पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आघाडीने २९३ जागा मिळवल्या आहेत. बहुमताचा आकडा पार केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या ७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर ८ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगभरातही चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या खूर्चीवर विराजमान होणार असल्याच्या वृत्तानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचं आज अभिनंदन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाने २४० जागा जिंकल्या. तर एनडीएतील मित्र पक्षांनी जिंकलेल्या जागांची गोळाबेरीज केल्यास २९३ जागा होत आहेत. त्यामुळे बहुमतासाठी लागणारा २७२ चा आकडा एनडीएने पार केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यामुळे जगभरातील नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूसह अनेक दिग्गज नेते आहेत. यात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे.

हेही वाचा >> विरोधात बसणार की सत्तेत येणार? इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले…

भाजपा, एनडीएचं अभिनंदन. भारतीय लोकांचेही अभिनंदन ज्यांनी भारताच्या लोकशाहीला चैतन्य आणि गतिमानता दिली. मित्र आणि शेजारी या नात्याने, भारताची लोकशाही सर्वात भक्कम पायावर उभी आहे या वस्तुस्थितीबद्दल आम्ही खूप आनंदीआहोत, असं मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद यांन म्हटलंय.

“नेपाळचे मित्र, भाजप आणि एनडीएच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यावर तुमचे अभिनंदन. तुमचे नेतृत्व, समर्पण आणि दृष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याला प्रेरणा देत राहते”, असं नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर दोबा म्हणाले.

“जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुका भारतात यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पंतप्रधानांचेही अभिनंदन. भारताच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा सलग तिसरा विजय.
मी भारतातील लोकांना शांतता आणि समृद्धीची शुभेच्छा देतो आणि मला आशा आहे की आपले देशांतर्गत सहकार्य सुरू राहावे. भारत आणि युक्रेनमध्ये समान मूल्ये आणि समृद्ध इतिहास आहे. आपल्या राष्ट्रांतील प्रगती आणि परस्पर समंजसपणा वाढत राहो. जागतिक घडामोडींमध्ये भारताच्या भूमिकेचे महत्त्व आणि वजन जगातील प्रत्येकजण ओळखतो. सर्व राष्ट्रांसाठी न्याय्य शांतता सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात आम्ही भारतातील शांतता शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहोत”, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेनस्की म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्री नव्या उंचीवर जावो. बधाई हो!”, अशा शुभेच्छा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिल्या.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तसंच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही मोदींचं अभिनंदन केलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे त्यांच्या विजयाबद्दल आणि या ऐतिहासिक निवडणुकीत सुमारे ६५ कोटी मतदारांचे अभिनंदन. अमर्याद सामर्थ्याचे सामायिक भविष्य अनलॉक करत असतानाच आपल्या राष्ट्रांमधील मैत्री वाढत आहे”, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले.

दरम्यान, भारतात सध्या एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. तसंच, इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.