उत्तर प्रदेशमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा भाजपाला धक्का देत सपात प्रवेश, शरद पवार म्हणाले, “इतकंच नाही, तर सोबत १३ आमदार…”

उत्तर प्रदेशमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला झटका बसला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपाला रामराम करत समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला झटका बसला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचं म्हटलं.

शरद पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. मौर्या यांनी मंत्रीपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांनी समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत १३ आमदार आणि इतर काही नेते देखील सपात प्रवेश करणार आहेत. मौर्या यांचा राजीनामा हा तर सुरुवात आहे. पुढील काही दिवस दररोज कोणता ना कोणता नवा चेहरा भाजपाचा राजीनामा देऊन इकडे येईल आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होईल.”

“उत्तर प्रदेशात लोकांना बदल हवा आहे. जी आश्वासनं उत्तर प्रदेशच्या जनतेला देण्यात आली त्यात काहीही खरं नाही. हेच यूपीच्या जनतेसमोर आलंय. त्यामुळेच परिस्थिती बदलली आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार

शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निवडणूक लढण्याबाबत चर्चा झालीय. मणिपूरमध्ये आम्ही एकूण ५ ठिकाणी निवडणूक लढू.”

“गोव्यात राष्ट्रवादीची काँग्रेस, टीएमसीसोबत चर्चा सुरू”

“गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाची युती”

शरद पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झालीय. या सर्वांची एक मोठी बैठक होईल. तिथं काही जागा लढवण्यावर आमची चर्चा झाली आहे. उद्या लखनौमध्ये जागांची वाटप घोषित होईल.”

हेही वाचा : “शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे”, शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची मागणी

“पुढील आठवड्यात आम्ही सर्व उत्तर प्रदेशमधील प्रचारात सहभागी होऊ. उत्तर प्रदेशमधील परिस्थिती खूप बदलली आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar reaction on up bjp cabinet minister of yogi government resign and join sp pbs

Next Story
गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये १०० टक्के परिवर्तन होतंय हे लिहून ठेवा – संजय राऊत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी