scorecardresearch

Premium

विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?

भारतीय क्रिकेट संघाने मोहाली येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने दर्जेदार कामगिरी करताना आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.

Indian cricket team
कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला? (Express Photo by Kamleshwar Singh)

भारतीय क्रिकेट संघाने मोहाली येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने दर्जेदार कामगिरी करताना आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. या सामन्यातील कामगिरीचा भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीतही फायदा झाला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (११५ गुण) मागे टाकत भारताने (११६ गुण) एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थान पटकावले. भारतीय संघ कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रमवारीतही अव्वल आहे. यावरून भारतीय संघाचे तीनही प्रारूपांतील सातत्य अधोरेखित होते.

भारतीय संघाने पाकिस्तानला कसे मागे टाकले?

या (सप्टेंबर) महिन्याच्या सुरुवातीपासून भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या तीनही संघांना एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थान मिळवण्याची संधी होती. भारताने आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले असले, तरी स्पर्धेअंती पाकिस्तानचा संघ क्रमवारीत अग्रस्थानी होता. पाकिस्तानला या स्पर्धेची अंतिम फेरीही गाठता आली नव्हती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या तीन एकदिवसीय सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची ही मालिका २-३ अशा फरकाने गमावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अग्रस्थानापासून दूर राहिला. याउलट भारताने आशिया चषकाच्या अंतिम लढतीत श्रीलंकेचा धुव्वा उडवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभूत केले. या कामगिरीसह भारताने एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले आणि अग्रस्थान मिळवले.

South Africa vs SriLanka odi match world cup
world cup 2023, SA vs SL: दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेशी सलामी
Indian women's cricket team won gold medal for the first time in Asian Games Smriti said We had tears in our eyes during the national anthem
Gold Medal: भारतीय महिला क्रिकेट संघाने एशियन गेम्स मध्ये प्रथमच जिंकले सुवर्णपदक; सामन्यानंतर स्मृती म्हणाली, “राष्ट्रगीतावेळी…”
India's last chance to prepare for the World Cup will Ashwin get a chance in the first match against Australia find out
IND vs AUS 1st ODI: वर्ल्डकपच्या तयारीची भारताला शेवटची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अश्विनला मिळणार का संधी?
spinners take all wickets against India
IND vs SL: श्रीलंका संघाने रचला इतिहास! भारताविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

हेही वाचा – गणेशोत्सव साजरा करण्यामागे टिळकांचा उद्देश काय होता? जाणून घ्या…

तीनही प्रारुपांत अव्वल असणारा भारत कितवा संघ?

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तीनही प्रारुपांत एकाच वेळी अग्रस्थानी असलेला भारत हा दक्षिण आफ्रिकेनंतरचा दुसरा संघ आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑगस्ट २०१२ मध्ये ही कामगिरी केली होती. त्यावेळी आफ्रिकेच्या संघात एबी डिव्हिलियर्स, जॅक कॅलिस, हाशिम अमला, ग्रॅमी स्मिथ, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्कल यांसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश होता.

भारतीय संघ विश्वचषकात अव्वल संघ म्हणून उतरणार का?

यजमान भारताचा संघ ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात अव्वल संघ म्हणून उतरणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यापैकी पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयी ठरला असला तरी ऑस्ट्रेलियाने अखेरचे दोन सामने जिंकल्यास ते क्रमवारीत अग्रस्थान मिळवतील. भारतीय संघाचे सध्या ११६ गुण असून तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचे १११ गुण आहेत. दक्षिण आफ्रिका (१०६ गुण) आणि विश्वचषकातील गतविजेता इंग्लंड (१०५ गुण) हे संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. मात्र, इंग्लंडचा संघ सध्या आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असल्याने क्रमवारीत आणखी बदल होऊ शकेल.

हेही वाचा – फळांचा रस विक्रेता ते ‘महादेव’ बेटिंग ॲप निर्माता… ‘बॉलिवुडमित्र’ सौरभ चंद्राकरचे पाकिस्तानातही जाळे!

कसोटी आणि ट्वेन्टी-२० मध्ये भारताच्या खात्यावर किती गुण आहेत?

कसोटी क्रमवारीतही अग्रस्थानासाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा संघ आव्हान देत आहे. या दोनही संघांच्या खात्यावर सध्या प्रत्येकी ११८ गुण आहेत. असे असले तरी भारतीय संघ अग्रस्थानी आहे. आपल्या गेल्या कसोटी मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला १-० अशा फरकाने नमवले होते, तर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध ॲशेस मालिकेत २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने या वर्षाच्या सुरुवातीला भारताचा दौराही केला होता. त्यावेळी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ अशी सरशी साधली होती. दुसरीकडे, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ २६४ गुणांसह अव्वल असून विश्वविजेता इंग्लंड संघ २६१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने आपल्या गेल्या पाचपैकी चार ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्या आहेत. भारताला केवळ वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत २-३ असा पराभव पत्करावा लागला होता.

खेळाडूंच्या क्रमवारीत भारतीयांचा कितपत दबदबा?

सांघिक यशासह भारतीय खेळाडूंना वैयक्तिक यशही मिळाले आहे. ट्वेन्टी-२० क्रमवारीत फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव, तर एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज अग्रस्थानी आहे. कसोटी क्रमवारीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे अनुक्रमे गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहेत. एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये शुभमन गिल (दुसऱ्या स्थानी), विराट कोहली (आठव्या) आणि रोहित शर्मा (दहाव्या) हे तीन भारतीय अव्वल दहामध्ये आहेत. भारतीय संघ आणि खेळाडूंना तीनही प्रारुपांत सातत्य राखण्यात यश आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Test odi t 20 how did the indian cricket team come out on top in all three forms of cricket print exp ssb

First published on: 25-09-2023 at 09:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×