ओंकार हत्तीचा प्रश्न काय?

कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून आलेल्या हत्तींच्या कळपाने गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्र (दोडामार्ग, सावंतवाडी, चंदगड) आणि गोवा राज्यांत शेतकऱ्यांचे जीवन आणि शेती व्यवसाय धोक्यात आणला आहे. याच कळपातील सुमारे १० ते १२ वर्षांचा ‘ओंकार’ नावाचा एकटा हत्ती गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातून गोव्यात जाऊन तिथे भटकंती करून पुन्हा महाराष्ट्रात परतला आहे. या आक्रमक हत्तीला पकडण्यासाठी महाराष्ट्रासह, गोवा आणि कर्नाटक राज्येही प्रयत्नशील आहेत. पण तिन्ही राज्यांना ओंकार हत्तीला रोखण्यात यश आलेले नाही.

या हत्तीची वाटचाल कशी ?

ओंकार हत्ती गोव्यातून कळपापासून वेगळा होऊन भटकंती करत महाराष्ट्रात आला. इथे त्याने दोडामार्ग तालुक्यातील एका ७० वर्षीय वृद्धाला चिरडले. सरकारने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला, परंतु अतिवृष्टीमुळे हे शक्य झाले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमावर्ती भागात काही काळ वास्तव्य केल्यानंतर तो गोव्यात जाऊन तांबोसे, तोरसे, मोपा आणि पेडणे या ठिकाणी फिरत राहिला. १४ दिवसांच्या वास्तव्यात त्याने उत्तर गोव्यातील मोपा, कडशी मोपा, तोरसे आणि तांबोसे या भागातील भातशेती आणि नारळाच्या झाडांचे नुकसान केले. मग तो पुन्हा महाराष्ट्रात आला. इन्सुली, ओटवणे आणि वाफोली परिसरात त्याने वास्तव्य केले. मुंबई गोवा महामार्गावरही येत त्याने काही काळ वाहतूक अडवून धरली. सध्या तो याच परिसरात आहे.

वन विभागाकडून कोणत्या उपाययोजना ?

३१ डिसेंबरपर्यंत ओंकार हत्तीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या बचाव मोहिमेसाठी वन कर्मचारी, पशुवैद्याक आणि पोलीस दलातील कर्मचारी यांचा समावेश असलेली एक टीम तयार आहे. हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी ५० स्थानिक तरुणांना (हाकारे देणारे) नेमण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी कर्नाटकची मदत घेतली जाणार असून कर्नाटक कुमकी हत्तींसह (प्रशिक्षित हत्ती) तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शन करून ह्यओंकारह्णला शांत करणार आहेत अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हत्ती पकड मोहिमेतील अडचणी कोणत्या?

सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘ओंकार’ महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या कास, सातोसेमधून इन्सुली, वाफोली, भालवल परिसरात वावरत आहे. तिथे तेरेखोल नदी आहे. त्यामुळे हा परिसर हत्तीला पकडण्यासाठी योग्य नाही. तो योग्य जागी पोहोचल्यावर त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ओंकार हत्ती सध्या शांत आणि माणसाळल्यासारखा वाटत असला तरी कळपापासून दुरावला असल्याने तो बिथरण्याची शक्यता आहे. मोठे आवाज आणि गर्दीमुळेही तो आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरी भागापासून दूर मोकळ्या जागेत नेऊन त्याला पकडण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. कर्नाटक राज्याने या मोहिमेत सहकार्य देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्याला आपल्या राज्यात ठेवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे हत्ती कँम्प विकसित करून तिथे ओंकारसह इतर हत्तींना ठेवण्याचा प्रस्ताव वन विभागाच्या विचाराधीन आहे.

हत्ती पकड मोहीम का गरजेची ?

महाराष्ट्रात सध्या एकूण आठ हत्तींचा वावर आहे. यात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात सहा (ओंकारसह) तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात दोन हत्ती आहेत. हे सर्व हत्ती कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून आलेले आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच हत्ती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वावरत आहेत. अन्न, पाण्याच्या शोधात हे हत्ती वारंवार नागरी भागात येऊन बागायतीचे अतोनात नुकसान करतात. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर धावून जातात. त्यामुळे मानव आणि वन्यजीव असा संघर्ष उभा राहिला आहे.

स्थानिकांची मागणी काय?

उपद्रवी हत्तींना पकडून नैसर्गिक अधिवासात ठेवावे अशी मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात आहे. पण हत्तींना नियंत्रित करण्यात वन विभागाला यश आलेले नाही. वन विभाग, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद वाढवून मानव आणि वन्यजीव सहअस्तित्व या संकल्पनेवर काम करणे गरजेचे आहे. अन्यथा मानव आणि वन्यजीव संघर्ष अटळ असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.