विश्लेषण: दिल्लीत ‘आप’चे ‘डबल इंजिन’! दिल्ली महापालिका निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम? | Explained Aam Aadmi Party wins Delhi Municipal Election how it will impact National Politics print exp sgy 87 | Loksatta

Premium

विश्लेषण: दिल्लीत ‘आप’चे ‘डबल इंजिन’! दिल्ली महापालिका निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम?

राष्ट्रीय स्तरावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची भाजपला पर्याय म्हणून चर्चा सुरू

विश्लेषण: दिल्लीत ‘आप’चे ‘डबल इंजिन’! दिल्ली महापालिका निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम?
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत

हृषिकेश देशपांडे

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे दिल्ली विधानसभेपाठोपाठ महापालिकेतही त्यांची सत्ता आली आहे. भाजपची पालिकेतील पंधरा वर्षांची राजवट संपुष्टात आली आहे. तर काँग्रेसला दोन आकडी संख्या गाठता आली नाही. या निकालाने राष्ट्रीय स्तरावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची भाजपला पर्याय म्हणून चर्चा सुरू झाली आहे. या निकालाचे राष्ट्रीय स्तरावर परिणाम जाणवणार हे स्पष्ट आहे. दिल्ली विधानसभा आणि आता महापालिकेत आम आदमी पक्षाचे डबल इंजिन सरकार आले आहे.

सत्ताविरोधी लाटेचा भाजपला फटका…

जवळपास दीड कोटी मतदार असलेल्या दिल्ली पालिकेत जेमतेम ५० टक्के मतदान झाले. भाजपचा हक्काचा मतदार मतदानाला बाहेर पडला नाही तेथे पक्षाला फटका बसला. अर्थात भाजपला जवळपास ३९ टक्के मते आहेत. त्या अर्थाने त्यांनी आपली मतपेढी सुरक्षित ठेवली आहे. त्यात त्यांना वाढ करता आलेली नाही. त्यांचे बळ मात्र गेल्या वेळच्या १८१ वरून मोठ्या प्रमाणात घटले. गेली पंधरा वर्षे पालिकेत भाजप सत्तेत आहे. त्यामुळे कचरा असो वा सांडपाणी व्यवस्था यावरून जनतेत रोष होताच. त्याचा फायदा आम आदमी पक्षाने उठवला. दिल्लीत सत्ता असल्याने आरोग्य असो वा वीज बिल याबाबत केजरीवाल सरकारची कामगिरी उजवी आहे. त्याचा लाभ पालिकेत त्यांना मिळाला.

हेही वाचा – विश्लेषण: समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचे मुहूर्त का हुकले? तो कधी पूर्ण होणार?

भाजपचे प्रयत्न कमी पडले?

भाजपने सात मुख्यमंत्री तसेच १४ ते १५ केंद्रीय मंत्र्यांची फौज दिल्लीत प्रचारात उतरवली होती. मात्र भाजपकडे केजरीवाल यांच्या तोडीचा संपूर्ण दिल्लीत लोकप्रिय असा एकही नेता नाही. एके काळी भाजपकडे मदनलाल खुराना, साहिबसिंह वर्मा असे तगडे नेते होते. मात्र सध्या मात्र जनसंघापासून पक्षाची बृहत् दिल्लीवर हुकमत गाजवेल असे नेतृत्व नाही. जनसंघापासून भाजपची दिल्लीत एक मतपेढी आहे, जोडीला संघटनही आहे. ते याही वेळी दिसले. त्यामुळेच सत्ताविरोधी नाराजी असतानाही भाजपने जागांची शंभरी तरी पार केली.

‘आप’पुढे आव्हान

पालिकेत जरी सत्ता मिळाली असली तरी भाजपने आपपुढे आव्हान उभे केले. केजरीवाल यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया यांच्या विधानसभा मतदारसंघात आपचा पराभव झाला आहे. त्याचप्रमाणे सध्या कारागृहात असलेले आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्या विधानसभा मतदारसंघातही भाजपने मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे या दोघांवरही आरोप आहेत. मतदानापूर्वी काही दिवस आधी जैन यांच्या कारागृहात मालिश करून घेतानाच्या चित्रफिती बाहेर आल्या होत्या. मतदारांनी त्यांना धडा शिकवला. आपने जवळपास ४२ टक्के मते मिळवली आहेत. आता दिल्लीकरांना उत्तम प्राथमिक सुविधा देण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. भाजप फार जागा मिळवणार नाही असे आपचे नेते प्रचारात सांगत होते. प्रत्यक्षात कडवी झुंज झाली आहे. त्यात काँग्रेसची सारी मतपेढीच आपकडे सरकल्याचे चित्र आहे.

दीनवाणी काँग्रेस…

काँग्रेसचा राजधानीत अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. जेमतेम ११ टक्के मते आणि ९ जागा अशी काँग्रेसशी दारुण स्थिती आहे. काँग्रेसने जिंकलेल्या बहुतेक जागा या मुस्लिमबहुल भागांतील आहेत. दिल्लीत विधानसभेतही काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही. आताही पालिकेत त्यांच्या पदरी निराशा आली आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार आपकडे गेल्याचे स्पष्ट आहे. एके काळी सलग पंधरा वर्षे शीला दीक्षित या काँग्रेसच्या मुख्यमंत्री होत्या. मात्र आपने सत्ता काबीज केल्यावर दिल्लीतून काँग्रेस गायब चित्र आहे. देशाच्या राजधानीत सर्वच भागातून लोक वसतात. अशा वेळी दिल्लीचा कौल हा देशाचे चित्र काय असेल हे प्रतिबिंबित करणारा असतो. अशा वेळी पक्षाला जर मतदारांनी पूर्णपणे अव्हेरले असेल तर मग त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. भाजपप्रमाणे काँग्रेसकडेही दिल्लीत प्रबळ नेता नाही. या निकालातून आप आणि भाजप हे दोनच पर्याय दिल्लीकरांपुढे असल्याचे चित्र पालिका निकालातून दिसले.

राजकारणाचा रोख बदलणार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत झंझावाती प्रचार केला होता. दिल्ली पालिका आणि गुजरात, हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या तारखांवरून वाद झाला होता. केजरीवाल यांनी दिल्ली आणि गुजरातमध्ये वातावरणनिर्मिती करण्यात यश मिळवले होते. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष प्रचारात कुठेच नव्हता. भाजप पालिकेपासून ते लोकसभा निवडणूक सर्व शक्तीने लढते. त्यांचे प्रमुख नेते प्रचारात उतरतात. निकाल जरी दिल्ली पालिकेचा असला तरी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारी व्यक्ती म्हणून अरविंद केजरीवाल यांचे नाव आणखी पुढे सरकले आहे. हा पक्ष दोन ठिकाणी सत्तेत आहे. गुजरातमध्येही त्यांच्या कामगिरीची चर्चा आहे. दिल्लीचे निकाल काँग्रेससाठी विचार करायला लावणारे आहेत. भाजपसाठीही केजरीवाल यांना दिल्लीत शह देणे आव्हानात्मक असल्याचे निकालातून वारंवार दिसून आले आहे. केजरीवाल यांची आश्वासने आणि कामगिरी मतदारांना भावली आहेत हेच निकालातून दिसून येत आहे. राष्ट्रीय राजकारणात केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष एक स्थान निर्माण करत असल्याचा संदेश दिल्ली पालिका निकालाने दिला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:15 IST
Next Story
विश्लेषण: ८० हून अधिक लोकांचे प्राण घेणारा ‘Blackout Challenge’ चा ऑनलाईन ट्रेंड नेमका आहे तरी काय?