अन्वय सावंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदिवसीय विश्वचषकाला दोन आठवड्यांहूनही कमी कालावधी शिल्लक असताना पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद निर्माण झाला आहे. यंदा आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, प्रत्यक्षात पाकिस्तान संघाला अंतिम फेरीही गाठता आली नाही. या निराशाजनक कामगिरीबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत कर्णधार बाबर आझम आणि मुख्य प्रशिक्षक ग्रांट ब्रॅडबर्न यांना पाकिस्तान संघाला आलेल्या अपयशामागची कारणे विचारण्यात आली. या बैठकीमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादाची ठिणगी पेटली. निवड समितीचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार इंझमाम उल हक यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. तर बैठकीनंतर माजी कर्णधार मोहम्मद हाफिजने ‘पीसीबी’च्या क्रिकेट तांत्रिक समितीतील आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, असे का घडले याचा आढावा.

पाकिस्तान संघाने आशिया चषकात कशी कामगिरी केली?

यंदा आशिया चषकाचे संपूर्ण यजमानपद आधी पाकिस्तानकडेच होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर ही स्पर्धा पाकिस्तानसह श्रीलंकेत खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानच्या संघाला साखळी फेरी आणि ‘सुपर फोर’ फेरी मिळून घरच्या मैदानावर केवळ दोन सामने खेळता आले. त्यांनी हे दोनही सामने जिंकले. परंतु श्रीलंकेत खेळलेल्या तीनपैकी दोन सामन्यांत पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला, तर एक सामना रद्द झाला. साखळी फेरीतील पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. ‘सुपर फोर’मध्ये हे दोन संघ पुन्हा आमनेसामने आले. यावेळी मात्र भारताने पाकिस्तानवर तब्बल २२८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान हॅरिस रौफ आणि नसीम शाह या पाकिस्तानच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांना दुखापत झाली. याचा फटका पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात बसला. या सामन्यात श्रीलंकेने डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार पाकिस्तानवर दोन गडी राखून अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. या पराभवासह पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

आणखी वाचा-‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार?

‘पीसीबी’ने बोलावलेल्या आढावा बैठकीला कोण उपस्थित होते?

पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ‘पीसीबी’ने आढावा बैठक बोलावली. अपयशामागची कारणे जाणून घेणे आणि आगामी विश्वचषकापूर्वी संघातील उणिवा दूर करण्यासाठी काय आवश्यक आहे, हे बैठकीमागचे उद्दिष्ट होते. या बैठकीला ‘पीसीबी’चे अध्यक्ष झाका अश्रफ, कर्णधार बाबर, प्रशिक्षक ब्रॅडबर्न, मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नासर, ‘पीसीबी’च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमुख उस्मान वहला यांच्यासह हाफिज आणि मिसबा उल हक हे माजी कर्णधारही उपस्थित होते.

इंझमाम यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार का दिला?

विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असताना अशा प्रकारची बैठक घेणे योग्य नसल्याचे इंझमाम यांना वाटले. त्यामुळेच त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. ‘‘इंझमाम आपल्या मताशी पक्के असतात. अशा प्रकारची आढावा बैठक घेणे आणि कर्णधार बाबर व प्रशिक्षक ब्रॅडबर्न यांना मिसबा, हाफिज, ‘पीसीबी’चे अन्य पदाधिकारी यांच्या अवघड प्रश्नांची उत्तरे द्यायला लावणे योग्य नसल्याचे त्यांचे मत होते. इंझमाम स्वतः माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे ते या प्रक्रियेबाबत झाका अश्रफ यांच्याशी सहमत नव्हते आणि त्यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले होते. ही वेळ संघाचे मनोबल वाढवण्याची असून त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे असे इंझमाम यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी बैठकीला उपस्थित न राहणे पसंत केले,’’ अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

आणखी वाचा-विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?

बैठकीत नक्की काय घडले? हाफिजने राजीनामा देण्याचे पाऊल का उचलले?

इंझमामप्रमाणेच हाफिजही आपली मते स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखला जातो. आढावा बैठकीत हाफिज आणि मिसबा यांनी बाबर आणि ब्रॅडबर्न यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी संघात बदलही सुचवले. मात्र, ‘पीसीबी’ने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हाफिज नाराज झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ‘पीसीबी’चे अध्यक्ष झाका अश्रफ यांनीही या माहितीला दुजोरा दिला. ‘‘आशिया चषकातील पाकिस्तान संघाच्या कामगिरीचा आढावा घेणे गरजेचे होते. महत्त्वाचे निर्णय घेताना मी हाफिज आणि मिसबा यांचाही सल्ला घेतो. आशिया चषकातील अपयशानंतर संघात मोठे बदल करणे गरजेचे आहे असे या दोघांचे मत होते. मात्र, बाबर आणि इंझमाम त्यांच्याशी सहमत नव्हते. अखेर पाकिस्तान क्रिकेट संघ आणि विश्वचषकाचा विचार करून आम्ही बाबर आणि इंझमाम यांच्या मतानुसार निर्णय घेण्याचे ठरवले,’’ असे अश्रफ म्हणाले. विशेषतः लेग-स्पिनर आणि उपकर्णधार शादाब खानच्या स्थानाबाबत वाद निर्माण झाला होता. परंतु बाबरने त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

हाफिजने आपले पद सोडताना काय म्हटले?

हाफिजने ‘एक्स’च्या (आधीचे ट्विटर) माध्यमातून आपला निर्णय जाहीर केला. “मी पाकिस्तान क्रिकेट तांत्रिक समितीतील पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी मानद सदस्य म्हणून काम करत होतो. मला ही संधी दिल्याबद्दल मी झाका अश्रफ यांचे आभार मानतो,’’ असे हाफिजने लिहिले. तसेच झाका अश्रफ यांना जेव्हा-जेव्हा पाकिस्तान क्रिकेटसाठी माझ्या प्रामाणिक सूचनांची आवश्यकता असेल, तेव्हा मी उपलब्ध असेन, असेही हाफिजने पुढे म्हटले होते. हाफिजच्या राजीनाम्यानंतर पुढच्याच दिवशी इंझमाम यांनी विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या अंतिम संघाची घोषणा केली होती. यात केवळ दोनच बदल करण्यात आले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy again in pakistan cricket know about what happened exactly print exp mrj