-हृषिकेश देशपांडे

गुजरात विधानसभा निवडणुकीला जेमतेम महिना उरला आहे. १९९५पासून राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला यंदा काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षाने आव्हान दिले आहे. मध्यम आकाराचे हे राज्य असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे गृहराज्य. त्यामुळे येथील निकालाचा परिणाम देशाच्या राजकारणावर होईल. 

सरळ तिरंगी लढत…

गुजरातमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना जवळपास तीन दशके होत होता. मात्र यंदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने राज्यात वातावरणनिर्मिती करण्यात यश मिळवले आहे. पंजाबप्रमाणे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही त्यांनी जाहीर केला. पत्रकार इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केजरीवाल यांनी केली. राजकारणात संदेशांचे महत्त्व असते. त्यामुळे भले आम आदमी पक्षाला विजय मिळवता आला नाही तरी, ते किती जागा जिंकतात यावर त्यांची राष्ट्रीय राजकारणातील वाटचाल अवलंबून असेल. दुसरीकडे भाजपला गेल्या वेळी म्हणजे २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ९९ जागा जिंकता आल्या होत्या. अर्थात १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपने बहुमत मिळवले होते. मात्र केंद्रात सत्ता असतानाही तीन आकडी जागा जिंकण्यात पक्षाला अपयश येणे हा त्यांच्यासाठी धक्का होता. पटेल आरक्षण आंदोलन त्या वेळी भरात होते. आंदोलकांवर गोळीबाराची घटनाही होती. त्याची धग भाजपला जाणवली, परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसूत्रे हाती घेतल्यावर भाजपला सत्तेची नौका पार करता आली होती. यंदा परिस्थिती वेगळी आहे.

मोदींच्या करिश्म्यावरच भिस्त?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घकाळ गुजरातचे नेतृत्व केले. पक्ष संघटनेत जबाबदारी सांभाळताना १९८७मध्ये अहमदाबाद महापालिका त्यांनी भाजपला जिंकून दिली होती. आताही भाजपची भिस्त मोदींवरच आहे. अर्थात राज्यात पक्षाचे खोलवर संघटन आहे. गेल्या वेळी भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी ४९ टक्के मते मिळाली होती हे दुर्लक्षून चालणार नाही. काँग्रेसकडेही ३० ते ३५ टक्के अशी हुकमी मते आहेत. गेल्या वेळी तर विधानसभेला काँग्रेसने ४२ टक्क्यांच्या आसपास मते मिळवली होती. अगदी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ६० टक्क्यांवर मते मिळवत राज्यातील लोकसभेच्या सर्व म्हणजे २६ जागा जिंकल्या होत्या. त्या वेळीही काँग्रेसला ३० टक्क्यांवर मते होती. याचाच अर्थ काँग्रेसचा हमखास असा मतदार आहे. भाजपचाही पारंपरिक मतदार आहे. या दोघांच्या लढतीत आम आदमी पक्ष कोणाची मते घेणार यावर विधानसभेतील जागांचे गणित ठरणार आहे. शहरी भागात भाजपची स्थिती उत्तम आहे. राज्यात ६० ते ६५ शहरी मतदारसंघ आहेत. त्यातील बहुसंख्य जागा भाजपने गेल्या वेळी ६० टक्क्यांहून अधिक मते घेत जिंकल्या होत्या. त्यामुळे शहरी भागातील जागांवर आम आदमी पक्षाने काँग्रेसची जर मते घेतली तर भाजपला अधिक फायदा होईल. मात्र जर भाजपची मते मोठ्या प्रमाणात वळवण्यात आप यशस्वी झाले तरच शहरी मतदारसंघातील निकालांवर परिणाम होईल. अन्यथा शहरी जागांवर भाजपला रोखणे कठीण होईल असे चित्र आहे. 

महागाई कळीचा मुद्दा…

राज्यात २७ वर्षे भाजपची सत्ता आहे. यंदा महागाईचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी आहे. याखेरीज बेरोजगारीचा प्रश्नही गंभीर आहे. भाजप सत्तेत असल्याने या दोन्ही मुद्द्यांवर विरोधक कोंडी करत आहेत. अशा वेळी मोदींच्या नेतृत्वावरच भाजप निवडणुकीला सामोरा जात आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत भाजपचे तीन मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे मितभाषी आहेत. पहिल्यांदाच आमदार होऊनही, पटेल समुदायाची मतपेढी सांभाळण्यासाठी भाजपने त्यांच्याकडे राज्याची धुरा दिली. स्थानिक निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकल्या आहेत. अर्थात निकालानंतर भूपेंद्रभाईंकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद येईल हे आजच्या घडीला सांगता येणे कठीण आहे. भाजप नेतृत्व धक्कातंत्राद्वारे अन्य कोणालाही नेतेपदी आणू शकते. 

जनमत चाचण्यांचा कौल भाजपला

बहुसंख्य जनमत चाचण्यांनी भाजपला ११५ ते १३५ जागा मिळतील असे भाकीत वर्तवले आहे. राज्यात काँग्रेसचे दिग्गज नेते तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत माधवसिंह सोळंखी यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षाला १९८५मध्ये १४९ जागा मिळाल्या होत्या. हा विक्रम आहे. १९८०मध्येही काँग्रेसला १४१ जागा मिळाल्या होत्या. ‘खाम’ म्हणजेच क्षत्रिय, दलित, आदिवासी तसेच मुस्लीम या समीकरणाच्या आधारे त्यांनी हे यश मिळवले होते. पुढे हे समीकरण भेदत हिंदुत्वाच्या आधारे राज्यात भाजपने पकड निर्माण केली. २००२मध्ये भाजपला मिळालेल्या १२७ जागा ही त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी. आता वीस वर्षांनंतर भाजप दीडशे जागांचा विक्रम करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे अस्तित्व निदान माध्यमी चर्चेत तरी तितके ठळकपणे जाणवत नाही. त्या तुलनेत वातावरणनिर्मिती करण्यात आम आदमी पक्षाला यश आले आहे. या दोघांच्या मतविभागणीचा लाभ उठवत भाजप जागांचा विक्रम करणार काय, हा  प्रश्न आहे.