आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिवावर गैरवर्तन केल्याच्या आरोपाने आम आदमी पक्ष (आप) अडचणीत आला. आपल्या पक्षाच्या महिला नेत्याशी गैरवर्तन झाल्याच्या आरोपामुळे आप पक्षाला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. स्वाती मालीवाल यांनी स्वतः हे गंभीर आरोप केलेत. त्यामुळे आप आणि स्वाती मालीवाल यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. नेमके हे प्रकरण काय? स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली का? आप ने हे आरोप का स्वीकारले? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपने आरोप स्वीकारले

पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी मंगळवारी (१४ मे) कबूल केले की, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केले आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पत्रकार परिषदेत सिंह म्हणाले की, कुमार यांनी राज्यसभेच्या खासदाराचा अनादर केला, तेव्हा मालीवाल या ड्रॉईंग रूममध्ये केजरीवाल यांना भेटण्यासाठी वाट पाहत होत्या. “काल सकाळी अतिशय निंदनीय घटना घडली. स्वाती मालीवाल या अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्या ड्रॉईंग रूममध्ये अरविंद केजरीवाल यांची प्रतीक्षा करत होत्या, तेव्हा बिभव कुमारने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांचा अनादर केला. त्यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळवले,” असे ते म्हणाले.

हेही वाचा : केजरीवालांचा आप पक्ष मनी मनी लाँडरिंग प्रकरणात आरोपी; राजकीय पक्षाला आरोपी ठरवलं जाऊ शकतं का?

सिंह पुढे म्हणाले की, केजरीवाल यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. “स्वाती मालीवाल यांनी देश आणि समाजासाठी काम केले आहे आणि त्या आप च्या सर्वात जुन्या आणि सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आप अशा लोकांना (बिभव) समर्थन देत नाही,” असेही ते म्हणाले.

नक्की काय घडले?

सोमवारी (१३ मे) दिल्ली पोलिसांनी सांगितले की, स्वाती मालीवाल यांनी सकाळी फोन केला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, मालीवाल सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये गेल्या असताना, काही फोन कॉल्स आल्यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली नाही. त्यांनी पोलिसांना सांगितले होते की, त्या परत येतील परंतु अद्याप त्या तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या नाहीत. दिल्ली पोलिसांनी मालीवाल यांची तक्रार प्रलंबित आहे आणि अद्याप कोणताही गुन्हा नोंदवलेला नसल्याचे सांगितले, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले.

केजरीवाल यांच्या सांगण्यावरून हल्ला?

पोलिसांच्या नोंदीनुसार, मालीवाल यांनी केलेल्या कॉलची डायरीमध्ये नोंद करण्यात आली होती; ज्यामध्ये केजरीवाल यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला होता, असे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे. भारतीय जनता पार्टीने (भाजपा) आपवर निशाणा साधत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याने या मुद्द्यावरून राजकीय वाद उफाळला. भाजपाने म्हटले आहे की, पक्षाचे स्वतःचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आवारात असुरक्षित आहेत. या घटनेने दिल्ली सरकारच्या राजधानीतील महिला संरक्षणाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

भाजपा आक्रमक

दिल्ली भाजपाचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी बिभव कुमारच्या अटकेची मागणी केली आहे. “कालपर्यंत आप नेते या घटनेबाबत मौन बाळगून होते, ते गप्प का होते? एका महिलेला गैरवर्तनाला सामोरे जावे लागते, तिच्यावर अत्याचार होतो आणि तुम्ही त्याची दखल घेणार असे म्हणत आहात? त्यांना (कुमार) आत्तापर्यंत अटक व्हायला हवी होती. मालिवाल यांच्या विधानाच्या आधारे गुन्हा नोंदवला गेला पाहिजे होता. दोषी असलेल्या प्रत्येकाला कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनीही बुधवारी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.

कोण आहेत स्वाती मालीवाल?

स्वाती मालीवाल या आपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशी अगदी पक्षाच्या स्थापनेपूर्वीपासूनचे संबंध आहेत. कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्या केजरीवाल यांच्या ‘परिवर्तन’ स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करू लागल्या. त्या उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील रहिवासी आहेत. २०११ मधील अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या २३ सदस्यीय कोअर कमिटीचाही त्या भाग होत्या.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले. २०१५ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांची महिला आयोगाच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषवलेल्या त्या सर्वात तरुण महिला ठरल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात दिल्लीतील मुली आणि महिलांवरील गुन्ह्यांची १.७ लाखांहून अधिक प्रकरणे हाताळली.

