Premium

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत येणार! जगदंबा तलवार आणि वाघनखे इंग्लंडला कशी गेली ? काय आहे या शस्त्रांचा इतिहास…

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडला गेली कशी आणि या शस्त्रांचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल…

Jagadamba_Sword_Vaghalakha_Shivaji_Maharaj_England_Loksatta
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे (ग्राफिक्स : प्राजक्ता राणे, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून आणण्यात येणार आहेत. ”१ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक खात्याचा मंत्री म्हणून मी स्वत: व या विभागाचे सचिव तथा भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी लंडन येथे जात आहोत. ३ ऑक्टोबर रोजी लंडन येथे वाघनखे भारतात आणण्यासाठी एमओयू होणार आहे. त्यानंतर येत्या नोव्हेंबर महिन्यात वाघनखे भारतात येणार आहेत,” अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ती भारतीयांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वाघनखे आता भारतात येतील, मुळात छ. शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडला गेली कशी आणि या शस्त्रांचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दि. २ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे लवकरच भारतात आणणार आहोत, अशी घोषणा केली. ही तलवार आणि वाघनखे इंग्लंडवरून परत आणण्याचे प्रयत्न मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नोव्हेंबर २०२२ पासून सुरु केले. मुळात छ. शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडला गेली कशी आणि या शस्त्रांचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल…

‘जगदंबा’ तलवार इंग्लंडला कशी गेली ?

छत्रपती शिवाजी महाराजांकडे तीन मुख्य तलवारी असल्याचे उल्लेख सापडतात. ‘जगदंबा’, ‘भवानी’ आणि ‘तुळजी’ या तीन तलवारी महाराजांकडे होत्या. सध्या यातील ‘जगदंबा’ तलवार इंग्लंडला आहे. ऑक्टोबर १८७५ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजेच एडवर्ड सातवा भारतभेटीवर आला होता. तेव्हा भारतातील अनेक श्रीमंत राजांनी त्याला मौल्यवान वस्तू भेट स्वरूपात दिल्या. त्या काळात कोल्हापूर संस्थानाच्या गादीवर छत्रपती शिवाजी महाराज चौथे विराजमान होते. तेव्हा त्यांचे वय साधारण ११ ते १२ वर्षे होते. त्यांच्या अल्पवयाचा फायदा घेऊन कोल्हापूर संस्थानाकडे असणारी मौल्यवान शस्त्रे प्रिन्स ऑफ वेल्सला देण्याची गळ घालण्यात आली. यावेळी छ. शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार कोरीव काम करून भेट देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज वापरत असणारी जगदंबा तलवार कोल्हापूरच्या शस्त्रालयात होती आणि त्याच्यावर असणाऱ्या हिरे, माणिक, पाचू यांचे कागदोपत्री उल्लेख कोल्हापूर संस्थानाच्या दस्तावेजात सापडतात. तसेच प्रिन्स ऑफ वेल्स याला भारतभेटीदरम्यान मिळालेल्या नजराण्यांची यादी बनवण्यात आली आहे. ‘Catalogue of the collection of Indian arms and objects of art’ या नावाने हा कॅटलॉग प्रसिद्ध करण्यात आला. या कॅटलॉगमध्ये स्पष्टपणे छ. शिवाजी महाराज चौथे यांनी छ. शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार प्रिन्स ऑफ वेल्सला भेट दिली असा उल्लेख आहे. प्रिन्स ऑफ वेल्स यांनी छ. शिवाजी महाराज चौथे यांना परत भेट म्हणून एक तलवार दिली. ती आज कोल्हापूर संस्थानामध्ये ठेवलेली आहे.

‘जगदंबा’ तलवारीचे रूप

लंडन येथील सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल कलेक्शनमध्ये ‘जगदंबा’ तलवार ठेवण्यात आली आहे. राजा एडवर्ड सातवा याच्या शस्त्रास्त्रांच्या यादीमध्ये या तलवारीचा उल्लेख ‘a relic of Shivaji the Great’ असा करण्यात आला आहे, असे ‘शोध भवानी तलवारीचा’ पुस्तकाचे लेखक इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. या तलवारीचे चित्र रॉयल कलेक्शनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळाच्या माहितीनुसार या तलवारीची लांबी १२७.८ x ११.८ x ९.१ सेमी आणि या तलवारीच्या पात्याची लांबी ९५.० सेमी अथवा ३ फुटांपेक्षा थोडी अधिक आहे.

‘जगदंबा’ तलवार भारतात परत आणण्यासाठी या आधी झालेले प्रयत्न

नोव्हेंबर २०२२ मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनशी संपर्क साधून छ. शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु, याच्या आधीही ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या संदर्भानुसार पहिला प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला होता. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यासाठी ते लंडनला गेले असता, त्यांनी या तलवारीच्या परत मिळवण्यासंदर्भात प्रयत्न केले. त्यानंतर गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे मराठी कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांनी एका कवितेत तलवारीचा संदर्भ दिला आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी याबाबत पाठपुरावा केला. नंतर तत्कालीन मंत्री ए आर अंतुले यांनी तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु, आवश्यक कागदपत्रांअभावी त्यांना यश मिळाले नाही.

हेही वाचा : विश्लेषण : ‘अखंड भारता’ची कल्पना आणि इतिहास… नवीन संसद भवनातील ‘ते’ भित्तिचित्र काय सुचवते ?

वाघनखे इंग्लंडला कशी गेली ?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन येथील व्हिकटोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. ग्रँड डफ (हिस्ट्री ऑफ मराठाज् पुस्तकाचा लेखक) हा इसवी सन १८१८ ते १८२४ या काळात सातारा येथे ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील व्यवहार तो पाहत असे. त्याला ऐतिहासिक साधने जमवण्याची आणि इतिहास जाणून घेण्याची आवड होती. याच काळात त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजयांच्याकडून वाघनखे मिळवली आणि इंग्लंडला परत जाताना तो वाघनखे सोबत घेऊन गेला. पुढील काळात त्याच्या वंशजांनी ही नखे व्हिकटोरिया अल्बर्ट म्युझियमला भेट दिली. या म्युझियमच्या संकेतस्थळावर ग्रँड डफ यांनी ही वाघनखे आणल्याचा उल्लेख सापडतो. परंतु, याच वाघनखांनी छ. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता का याबाबत संदिग्धता आहे.

हेही वाचा : स्वतंत्र भारताला ‘इंडिया’ म्हणण्यास जिनांनी केला होता विरोध! जाणून घ्या भारत आणि इंडियामधील फरक…

या वाघनखांचे स्वरूप

वाघनखांना ‘वाघनख्या’ असेही म्हणतात. हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातील मुठीत लपवता येईल, असे एक शस्त्र आहे. या शस्त्राला वाघाच्या नखांचा आकार असतो. ही नखे पूर्ण पोलादी स्वरूपाची असतात. हे शस्त्र हातामध्ये धारण करून मूठ बंद केल्यावर अंगठ्या घातल्याप्रमाणे वरून दिसते. तीन ते पाच नखे असणारी वाघनखे मराठा साम्राज्याच्या काळात उपलब्ध होती. हिगीन्स आर्मरी म्युझियम, मॅसेच्युसेट्स, अमेरिका येथेही काही वाघनखे ठेवलेली आढळतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 15:59 IST
Next Story
विश्लेषण : मणिपूरमध्ये शांतता कधी प्रस्थापित होईल?