चहा हे भारतात सर्वाधिक सेवन होणारे पेय. जगातील चहा उत्पादकांत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आपल्याकडील ७० टक्के चहा हा देशांतर्गत मागणी पुरवण्यातच संपतो. चहाला निमित्त कशाला हवे, असे येथे नेहमीच गमतीने म्हटले जाते. त्यामुळे सकाळी उठल्यावर तरतरी येण्यासाठी ते रात्रीच्या जेवणानंतर कधीही चहा घेण्याची सवय दिसून येते. मात्र चहाचे सेवन किती करावे, अतिरिक्त सेवनाचे परिणाम काय, त्याचबरोबर भारतात सर्वाधिक प्रचलित असलेला दुधाचा चहा आरोग्यास अपायकारक असतो का या मुद्द्यांचा विचार क्रमप्राप्त ठरतो. कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) नुकत्याच जाहीर केलेल्या एका संशोधन अहवालात दूध घातलेला चहा पिणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे. कॉफीबाबतही असाच इशारा देण्यात आला आहे.

संशोधन काय सांगते?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय पोषण संस्थेने (एनआयएन) केलेल्या संशोधनामध्ये कॅफिनयुक्त पेयांमध्ये असलेले टॅनिन हे लोह शोषण्यास अडथळा आणू शकते. टॅनिन पोटातील लोहासाठी प्रतिरोधक समजले जातात. ज्यामुळे शरीरात लोहाची कमतरता आणि अशक्तपणा यांसारखी परिस्थिती उद्भवते. कॉफी आणि चहाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि ते हृदयाच्या अनियमिततेस कारणीभूत ठरते. चहा आणि कॉफीमधील कॅफिन आपल्या शरीराच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते. त्यामुळे त्याचे व्यसन लागते.

हेही वाचा : जेव्हा अटलबिहारी वाजपेयींना द्यावा लागला होता राजीनामा; काय घडलं होतं १९९६ लोकसभा निवडणुकीत?

चहा कॉफीमध्ये कॅफिन किती असते?

सातत्याने चहा व कॉफीच्या प्रत्येक घोटाबरोबर शरीरात कॅफिन जाते. चहा व कॉफीच्या माध्यमातून शरीरात जाणाऱ्या कॅफिनचे प्रमाण आयसीएमआरकडून मोजण्यात आले आहे. त्यानुसार कॉफीच्या १५० मिलीमध्ये ८० ते १२० मिलीग्रॅम कॅफिन असते, तर इन्स्टंट कॉफीमध्ये ५० ते ६५ मिलीग्रॅम इतके कॅफिन असते. त्याचप्रमाणे, चहात ३० ते ६५ मिलीग्राम कॅफिन असते. आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दररोज ३०० मिलीग्रॅमपेक्षा अधिक कॅफिन सेवन करू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे.

मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) राष्ट्रीय पोषण संस्थेच्या (एनआयएन) माध्यमातून देशात खाण्या- पिण्याच्या आरोग्यदायी सवयींना प्राेत्साहन देण्यासाठी १७ नवीन आहार मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यात चहा आणि कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन करण्याबाबत नागरिकांना सावध राहण्याची शिफारस केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांमधून वैविध्यपूर्ण आहार आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले आहे. दुधाचा चहा पिण्याचे टाळावे तसेच जेवणानंतर लगेच चहा, कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पेये घेणे टाळावे. जेवणापूर्वी आणि नंतर किमान एक तास चहा पिऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा : गोपी थोटाकुरा ठरले पहिले भारतीय अंतराळ पर्यटक; अंतराळातील पर्यटन म्हणजे काय? प्रवासासाठी किती खर्च येतो?

दुधाशिवाय चहा न पिण्याचे फायदे आहेत का?

दुधाच्या चहाचे सेवन करणे हे अनेकांना आवडत असले तरी दुधाचा चहा आरोग्यास घातक असल्याचे संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी दुधाचा चहा पिण्याचे काही फायदेही स्पष्ट केले आहेत. दुधाशिवाय चहा प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीचे आजार कमी होतात. तसेच पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, असे आयसीएमआरने जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : उष्माघाताने शाहरुख खान रुग्णालयात; उष्णतेचा शरीरावर कसा होतो परिणाम? उष्माघातापासून कसे राहावे सुरक्षित?

चहा, कॉफीच्या अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम?

चहा व कॉफीच्या अतिरिक्त सेवनाने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह खूप महत्त्वाचे आहे. हिमोग्लोबिन संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचे वाहक म्हणून काम करते. लोहाच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्तक्षयासारखी (ॲनिमिया) परिस्थिती विकसित होते. त्यामुळे शरीर थकवा, दम लागणे, वारंवार डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा फिकट पडणे, केस गळणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दीर्घकाळ आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी जागरूकता आणि चहा, कॉफीचे माफक सेवन करणे आवश्यक असल्याचे आयसीएमआरने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे आयसीएमआरने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तेल, साखर, मीठ, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, मांस आणि मासे यांचेही मर्यादित सेवन करण्याची शिफारस केली आहे. एकंदरीत आयसीएमआरने मार्गदर्शक तत्त्वे कॅफिनशी संबंधित फायदे आणि संभाव्य जोखीम या दोन्हींचा विचार करणाऱ्या आरोग्यदायी आहाराच्या सवयींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जाहीर केली आहेत.