SCO Summit 2025 India China, Panchsheel History : चीनमधील तियान्जिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३१ ऑगस्ट) चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत सीमावादापलीकडे जाऊन विविध क्षेत्रांमध्ये एकमेकांच्या देशांना सहकार्य करण्याची चर्चा झाली. या बैठकीनंतर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपापले निवेदन जारी केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात पंचशील तत्त्वांचा उल्लेख करण्यात आला आणि त्याचे पालन करायला हवे, असं नमूद करण्यात आलं. दरम्यान, पंचशील तत्त्व म्हणजे काय? त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं की, ऑक्टोबर २०२४ मध्ये कझान येथे झालेल्या बैठकीनंतर भारत व चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये सकारात्मक गती आणि स्थिर प्रगती झाली आहे. या प्रगतीचे पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांनी स्वागत केलं आहे. दोन्ही देश विकासाचे भागीदार आहेत, प्रतिस्पर्धी नाहीत आणि त्यांच्यातील मतभेद हे वादात रूपांतरित होऊ नयेत, अशी भारत आणि चीनची भूमिका आहे. दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात ‘शांततापूर्ण सहजीवनाच्या पंचसूत्री’ (Five Principles of Peaceful Coexistence) अर्थात, पंचशील तत्त्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. “चीन आणि भारताच्या जुन्या पिढीतील नेत्यांनी ७० वर्षांपूर्वी ज्या शांततापूर्ण सहजीवनाच्या पंचसूत्रीचा पुरस्कार केला, त्याचं पालन केलं पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे,” असं या निवेदनात नमूद केलं आहे.

काय आहे पंचशील तत्त्वांचा इतिहास?

१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची (PRC) निर्मिती झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी आपापसांतील संबंधांची एक रूपरेषा तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तिबेटचे भवितव्य हा एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा होता. अनेक बैठका, तसेच वाटाघाटीनंतर २९ एप्रिल १९५४ रोजी ‘चीनचा तिबेट प्रदेश आणि भारत यांच्यातील व्यापार व व्यवहार करार’ (Agreement on Trade and Intercourse between the Tibet region of China and India) यावर स्वाक्षरी करण्यात आली. याच करारामध्ये पंचशील म्हणजेच शांततापूर्ण सहजीवनाच्या पाच तत्त्वांचा समावेश करण्यात आला.

आणखी वाचा : एक फोन कॉल आणि भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव; मोदी-ट्रम्प यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

पाच पंचशील तत्त्वे कोणती?

  • परस्पर प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी आदर : प्रत्येक देशाने दुसऱ्या देशाच्या भूभागाचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे.
  • परस्पर अनाक्रमण : कोणत्याही देशाने दुसऱ्या देशावर हल्ला न करणे किंवा आक्रमक कृती न करणे.
  • परस्पर अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे : कोणत्याही देशाच्या अंतर्गत राजकारण किंवा धोरणांमध्ये हस्तक्षेप न करणे.
  • समानता आणि परस्पर लाभ : दोन्ही देशांनी समानतेवर आधारित आणि परस्पर फायद्यासाठी संबंध ठेवणे.
  • शांततापूर्ण सहजीवन : मतभेद असूनही भारत आणि चीनने शांततेने आणि सलोख्याने एकत्र राहणे.

पंचशील तत्त्वांचे जनक कोण? तज्ज्ञांमध्ये मतभेद

दरम्यान, पंचशील तत्त्वांचे जनक कोण? यावरून आजही अनेक तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काही लोक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना या सिद्धांताची निर्मिती करण्याचे श्रेय देत असले तरी अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, आज ओळखली जाणारी पंचशील तत्वे प्रथम चीनचे झोऊ एनलाई यांनी तयार केली होती. नेहरूंनीही विविध प्रसंगी असेच विचार व्यक्त केले होते. सप्टेंबर १९५५ मध्ये लोकसभेत ‘पंचशील’ची व्याख्या करताना नेहरू म्हणाले, “आम्ही जे स्वतंत्र धोरण स्वीकारलं आहे, ते अभिमान किंवा अहंकारानं स्वीकारलेलं नाही. जोपर्यंत आपण भारताच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील मूल्यांशी प्रामाणिक आहोत, तोपर्यंत आपण याशिवाय दुसरं काहीही करू शकणार नाही. आम्ही सर्व प्रकारच्या विचार आणि कल्पनांचं स्वागत करतो; पण तरीही आमचा स्वतःचा मार्ग निवडण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. हेच पंचशील तत्त्वांचं सार आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन भारत-चीन संबंध सुधारण्याबाबत चर्चा केली.

