– संदीप कदम

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा तब्बल ११ महिन्यांनंतर आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आयर्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेत तो भारताचे नेतृत्व करत आहे. त्याचे हे पुनरागमन यशस्वी ठरेल का, तसेच आगामी काळात त्याच्यासमोर कोणती आव्हाने असतील, याचा घेतलेला हा आढावा.

दुखापतीनंतर बुमराचा प्रवास कसा राहिला?

गेल्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बुमराने पाठीत दुखत असल्याची तक्रार केली होती आणि नंतर तिसरा एकदिवसीय सामना खेळला नाही. याच दुखापतीमुळे बुमरा आशिया चषक स्पर्धेत सहभागी झाला नाही. सप्टेंबर २०२२ मध्ये अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर बुमराने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन मालिकेत त्याला संघात स्थान मिळाले. याच मालिकेतील दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत सहा षटके टाकल्यानंतर बुमराची दुखापत आणखी बळावली आणि त्याला मालिकेबाहेर जावे लागले. यानंतर त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतूनही बाहेर पडावे लागले. यावर्षी जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला निवड समितीने संघात स्थान दिले. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असताना बुमरा पुन्हा पाठीच्या दुखापतीबाबत तक्रार केल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले. फ्रेब्रुवारीत त्याला बॉर्डर- गावस्कर करंडक मालिकेतही दुखापतीमुळे स्थान मिळाले नाही. बुमराला दुखापतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ‘आयपीएल’ हंगाम बाहेर रहावे लागले. या दरम्यान त्याच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यालाही मुकावे लागले. आता इतक्या महिन्यांनी बुमराचे पुनरागमन होत असल्याने त्याच्यावर सर्वांचे लक्ष असेल.

दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताना बुमरा काय म्हणाला?

‘‘बंगळूरु येथील पुनर्वसन केंद्रात १०,१२ तर कधी कधी १५ षटकांपर्यंत मी गोलंदाजी करत होतो. मी अधिकाधिक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मला भविष्यात फार त्रास जाणवणार नाही. मी एकदिवसीय स्पर्धेच्या दृष्टीने तयारी केली. दुखापतीतून सावरताना वेळ लागतो आणि हा वेळ आव्हानात्मक असतो. माझे लक्ष्य या काळात तंदुरुस्त होऊन पुनरागमन करण्याकडे होते,’’ असे बुमराने सांगितले. तो पुढे म्हणाला,‘‘ आपल्या शरीराला वेळ देणेही तितकेच महत्त्वपूर्ण असते. मी या काळात नकारात्मक विचार केला नाही. मी अपेक्षांबद्दल फार विचार करत नाही. मी बऱ्याच काळानंतर क्रिकेट खेळणार असल्याने मला खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. मी इतका काळ कधीही खेळापासून दूर नव्हतो. मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अनेक खेळाडूंना भेटलो. कधी-कधी गोष्टी आपल्या हातात नसतात. मात्र, शरीराला सावरण्यासाठी वेळेची गरज असते आणि तुम्हाला तितका वेळ द्यावा लागतो.’’

बुमराचे पुनरागमन भारतीय संघासाठी फायदेशीर का?

जसप्रीत बुमरा भारतासाठी नेहमीच निर्णायक गोलंदाज राहिला आहे. त्याच्या गोलंदाजी शैलीने अनेक फलंदाजांना अडथळे येतात. तसेच, ‘यॉर्कर’ चेंडू टाकण्यातही बुमरा सक्षम आहे. आगामी काळात आशिया चषक आणि नंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आशिया चषकातील सर्व सामने श्रीलंकेत होणार असून, विश्वचषकाचे आयोजन भारत करत आहे. या आगामी महत्त्वपूर्ण स्पर्धांकडे पाहता बुमरा हा भारतासाठी निर्णायक भूमिका पार पाडू शकतो. तो संघात येण्याने भारताची गोलंदाजीही मजबूत होईल. बुमराने आतापर्यंत भारताकडून कसोटीतील ३० सामन्यांत १२८ बळी, ७२ एकदिवसीय सामन्यांत १२१ बळी तर, ६० ट्वेन्टी-२० सामन्यांत ७० बळी मिळवले आहेत. बुमराचा अनुभव पाहता विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेत तो संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतो.

हेही वाचा : कोण आहे मिन्नू मणी? शेतमजुराची मुलगी ते ‘टीम इंडिया विमेन’मधलं स्थान…

आगामी काळात बुमरासमोर कोणती आव्हाने आहेत?

बुमराने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करून थेट आयर्लंडविरुद्ध सामने खेळत आहे. तेथील वातावरण वेगवान गोलंदाजांना पोषक समजले जाते. त्यामुळे या मालिकेत बुमराला आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध करावे लागेल. आगामी काळात भारतीय उपखंडात सर्वाधिक सामने बुमराला खेळायचे आहेत. त्यामुळे चांगली गोलंदाजी करण्याचा दबावही त्याच्यावर असणार आहे. बुमराच्या अनुपस्थित भारताला म्हणावा तसा पर्याय अजून मिळालेला नसला, तरीही मुकेश कुमारच्या रूपात भारताला चांगला गोलंदाज मिळाला आहे. बुमराचे स्थान संघात निश्चित समजले जात असले, तरीही अनुभवी मोहम्मद शमी व लयीत असलेला मोहम्मद सिराज यांच्याशी त्याला स्पर्धा करावी लागणार आहे. यासोबत त्याला दुखापत पुन्हा बळावणार नाही, याबाबत योग्य नियोजन करावे लागेल. जेणेकरून विश्वचषक स्पर्धेनंतर होणाऱ्या दौऱ्यांमध्ये तो संघात राहील. दुखापत हा कोणत्याही खेळाडूच्या कारकीर्दीचा भाग असतो. मात्र, बुमराची दुखापत ही गंभीर होती. त्यामधून त्याला सावरण्यात एक वर्षाहून अधिकचा काळ लागला. त्यामुळे येणाऱ्या काळात दुखापत होणार नाही, याची विशेष काळजी बुमराला घ्यावी लागेल.