विश्लेषण : अनिल जयसिंघानीच्या अटकेमुळे पोलीस-सट्टेबाज संबंध पुन्हा अधोरेखित?

अनिल जयसिंघानी हा आंतरराष्ट्रीय सट्टेबाज आहे. सुनील सिल्वर या नावाने तो सट्टेबाजांमध्ये परिचित आहे.

Anil Jaisinghani arrest highlights police-speculator nexus again?
वाचा सविस्तर विश्लेषण

निशांत सरवणकर

फरारी असलेला सट्टेबाज अनिल जयसिंघानी अखेर पोलिसांना सापडला आहे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना धमकावणे व एक कोटी रुपयांची लाच या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. पण हे प्रकरण घडले नसते तर फरारी जयसिंघानी पोलिसांच्या हाती लागला नसता का, असा प्रश्न उपस्थित होतोच. ‘लूक-आऊट’ नोटीस असूनही तो सापडू शकत नसल्यामुळे पोलीस-सट्टेबाज संबंधांकडे अंगुलीनिर्देश केला जातो. आताही तसेच सुरू आहे का, आताची परिस्थिती नेमकी काय आहे, याचा आढावा…

अनिल जयसिंघानी कोण आहे?

पोलिसांच्या एका अहवालानुसार, अनिल जयसिंघानी हा आंतरराष्ट्रीय सट्टेबाज आहे. सुनील सिल्वर या नावाने तो सट्टेबाजांमध्ये परिचित आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई करणारे माजी पोलीस उपायुक्त अमर जाधव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पहिल्यांदा जयसिंघानीविरुद्ध २००४मध्ये ठाण्यात किक्रेटवर सट्टा घेतल्याप्रकरणी कारवाई केली. त्यानंतर मुंबई पोलीस दलात गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त (अन्वेषण एक) असताना २००९मध्ये त्यांनी पुन्हा एकदा जयसिंघानीविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी एका अहवालातही गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानी याचे आंततराष्ट्रीय सट्टेबाजांशी संबंध होते, असे नमूद केले आहे. ठाणे पोलिसांच्या अहवालानुसार, जयसिंघानी याच्याविरुद्ध १९८५ पासून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. यापैकी काही गुन्ह्यांतून त्याची सुटका झाली आहे. मात्र आपला सट्टेबाजीशी काहीही संबध नाही, असा अनिल जयसिंघानी याचा दावा आहे.

पोलिसांचे म्हणणे काय?

जयसिंघानी याने कितीही दावा केला तरी त्याचा सट्ट्याशी थेट संबंध असल्याचा उल्लेख पोलिसांच्या एका अहवालातच सापडतो. तत्कालीन पोलीस उपायुक्त अमर जाधव यांनी आपल्याविरुद्ध खोटी कारवाई केल्याचा दावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केला होता. त्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त के. एम. प्रसन्ना यांनी चौकशी करून जयसिंघानी याचा खोटेपणा उघड केला आणि अमर जाधव यांची कारवाई योग्य ठरविली. मुंबईत त्याच्यावर कारवाई करण्यात आली तेव्हा सांताक्रूझमधील एका हॉटेलात त्याच्या व अन्य सट्टेबाजाच्या नावावर रूम आरक्षित होती. या रूमवर छापा टाकून पोलिसांनी सट्टेबाजीसाठी लागणारे साहित्य उदा. दोन लॅपटॉप, आठ मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह तसेच १९ बुकींची नावे असलेली डायरी पंचनामा करून हस्तगत केली होती. यावरून जयसिंघानी याचा सट्ट्याशी संबंध होता हे स्पष्ट होते. सध्याही तो सट्ट्यात सक्रिय होता, असा पोलिसांचा दावा आहे.

जयसिंघानी फरारी का?

