डेन्मार्कमधील अन्न सुरक्षा प्राधिकरणाने दक्षिण कोरियातील तीन प्रकारच्या मसालेदार इन्स्टंट नूडल्सची उत्पादने बाजारातून परत मागे घेण्याची कारवाई केली आहे. या नूडल्समध्ये असलेल्या मसाल्यांमुळे ‘तीव्र विषबाधा’ होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. डॅनिश अन्न सुरक्षा प्राधिकरणानुसार, “या नूडल्समध्ये ‘कॅप्सेसन’ हा घटक इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की तो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषत: लहान मुलांना त्याचा अधिक धोका आहे. कॅप्सेसन या रसायनामुळेच मिरचीमध्ये तिखटपणा येतो.

मिरची खाल्ली की शरीरात काय घडतं?

मिरचीमधील ‘प्लेसेंटा’मध्ये म्हणजेच बिया मिरचीला जिथे चिकटतात, त्या ठिकाणच्या पांढऱ्या त्वचेमध्ये कॅप्सेसन हे रसायन आढळते. शिमला मिरची (Capsicum) प्रजातींच्या वनस्पतींमधील फळांमध्ये हे रसायन आढळून येते. ख्रिस्तोफर कोलंबसमुळेच दक्षिण आणि मध्य अमेरिकेतून उर्वरित जगामध्ये शिमला मिरची पसरली. हे रसायन मानवी शरीरावरील नाक, तोंड, त्वचा आणि आतील भागामध्ये असणाऱ्या TRPV1 या संवेदी चेतातंतूशी रासायनिक प्रतिक्रिया करते. आपल्या शरीरात असणारे हे चेतातंतू उष्णता आणि वेदनेची जाणीव करून देण्यासाठी काम करत असतात. सामान्यत: ते उष्णतेमध्ये वाढ झाल्यानंतर सक्रिय होतात. मात्र, ‘कॅप्सेसन’ हे रसायन उष्णता वाढलेली नसतानाही ती वाढल्याचे भासवून या चेतातंतूना फसवण्याचे काम करते. त्यामुळे जणू आपल्या शरीराला आग लागली असून उष्णता प्रचंड वाढली आहे, असा समज मेंदूचा होतो. या सगळ्याचा परिणाम म्हणून मिरची खाल्ल्यानंतर आपल्याला प्रचंड वेदना होतात, जळजळ झाल्याची भावना निर्माण होते आणि भाजल्यासारखे वाटू लागते. या सगळ्या निर्माण झालेल्या संवेदनांना शांत करण्यासाठी आपले शरीर प्रतिक्रिया द्यायला लागते. त्यातूनच मग आपल्याला प्रचंड घाम फुटतो आणि चेहरा लाल होतो. आपले नाक गळायला लागते, तर डोळ्यातून पाणी यायला लागते. थोडक्यात, आपले शरीर उष्णता कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला लागते. याचाच परिणाम म्हणून अतिसार आणि पोटात गोळा येणे यांसारख्या समस्याही निर्माण होतात.

हेही वाचा : तब्बल ३० वर्षे सत्तेत असलेल्या आफ्रिकन काँग्रेसला निवडणुकीत फटका; तरीही हा पक्ष सत्तेत कसा येत आहे?

उत्क्रांतीशी असलेला सहसंबंध

२००१ मध्ये जीवशास्त्रज्ञ जोश टेक्सबरी आणि गॅरी नभान यांनी काही पक्षी आणि उंदरांसोबत एक प्रयोग केला. त्यांनी पक्ष्यांना आणि उंदरांना मिरची खायला दिली. त्यांना असे आढळून आले की, उंदरांनी मिरची खाणे टाळले, तर पक्ष्यांनी जणू काही कँडी खायला दिल्यासारखी मिरचीही गपागपा खाल्ली. यावरून या जीवशास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष मांडला की, पक्ष्यांमध्ये TRPV1 हे चेतातंतू नसतात, तर उंदीर आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये ते असतात. टेक्सबरी यांना पुढे असेही आढळून आले की, पक्षी निसर्गामध्ये बीज पसरवण्याचेही काम करतात. कोणतेही फळ खाल्ल्यानंतर उंदरासारखे सस्तन प्राणी त्यातील बिया चावून खातात, तर पक्षी ते न चावताच गिळतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेमधून बियांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. या कारणांमुळेही मिरचीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर जगभरात झाला आहे. नंतरच्या काही संशोधनात असेही आढळून आले आहे की. हे कॅप्सेसन रसायन विशिष्ट प्रकारची बुरशी आणि कीटकांपासून संरक्षण करते. मात्र, कॅप्सेसनच्या निर्मितीसाठी निसर्गाला अधिक मेहनत घ्यावी लागते. कारण मिरचीचे झाड वाढण्यासाठी नायट्रोजन आणि पाणी मोठ्या प्रमाणावर लागते. त्यामुळेच पाण्याची कमतरता निर्माण होऊन ही झाडे दुष्काळासही हातभार लावतात. (संदर्भ : ‘व्हाय आर नॉट ऑल चिलीज् हॉट’ : डेव्हीट हाक)

तरीही माणसाला मिरची का आवडते?

थोडक्यात, मिरचीचे सेवन सस्तन प्राण्यांनी करू नये, अशाच प्रकारे ती विकसित झाली आहे. तरीही माणसासहित अनेक सस्तन प्राण्यांना तिचे सेवन करणे आवडते. आज मिरचीच्या तीन हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. त्या रंग, चव आणि तिखटपणाच्या बाबतीतही वैविध्य देतात. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मसालेदार पदार्थांबद्दलचे माणसाला असलेले हे प्रेम त्यांच्याकडे असलेल्या प्रतिजैविक फायद्यांमुळे निर्माण होते. उष्ण हवामान असलेले देश हे थंड हवामान असलेल्या देशांपेक्षा जास्त प्रमाणात मसाल्यांचा वापर करतात. (संदर्भ : ‘डार्विनियन गॅस्ट्रोनॉमी: व्हाय वी युज स्पायसेस’ (१९९८) : जीवशास्त्रज्ञ जेनिफर बिलिंग आणि पॉल डब्ल्यू शर्मन) कारण उष्ण वातावरणामध्ये अन्न जास्त वेगाने खराब होते. अमेरिकेतील मूळचे रहिवासी मिरचीचा वापर पदार्थांना फक्त मसालेदार करण्यासाठी नाही तर त्यांना जतन करण्यासाठीही करतात.

हेही वाचा : ‘देशद्रोहा’वर स्थगिती, गुन्हा दाखल करण्याचा कालावधी समाप्त; अरुंधती रॉय यांच्यावर ‘यूएपीए’ का लावण्यात आला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावधगिरी बाळगणे गरजेचे

असे असले तरीही मिरचीचे अधिक प्रमाणात सेवन करणे धोकादायक ठरू शकते. हे रसायन शरीरात अधिक प्रमाणात गेल्यास छातीत जळजळ, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल वेदना आणि अतिसार होऊ शकतो. शिवाय कॅप्सेसनचे दीर्घकाळ अधिक सेवन केल्याने अनेक जुनाट गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकार होऊ शकतात.