तेलंगणा विधानसभेच्या प्रचारासाठी काँग्रेसने विद्यमान सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या विरोधात एक वेगळी शक्कल लढविली आहे. ही निवडणूक ‘डोरालू’साठी (सावकारांसाठी) काम करणारे आणि ‘प्रजालू’ (सामान्य लोकांसाठी) यांच्यासाठी कटिबद्ध असलेल्यांमध्ये आहे, असे स्वरूप काँग्रेसने आपल्या प्रचाराला दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कुम्मारी तिरुपथम्मा या महिलेशी बातचीत करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तिरुपथम्मा यांचे पती असलेल्या चंद्रय्या या शेतकऱ्याने २०२० मध्ये आत्महत्या केली होती. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणतात, “महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की, रांगेत शेवटी बसलेल्या व्यक्तीचा आवाज सर्वात महत्त्वाचा असतो. कुम्मारी चंद्रय्या यापैकीच एक आवाज होता. मात्र, डोरालाच्या बीआरएस सरकारने तो ऐकला नाही. तेलंगणातील एका छोट्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले जीवन संपविले.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बीआरएस आणि भाजपा यांच्यासारखे डोलारा सरकार तेलंगणातील सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आणि काँग्रेसची “सहा आश्वासने” जनतेला न्याय देईल, असे आश्वासन दिले.

बीआरएसने राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, स्थानिक राजकारण समजून न घेता राहुल गांधी फक्त लिहून दिलेली कथा वाचत आहेत.

हे वाचा >> Telangana Polls : मुख्यमंत्री केसीआर यांच्याविरोधात दोन मतदारसंघांत १०० हून अधिक उमेदवार निवडणुकीला उभे

निजामशाहीचा इतिहास

तेलंगणा प्रांत पूर्वी हैदराबाद राज्यातील निजामशाहीचा भाग होते. निझामाकडून या भागावरचा कारभार पाहिला जायचा. निजामाच्या काळात शेतकऱ्यांनी शोषणात्मक आणि सांप्रदायिक कृषी रचनेबाबत असंतोष व्यक्त केला होता. या प्रांतातील ४० टक्के जमीन थेट निजामाच्या मालकीची होती किंवा निजामाने जहागीर म्हणून दिली होती. महसूल यंत्रणेने उरलेल्या ६० टक्के जमिनीवर सावकारांना प्रचंड शक्ती प्रदान केली होती. शेतमजुरांना या ठिकाणी बळजबरीने राबविले जात होते.

१९२० च्या दशकात निजाम राजवट आणि त्यांच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली. ६ जुलै १९४६ रोजी विष्णूर रामचंद्र रेड्डी नावाच्या कर गोळा करणाऱ्या व्यक्तीकडून बळजबरीने भूसंपादन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. ज्याचे पडसाद तीव्र आंदोलनात उमटले. पुढच्या काही महिन्यात हे आंदोलन प्रांतातील तीन हजार ते चार हजार गावांमध्ये पसरले आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतले. ऑक्टोबर १९४६ मध्ये निजामाने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला.

आणखी वाचा >> कधीकाळी जगातील श्रीमंतापैकी एक होते निजाम; आठव्या निजामाचा नुकताच झाला मृत्यू

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास १३ महिन्यांनी निजामाच्या अखत्यारित असलेला हैदराबाद प्रांत भारतात विलीन करण्यात आला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्याची स्थापना करून भारताने फक्त ब्रिटिशच नाही तर निजाम आणि निजामाच्या जुलमी सावकारांविरोधात विजय मिळविला होता. काँग्रेसने या इतिहासातूनच प्रचाराची संकल्पना उचलली आहे. तेलंगणामधील लोकांसाठी ‘डोरालू’ हा शब्द निजामाच्या राजवटीत असलेल्या सरंजामशाही व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो.

काँग्रेसने आश्वासित केलेल्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करत असताना काँग्रेसने मोठ्या हुशारीने डोरालू शब्दाचा वापर केला आहे. या शब्दातून अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना लक्ष्य करण्यात आले आहे. के. चंद्रशेखर राव हे ‘वेलामा’ या सावकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातीमधून येतात. तेलंगणामधील अतिशय प्रभावशाली समाजगट म्हणून वेलामा जातीची ओळख असून राज्यातील लोकसंख्येतील त्यांचा वाटा चार टक्के एवढा आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why cong is talking of doralus vs prajalu in telangana assembly election kvg