श्रीलंकेतील सीलोन वीज मंडळाचे (सीईबी) प्रमुख एमएमसी फर्दिनांदो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेतील एका ५०० मेगावॉट क्षमतेच्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट गौतम अदानी समूहाला देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्यावर कथितरित्या दबाव आणला असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर श्रीलंकेतील विरोधी पक्षांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली होती. यानंतर अचानक फर्दिनांदो यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. श्रीलंकेचे ऊर्जामंत्री कंचना विजेसेकरा यांनी आपण राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं आहे. सीईबीचे उपाध्यक्ष नलिंद यांच्यावर सध्या वीज मंडळाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फर्दिनांदो यांनी काय दावा केला होता?

फर्दिनांदो यांनी मन्नार जिल्ह्यातील प्रकल्पाबाबत हा आरोप केला होता. फर्दिनांदो यांनी शुक्रवारी कोलंबोत कायदे मंडळाच्या समितीपुढे बोलताना ५०० मेगावॉट क्षमतेच्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्यावर दबाव आणला. त्यानंतर राजपक्षे यांनी हा प्रकल्प अदानी समूहास देण्यास सांगितलं असा दावा केला होता. अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनीच आपल्याला ही माहिती दिली असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. नंतर मात्र त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेत बैठकीत आपण भावनेच्या भरात खोटं बोललो असं सांगितलं होतं.

राजपक्षेंचा ट्विटरच्या माध्यमातून खुलासा

राजपक्षे यांनी नंतर ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधी खुलासा केला. “मन्नार पवनऊर्जा प्रकल्पाचे काम एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा कंपनीला देण्यासाठी मी माझ्या अधिकाराचा वापर केल्याचा आरोप मी स्पष्टपणे फेटाळून लावत आहे. श्रीलंकत सध्या तीव्र वीजटंचाई असली तरी असे प्रकल्प होताना कोणत्याही प्रकारे अयोग्य प्रभाव टाकला जाणार नाही,” असं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं.

श्रीलंकेत विरोधक आक्रमक

पण महत्वाची बाब म्हणजे गौतम अदानी यांना श्रीलंकेत नुकतेच दोन मोठे कंत्राट मिळाले आहेत. हा त्यांचा तिसरा प्रकल्प आहे. श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा स्थितीत सरकार मागील दाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्राला प्रवेश देत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. दरम्यान संकटकाळात मोदी सरकराने श्रीलंकेला जानेवारीपासून आतापर्यंत ३ अरब डॉलरची मदत उपलब्ध करुन दिली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained sri lanka official who alleged pressure from pm narendra modi to award project to adani group resigns sgy