंडी आलेल्या ‘किंत्सुगी’ या संकल्पनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. याबरोबरच ही संकल्पना उत्तमरित्या चित्रपटात मांडल्याने प्रेक्षकांनी त्याचं कौतुकही केलं आहे. पण नेमकं ‘किंत्सुगी’ ही संकल्पना आहे तरी काय? ‘पठाण’मध्ये त्याचा संदर्भ कुठे आणि कसा जोडण्यात आला आहे? त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘पठाण’ची ४०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; ‘केजीएफ २’ आणि ‘बाहुबली’चा रेकॉर्ड तोडण्यास किंग खान सज्ज

किंत्सुगी – एक जपानी कला :

किंत्सुगी हि एक प्राचीन जपानी कला आहे. मातीचं भांडं किंवा इतर कोणतीही वस्तु जेव्हा तुटते तेव्हा सोन्याच्या मदतीने ती गोष्ट पुन्हा जोडण्यात येते. पुन्हा जोडल्यावर त्या वस्तूवर सोन्याची खूण कायम राहते आणि त्यामुळेच ती वस्तु आधीपेक्षा अधिक मजबूत, टिकाऊ बनते. तुटलेल्या वस्तूला पुन्हा जोडण्याचा या जपानी कलेलाच किंत्सुगी म्हंटलं जातं. गेल्या ४०० वर्षांपासून ही कला जपानमध्ये अस्तित्त्वात आहे. तुटलेल्या गोष्टी पुन्हा जोडून त्या अधिक भक्कम किंवा मजबूत होतात असा या लोकांचा समज आहे.

किंत्सुगी – एक विचार :

अर्थात ही एक कला जरी असली तरी जपानी लोक या कलेकडे एक जीवनाला दिशा देणारा विचार म्हणून बघतात. जपानी संस्कृती आणि साहित्यात किंत्सुगीला प्रचंड महत्त्व आहे. जपानी लोक या कलेचा संबंध थेट आपल्या जीवनाशी जोडतात. त्यांच्यामते ही कला ज्या पद्धतीने तुटलेल्या गोष्टी पुन्हा जोडते तसंच तुम्हीसुद्धा तुमचं विस्कटलेलं आयुष्य पुन्हा जोडू शकता. आयुष्यात समस्यांचा सामना करताना आपण बऱ्याचदा आत्मविश्वास, हिंमत हरवून बसतो. तोच आत्मविश्वास आणि हिंमत जेव्हा पुन्हा मिळते तेव्हा आपण आधीपेक्षा अधिक सक्षम आणि खंबीर होतो.

किंत्सुगीचं ‘पठाण’ कनेक्शन :

‘पठाण’चित्रपटात शाहरुख खानचं पात्र त्याच्या बॉस नंदिनीला (डिंपल कपाडिया) या जपानी कलेबद्दल सांगतो. त्यामागचा ‘पठाण’चा उद्देश खूप चांगला असतो. ‘रॉ’ या गुप्तहेर संस्थेसाठी काम करणाऱ्या पण काही कारणास्तव सध्या या कामापासून दूर ठेवलेल्या किंवा निवृत्ती घ्यायला भाग पाडलेल्या एजंट्सना पुन्हा एकत्र आणून एक भक्कम टीम तयार करण्यासाठी शाहरुख खान ‘किंत्सुगी’ या कलेचा आधार घेतो. या कलेचा अर्थ सांगून तो यामागचा विचार आणि देशाच्या सुरक्षेसाठी एक उत्तम पर्याय आपल्यासमोर मांडताना दिसतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is connection between shahrukh khan pathaan film and kintsugi a japanese art form avn