मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसंच ते महायुतीसाठी सभाही घेत आहेत. कळवा या ठिकाणी त्यांची जी सभा पार पडली त्या सभेत त्यांनी सुषमा अंधारेंचा व्हिडीओ दाखवला आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच माझे वडील चोरले हा निवडणुकीचा मुद्दा कसा काय असू शकतो? असा प्रश्न विचारला. तसंच शरद पवारांवरही जोरदार टीका केली. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण वाढवलं आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला. या सगळ्यानंतर आता १७ मे रोजी ते मोदींसह एकाच मंचावर दिसणार आहेत. मात्र राज ठाकरे हे इव्हेंट सेलिब्रिटी आहेत आणि भाजपाचं स्क्रिप्ट वाचतात अशी टीका काँग्रेसने केली आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

“ज्या शरद पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात, त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. सर्वात पहिला पक्ष त्यांनी फोडला, काँग्रेस, १९७८ ला, पुढे १९९१ ला छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं आणि २००४ ला नारायण राणेंना काँग्रेसने फोडलं, तेव्हा हे आत्ता रडणारे कुठे होते? तेव्हा का नाही काही बोलले? बाळासाहेबांचा उल्लेख म्हातारा करणाऱ्या आणि त्यांचे हात लटपटत आहे असं म्हणणाऱ्या बाईला तुम्ही पक्षात घेता तेव्हा लाज नाही वाटली? ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली, त्या छगन भुजबळांसह मंत्रिमंडळात बसताना लाज नाही वाटली? का नाही तेव्हा विरोध केला?” असे प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारले आहेत. यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे हे इव्हेंट सेलिब्रिटी आहेत अशी टीका केली आहे.

हे पण वाचा- राज ठाकरेंबरोबर युती करताना नातं आडवं येतं का? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले…

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“राज ठाकरे हे इव्हेंट सेलिब्रिटी आहेत. सभेतील मुख्य वक्त्यांच्या भाषणांपूर्वी ते टाइमपास आणि करमणुकीचं काम करतात. एका इव्हेंटसाठी किती पैसे घेतात? त्याची माहिती काढली पाहिजे. राज ठाकरेंचा पिक्चर आणि सीरियल काहीच चालत नाही. त्यामुळे ते इतरांच्या व्यासपीठावर जाऊन काम करतात.” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज ठाकरे भाजपाची स्क्रिप्ट वाचतात

“राज ठाकरे भाजपाची स्क्रिप्ट वाचतात. राज ठाकरेंना वरुन सांगण्यात आलं असेल, बेटा राज ये फाईल देख लो. या फाईल्सचा धसका घेऊनच राज ठाकरे हे महायुतीच्या प्रचारासाठी जात असतील. ” अशी खोचक टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच वडेट्टीवार पुढे म्हणाले, “मुंबईतल्या सभेसाठी भाजपाने त्यांना मोठी बिदागी दिली असेल. आम्हीही असे सेलिब्रिटी आणतो, त्यांचं विमानाचं तिकिट काढतो आणि पैसे देतो. मात्र अशा प्रकारे भूमिका बदलणाऱ्यांना जनता साथ देत नाही.” असाही टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

महाविकास आघाडी ३५ जागा जिंकण्याचा विश्वास

लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल हे स्पष्ट झाल्यानेच मोदी आणि भाजपा घाबरले आहेत. मुंबईत मोदी रोड शो करत आहेत. राज्यातली २४ वी सभा आज होते आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही इतक्या सभा घेतल्या जात नाहीत. राहुल गांधींविषयी असणारी भीती यातून दिसते आहे असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.