-राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने बुधवारी नवीन रामसर स्थळांची घोषणा केली. त्यामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता ६४ झाली आहे. देशातील एकूण पाणथळ क्षेत्रापैकी सुमारे दहा टक्के क्षेत्रफळ आता रामसर पाणथळ प्रदेशात आहे. रामसर स्थळांचा दर्जा मिळणे हे त्या स्थळाच्या संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने नक्कीच स्वागतार्ह, पण तो मिळाल्यानंतर हे संरक्षण व संवर्धन होते का, हाही प्रश्न आहे.

रामसर स्थळांची सुरुवात कधी झाली?

१९६० मध्ये युरोपात पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर १९६२मध्ये मार्शलँड आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी परिषद भरवण्यात आली. त्यानंतर १९७१मध्ये इराणमधील रामसर या ठिकाणी पाणथळ जागांच्या संदर्भात एक परिषद झाली. यात या जागा संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन १८ देशांनी त्यावर सहमती दर्शवली. १९७४मध्ये ऑस्ट्रेलियातील कोबोर्ग पेनिन्सुलाच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. जगातील ही संवर्धनासाठी निवडण्यात आलेली पहिली पाणथळ जागा ठरली आणि ते रामसर स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले.

रामसर स्थळ घोषित करण्याचे निकष काय?

रामसर परिषदेत ‘रामसर स्थळ’ घोषित करण्यासाठी नऊ वेगवेगळे निकष ठरवण्यात आलेत. पहिला निकष म्हणजे नैसर्गिक वा अर्ध-नैसर्गिक, पण दुर्मीळ पाणथळ ठिकाण, दुसऱ्या निकषात त्याठिकाणी आढळणाऱ्या संकटग्रस्त वन्यजीव प्रजाती संवर्धनसाठी असलेले महत्त्व, तिसरा निकष त्या विशिष्ट जैवभाैगोलिक प्रदेशातील वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व, चौथा निकष वनस्पती व वन्यजीवांच्या जीवनचक्रातील त्या पाणथळाचे महत्त्व, पाचवा व सहावा निकष पक्ष्यांसंबंधी असून यात २० हजार पाणपक्ष्यांचा आढळ किंवा एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का पक्ष्यांच्या आढळ, सातवा आणि आठवा निकष स्थानिक मत्स्यप्रजातींचा आढळ व त्या पाणथळीचे महत्त्व आणि नववा निकष म्हणजे पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का आढळ असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात या निकषात बसणारी ठिकाणे कोणती?

जून २०१९ मध्ये नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या रूपाने महाराष्ट्राला पहिले रामसर स्थळ मिळाले. तर नोव्हेंबर २०२० मध्ये लोणार या उल्कापातातून निर्माण झालेल्या सरोवराला रामसरचा दर्जा देण्यात आला. औरंगाबाद येथील जायकवाडी पक्षी अभयारण्य, मुंबई येथील माहूल शिवडीची खाडी, ठाणे खाडी, सोलापूर जिल्ह्यातील उजनीचे धरण, जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदराच्या पश्चिमेला अरबी समुद्रात १४ किलोमीटर अंतरावर असलेला द्वीपसमूह म्हणजेच वेंगुर्ला रॉक्स ही सर्व स्थळे पक्षी संपन्नतेच्या निकषात बसणारी आहेत.

रामसर स्थळे जाहीर, पण पुढे काय?

रामसर स्थळांबाबत झालेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार हे स्थळ घोषित केल्यानंतर त्याठिकाणी संरक्षण व संवर्धनासाठी कामाची सुरुवात केली जाते. मात्र, भारतातील अधिकांश रामसर स्थळांमध्ये ही सुरुवातच झालेली नाही. बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातातून निर्माण झालेले लोणार सरोवर हे रामसर स्थळ घोषित करण्यात आले. त्याच्या संवर्धनासाठीही विशेष पावले उचलली गेली नाहीत. अशी अनेक रामसर स्थळे आहेत. महाराष्ट्रात दोन रामसर स्थळे आहेत, त्यातील नांदूरमध्यमेश्वरात पक्ष्यांचे वैभव आहे. मात्र, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना देखील संमेलने घेण्याव्यतिरिक्त अशा स्थळांच्या संरक्षण व संवर्धनासाठी पावले उचलताना दिसून येत नाही. रामसर स्थळाचा दर्जा मिळणे म्हणजे आयएसओ प्रमाणपत्र मिळण्यासारखे आहे. त्या मानकांची पूर्तता केली नाही तर ते रामसर स्थळांच्या यादीतून काढताही येते.

भारतात एकूण रामसर स्थळे किती?

२०१२पर्यंत भारतात २६ रामसर स्थळे होती. गेल्या दशकात त्यात मोठी वाढ झाली आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता ६४ झाली आहे. जुलै २०२२ मध्ये पाच नव्या रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली. यात तामिळनाडूतील करिकिल्ली पक्षी अभयारण्य, पल्लीकारणाई खाजण राखीव वन, पिचावरम कांदळवन, मध्य प्रदेशातील सख्या सागर, मिझोराममधील पाला पाणथळचा समावेश आहे. तर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने नुकतेच नवीन रामसर स्थळांची घोषणा केली. या नवीन दहा स्थळांमध्ये तामिळनाडू राज्यातील कूथनकुलम पक्षी अभयारण्य, मन्नार मरीन बायोस्फीअर संवर्धन, वेंबन्नूर पाणथळ कॉम्प्लेक्स, वेल्लोडे पक्षी अभयारण्य, वेदांतंगल पक्षी अभयारण्य, उदयमार्थंडपुरम पक्षी अभयारण्य या सहा तसेच गोव्यातील नंदा तलाव, कर्नाटकमधील रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य, मध्यप्रदेशमधील सिरपूर पाणथळ आणि ओडिशामधील सातकोसिया घाटचा समावेश आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India adds 10 new wetlands to the ramsar sites list what does it means print exp scsg
First published on: 08-08-2022 at 07:48 IST