कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी होत, निकाल जाहीर होईल. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ( २९ एप्रिल ) ‘काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या,’ असं म्हणतं टीका केली होती. याला आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची टिका-टीप्पणी ऐकण्याची हिंमत दाखवली पाहिजे. पंतप्रधानांनी माझ्या भावाकडून शिकलं पाहिजे. ते देशासाठी गोळी खाण्यासही तयार आहेत,” असं प्रियंका गांधींनी म्हटलं. त्या कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात प्रचारसभेत बोलत होत्या.

हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील एकमेव अद्भूत नेते ज्यांनी…” अमृता फडणवीसांच्या पोस्टने वेधलं लक्ष

“आमच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या शिव्यांची यादी काढली, तर एकापाठोपाठ एक पुस्तकांचं प्रकाशन करावं लागेल. मी अनेक पंतप्रधानांना पाहिलं आहे. इंदिरा गांधी यांनी देशासाठी गोळ्या खाल्या. राजीव गांधी यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. पी.व्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांना देशासाठी कठोर मेहनत घेताना पाहिलं आहे,” असं प्रियंका गांधींनी सांगितलं.

“पण, मी असे पहिले पंतप्रधान पाहिलेत की, जे लोकांसमोर येत रडत सांगतात की त्यांना शिव्या दिल्या जात आहेत. लोकांचं दु:ख ऐकण्याऐवजी येथे येऊन आपल्याबाबत सांगतात. पंतप्रधानांच्या कार्यालयात लोकांच्या समस्यांऐवजी, ज्यांनी पंतप्रधानांना शिव्या दिल्यात, त्यांची यादी बनवण्यात आली आहे,” असा हल्लाबोल प्रियंका गांधींनी केला आहे.

हेही वाचा : “पंतप्रधान मोदींनी आमच्या ‘मन की बात’ ऐकावी”, भारताला पदक मिळवून देणाऱ्या ‘दंगल गर्ल’चं विधान

“मोदींनी हिंमत दाखवली पाहिजे. त्यांनी माझा भाऊ राहुल गांधींकडून शिकलं पाहिजे. ते देशासाठी शिवी काय गोळी खाण्यासाठीही तयार आहेत. त्यामुळे मोदींनी घाबरलं नाही पाहिजे. सार्वजनिक जीवनात अशी टिका-टीप्पणी सहन करावी लागते. हिंमत दाखवत पुढे जाण्याची गरज आहे,” असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.