दरवर्षी पावसाळा आला की त्याबरोबर मुंबईच्या नाल्यांतील गाळ, नालेसफाईची कोट्यवधींची कंत्राटे, सफाईनंतरही नाल्यावर तरंगणारा कचरा आणि तुंबणारी मुंबई यावरून होणारी टीका टिप्पणी नित्याचीच… नाल्यातील कचरा काढल्यानंतरही सखलभागात पाणी का भरते, उद्दिष्टापेक्षा जास्त कचरा काढूनही मुंबईची ‘तुंबई’ का होते, कचरा खरोखरच काढला जातो का, या कचऱ्याचे पुढे काय होते याबाबत घेतलेला आढावा.

दरवर्षी नालेसफाई कशासाठी?

मुंबई चारही बाजूने समुद्राने वेढलेली असून बराचसा भाग हा खोलगट बशीसारखा सखल आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत अतिवृष्टी होत असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे पर्जन्यजल वाहिन्यांचे जाळे त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले आणि १५०८ छोटे नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यांतून पावसाचे पाणी समुद्रात जाते. मात्र नाले, गटारे यांमध्ये वर्षभर समुद्रातून येणारा व आजूबाजूच्या वस्त्यांमधून टाकला जाणारा कचरा, प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी सामान असा वाटेल तो कचरा साठत असतो. त्यामुळे नाले तुंबतात. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी हा गाळ काढणे आवश्यक असते. त्यामुळे पालिका दरवर्षी नदी व नाल्यातील गाळ काढण्यासाठी सुमारे २०० कोटींची कंत्राटे देत असते.

हेही वाचा…भारतीयांच्या आहारात कोरियन पदार्थांची रेलचेल; कोरियन खाद्यपदार्थ भारतात प्रसिद्ध कसे झाले?

किती गाळ काढण्यात येतो?

मुंबईतील विविध लहान व मोठ्या नाल्यांसह पेटीका नाले, तसेच रस्त्यांलगतच्या गटारांची साफसफाई या नालेसफाईत अंतर्भूत असते. नदी नाल्यांमध्ये साचलेला गाळ दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काढून कचराभूमीवर वाहून नेला जातो. मोठ्या नाल्यांतून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन, तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. एकूणच जवळपास साडेनऊ लाख मेट्रीक टन गाळ काढून मुंबई बाहेरील कचराभूमीवर नेण्यात येतो. या एकूण गाळापैकी ७५ ते ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतो. तर १० टक्के गाळ पावसाळ्यात आणि १० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येतो.

गाळ काढूनही पाणी का साचते?

पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा आढावा घेतला जातो. दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अंदाज लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. मात्र एखाद्या नाल्यात १ मीटर उंचीपर्यंत गाळ असेल तर तो सगळा काढून टाकला जात नाही. त्यापैकी केवळ १५ सेंमीपर्यंत गाळ काढला जातो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास मदत होते. सगळा गाळ काढणे खूप वेळखाऊ आणि प्रचंड खर्चिक असल्यामुळे केवळ पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील एवढा गाळ काढला जातो. परंतु, अनेकदा कंत्राटदार यात चलाखी करतात. एकाच ठिकाणचा गाळ काढून उद्दिष्ट पूर्ण करतात. त्यामुळे अनेकदा १०० टक्के गाळ काढूनही सखलभाग जलमय होण्याच्या घटना घडतात. यावेळीही १०० टक्क्यांपेक्षा अधिक गाळ काढण्यात आला. मात्र नाले तुंबल्यामुळे टीका होऊ लागली. तेव्हा पालिका प्रशासनाने नाल्यातील प्रवाह सुरू झाला का हे तपासण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते.

हेही वाचा…मिरची आणि मानवी उत्क्रांती यांचं काय नातं? तिखटजाळ असूनही आपण ती का खातो?

कंत्राटदार नालेसफाईत चलाखी करतात कशी?

नालेसफाईच्या कामात अनेकदा घोटाळे झाल्याचे उघडकीस आले आहे. उद्दिष्टाइतका गाळच न काढणे, गाळात बांधकामाचा राडारोडा मिसळणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. नाल्यातून काढलेला गाळ भरून तो पुढे वजन करून कचराभूमीत टाकला जातो. गाळामध्ये सगळा कचरा, प्लास्टिक, लाकडी सामान, बाटल्या असे वाट्टेल ते असते. हा कचरा ओला असताना वाहून नेला तर त्याचे वजन जास्त भरते. त्यामुळे कंत्राटदाराला जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे हा गाळ नाल्याच्या काठावर सुकवण्यासाठी ठेवला जातो. गाळ सुकला की तो कचराभूमीवर नेला जातो. मात्र अनेकदा काठावर ठेवलेला गाळ पावसामुळे पुन्हा नाल्यात पडतो. मग पुन्हा तोच गाळ काढायचा आणि उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दाखवायचे अशी चलाखी काही कंत्राटदार करतात. तर काढलेल्या गाळाचे वर्गीकरण केलेले नसल्यामुळे हा सगळा कचरा कचराभूमीवर तसाच जातो. यावरून ओला व सुका कचरा वर्गीकरणाचा पालिकेचा विसर पडलेला दिसतो.

नालेसफाईवर लक्ष ठेवणारी यंत्रणा प्रभावी आहे?

पालिकेने आता नालेसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून खास यंत्रणा उभारली आहे. गाळ वाहून नेणाऱ्या डंपरवर व्हीटीएस यंत्रणा जोडली आहे. ही यंत्रणा पालिकेच्या सर्व्हरला जोडली आहे. क्षेपणभूमीवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवणे, डंपर रिकामा करतानाचे छायाचित्रण करणे, रिकाम्या डंपरचे वजन करणे अशा अटी कंत्राटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये अनेकदा व्हीटीएस यंत्रणा दुसऱ्याच गाडीवर बसवून गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने कितीही चांगली यंत्रणा आणली तरी त्यात पळवाटा शोधणारे कंत्राटदार आणि अधिकारी यांचे साटेलोटेच जड ठरते.

हेही वाचा…तब्बल ३० वर्षे सत्तेत असलेल्या आफ्रिकन काँग्रेसला निवडणुकीत फटका; तरीही हा पक्ष सत्तेत कसा येत आहे?

नाल्यात पडणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण का नाही?

नाल्यात आजूबाजूच्या झोपडपट्टीतून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर पालिकेला गेल्या कित्येक वर्षात उत्तर सापडलेले नाही. काही वर्षांपूर्वी लहान नाले आच्छादित करण्याचा प्रयोग पालिकेने केला होता. मात्र आच्छादन तोडून त्यात कचरा टाकण्याच्या घटना घडल्या. तर मोठ्या नाल्यांच्या बाजूने संरक्षक भिंत बांधली तरी त्यावरून कचरा फेकण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे पालिकेने आता नाल्यांच्या सभोवती उंच जाळ्या लावण्याचे ठरवले आहे. मात्र या सगळ्याला आता पुढल्या वर्षीचा मुहूर्त मिळणार आहे. परंतु, झोपडपट्ट्यांमध्ये कचरा संकलन अधिक प्रभावी केल्यास नाल्यात कचरा फेकण्याची समस्या दूर होऊ शकते. परंतु, पालिकेच्या यंत्रणेलाच या विषयावर तोडगा काढायचा आहे की नाही याबाबत सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे. घन कचरा विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभाग या दोघांच्या हद्दीतील वादामुळे नाल्यात दरवर्षी कचरा साचत जातो. नालेसफाईबरोबरच पालिकेच्या तिजोरीच्या सफाईलाही हातभार लावत असतो.