जयसिंघानी याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातून त्याची मुक्तता व्हावी, यासाठीच मुलगी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना लाच देऊ केली असे प्राथमिक निष्कर्ष अहवालात म्हटले आहे. एकीकडे जयसिंघानी आपण उल्हासनगरमधील स्थानिक वर्तमानपत्राचे मालक आहोत तसेच आपला व्यवसाय असा दावा करतो. आपल्याला खोट्या प्रकरणात गुंतविल्याचा दावा करतो. दुसरीकडे त्याचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असून तो फरारी असल्याचे पोलीस सांगतात. गेली सात वर्षे फरारी असतानाही जयसिंघानी याला पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न का केले झाले नाहीत? आता मात्र पोलिसांना जयसिंघानी सापडतो? यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तो संपर्कात होता. परंतु यावेळी त्याने थेट गृहमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधित अधिकारी त्याची मदत करू शकले नाही, हे स्पष्ट झाले आहे. अमृता फडणवीस या २० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करतात आणि त्यानंतर बातमी प्रकाशित झाल्यानंतर तो लगेच सापडतो, हे सारेच पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित करणारे आहे. याचा अर्थ पोलिसांचा त्याचा ठावठिकाणा माहिती होता वा तो कोणाच्या तरी संपर्कात होता, हे स्पष्ट होते. गोवा तसेच मुंबई पोलिसांनीही त्याच्याविरुद्ध ‘लूक-आऊट’ नोटीस जारी केली होती. तरी तो सापडला नव्हता.

पोलीस- सट्टेबाज संबध…

अल्पावधीत भरमसाट काळा पैसा मिळवून देणारा सट्टा हा नेहमीच गुन्हेगारांचे आकर्षण राहिला आहे. त्यामुळे पोलिसांच्या आशीर्वादाने सट्टा सुरू असतो, असेही अनेकदा बोलले जाते. यातून पोलिसांनाही हप्त्याच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळते अशी चर्चा आहे. अधूनमधून पोलिसांकडून छोट्या सट्टेबाजांवर कारवाई केली जात होती. परंतु बड्या सट्टेबाजांना पोलिसांनी नेहमीच संरक्षण दिले आहे. मालाड येथे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोरदार कारवाई करून २० बड्या सट्टेबाजांविरुद्ध कारवाई केली होती. मात्र लगेचच या सर्व सट्टेबाजांना सोडून देण्यात आल्यामुळे खळबळ माजली होती. त्यावेळी मोठ्या रकमेची देवाणघेवाण झाल्याची चर्चा चांगलीच गाजली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी आयपीएल सट्टेबाज प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मैयप्पन याचा संबंध असल्याचे दाखवून दिले होते. त्यावेळची ही धाडसी कारवाई नंतर राजकीय दबावामुळे थंडावली होती. प्रत्येकवेळी पोलीस आणि सट्टेबाज यांच्यातील संबंधाची चर्चा झाली. परंतु सट्टेबाज आणि राजकारणी यांच्यातील संबंध नेहमीच गुलदस्त्यात राहिले.

आज काय स्थिती?

सट्टा आजही सुरू आहे. आता त्याचे स्वरूप बदलले आहे. संपूर्णपणे डिजिटल झाले आहे. चिठ्ठी व नोंदणी वहीची जागा आता मोबाईल फोनने घेतली आहे. या सट्टेबाजांचे आता वेगवेगळे बेटिंग अॅप आहेत. सट्ट्याची रक्कम जमा झाली की अॅपची लिंक, आयडी आणि पासवर्ड पाठविला जातो. लॉगइन करून सट्टा खेळला जातो. सारेकाही ऑनलाईन दिसत असल्यामुळे जीत व हार लगेच कळते. त्यामुळे पोलिसांना सट्टेबाजांविरुद्ध कारवाई करणे म्हणजे आव्हान झाले आहे. एखादा खबरी असेल तरच लॉगइन आयडी व पासवर्ड मिळवून पोलिसांना कारवाई करता येते. परंतु अशी कारवाई गेल्या काही वर्षांत झालेली नाही.

nishant.sarvankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 08:39 IST
Next Story
विश्लेषण : इराक युद्धामुळे काय साधले?
Exit mobile version