मालीवाल यांनी वडिलांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती उघड केल्यानंतर त्या चर्चेचा विषय ठरल्या. यापूर्वी मालीवालदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. २०१६ मध्ये, लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने दिल्ली महिला आयोगामध्ये झालेल्या नियुक्तींमध्ये अनियमिततेच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मे महिन्याच्या सुरुवातीला, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्ली महिला आयोगातील ५२ बेकायदेशीररित्या नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. त्यांची नियुक्ती मालीवाल यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती.

स्वाती मालीवाल या आपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. (छायाचित्र-पीटीआय)

मालिवाल आणि आप यांच्यात फूट?

अलीकडील घटनेने मालीवाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील मतभेदाकडे लक्ष वेधले आहे. ‘द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार काही महिन्यांत त्यांच्यातील मतभेद वाढले आहेत. एका आप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘डिजिटल आउटलेट’ला सांगितले, “मालीवाल केजरीवालांच्या अटकेपूर्वी आणि नंतर दिल्लीत गैरहजर राहिल्याने केजरीवाल त्यांच्यावर नाराज होते. दीर्घकाळ गैरहजर राहिलेल्या प्रत्येकावर ते नाराज आहेत.” आपच्या दुसऱ्या कार्यकर्त्याने सांगितले, “त्यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. त्यामुळे पक्षासाठी प्रचार करण्याची त्यांची विनंतीही पक्षातील अनेकांना मान्य नव्हती.”

२१ मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात अटक केल्यानंतर भाजपाने मालीवाल यांच्या दिल्लीतील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी आपल्या बहिणीच्या उपचारासाठी अमेरिकेत असल्याचे कारण पुढे केले होते. परंतु, एप्रिलच्या अखेरीस त्या भारतात परतल्यानंतरही त्यांनी काही निवडणूक प्रचार सभांना हजेरी लावली, मात्र त्या फार सक्रिय दिसल्या नाहीत.

२६ एप्रिल रोजी मालीवाल यांनी दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल यांच्यासह आपचे पूर्व दिल्ली लोकसभा उमेदवार कुलदीप कुमार यांचा प्रचार केला. त्याच्या एका दिवसानंतर, त्यांनी पक्षाचे पश्चिम दिल्लीचे उमेदवार महाबल मिश्रा यांच्यासाठी प्रचार केला. विशेष म्हणजे, तिहार तुरुंगातून अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर जेव्हा केजरीवाल यांनी पहिले सार्वजनिक भाषण केले, तेव्हा त्या आपच्या मंचावरून गायब होत्या. अबकारी धोरण प्रकरणात केजरीवाल यांचे वकील असलेले काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांना राज्यसभेचे सदस्यत्व सोडण्यास सांगितले गेल्याने मालीवाल पक्षावर नाराज असल्याच्या कथनांचे वरिष्ठ आप नेत्यांनी खंडन केले आहे.

हेही वाचा : हवामान बदलामुळे उष्णतेची लाट पुन्हा उसळणार? उष्णतेच्या लाटांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो?

मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप ‘आप’ने का मान्य केला?

केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांसह विविध आरोप करण्यात आले आहे. मात्र, पक्ष नेहमी त्यांचा बचाव करत आला आहे. पण या वेळी पक्षाने त्यांना फटकारले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आप निवणुकीच्या तोंडावर महिला मतदारांचा आधार गमावण्याचा धोका पत्करू इच्छित नाही. “प्रचार शिगेला पोहोचला आहे, त्यामुळे पक्षाला याचा मोठा मुद्दा होऊ नये असे वाटते, असे आप नेत्याने सांगितले.

‘द प्रिंट’शी बोलताना, आप सूत्रांनी सांगितले की कुमार यांनी आपली हद्द पार केली आहे. त्यामुळे त्यांना सार्वजनिकरित्या फटकारण्यात आले. गैरवर्तन झाल्याचा आरोप मान्य केल्याने अनावश्यक वाद होणार नाही आणि मालीवालदेखील शांत होतील, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap mp swati maliwal assault allegations rac