भारताने पंचशील तत्त्वांचा कसा वापर केला?

भारत-चीन संबंधांना दिशा देण्यासाठी आखली गेलेली पंचशील तत्त्वं आज जागतिक स्तरावर शांतता व सहअस्तित्वाचं सूत्र मानली जातात. चीननं पंचशील तत्त्वांना आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी मार्गदर्शक तत्त्वज्ञान म्हणून मांडलं, तर भारतानं सुरुवातीला त्याकडे प्रामुख्याने द्विपक्षीय संबंधांच्या चौकटीत पाहिले. मात्र, शीतयुद्ध तीव्र होत असताना भारतानंदेखील पंचशील तत्त्वांकडे सहअस्तित्वाचा पर्यायी मार्ग म्हणून पाहिलं. माजी आयएफएस अधिकारी चंद्रशेखर दासगुप्ता लिहितात, “पाकिस्तान अमेरिकेचा मित्रदेश झाल्यानंतर शीतयुद्ध भारताच्या दारात पोहोचलं होतं. त्यावेळी नेहरूंच्या पंचशील तत्त्वांच्या प्रचाराला नवा आयाम मिळाला. पंचशील हा भारताच्या शेजारील भागात ‘शांतता क्षेत्र’ निर्माण करण्याचा एक मार्ग आहे, असं नेहरूंना वाटत होतं.” दरम्यान, तिबेट करारावर स्वाक्षरी केल्यानंतर लवकरच भारत व चीन यांच्यातील संबंध बिघडले. मात्र, तरीही ‘पंचशील’मध्ये समाविष्ट असलेली तत्त्वं त्या काळात स्वाक्षरी झालेल्या इतर आंतरराष्ट्रीय करारांमध्येही स्वीकारली गेली.

हेही वाचा : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली? प्रकरण काय?

परराष्ट्र मंत्रालयानं कराराच्या ५० वर्षांनंतर प्रसिद्ध केलेल्या दस्तऐवजात म्हटलं की, एप्रिल १९५५ मध्ये २९ आशियाई-आफ्रिकन देशांच्या बांडुंग परिषदेनं जारी केलेल्या जाहीरनाम्यात शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या १० तत्त्वांमध्ये पंचशील तत्वांचा समावेश करण्यात आला. ११ डिसेंबर १९५७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं स्वीकारलेल्या शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या ठरावात ‘पंचशील’ची सार्वत्रिक उपयुक्तता पुन्हा अधोरेखित झाली. हा ठराव भारत, युगोस्लाव्हिया व स्वीडन यांनी सादर केला होता. बेलग्रेडमध्ये झालेल्या अलिप्त राष्ट्र परिषदेनं ‘पंचशील’ तत्त्वांना अलिप्ततावादी चळवळीचा मुख्य गाभा म्हणून स्वीकारले.

वाजपेयींनी २२ वर्षांपूर्वी काय म्हटलं होतं?

भारत-चीन संबंधांच्या दीर्घ आणि चढ-उतारांच्या प्रवासात पंचशील तत्त्वांचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्याचं एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे- तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं २३ जून २००३ रोजी बीजिंग विद्यापीठातील भाषण. “शेजारी देश एकमेकांशी खरी मैत्री निर्माण करू इच्छित असतील, तर सर्वप्रथम त्यांना आपापसांतील विवाद दूर करावे लागतात. काही दशकांच्या खंडानंतर भारत आणि चीननं हा महत्त्वाचा प्रवास सुरू केला आहे. आम्ही यात चांगली प्रगती केली आहे. मला विश्वास आहे की- दोन्ही देश शांततापूर्ण सहजीवनाच्या पाच तत्त्वांचं काटेकोर पालन करतील. एकमेकांच्या चिंता संवेदनशीलतेनं समजून घेऊन समानतेचा आदर राखतील. त्यामुळे भारत व चीनचा प्रवास अधिक वेगाने पुढे जाईल आणि आपापसांतील मतभेद कायमचे मागे पडतील. दरम्यान, वाजपेयींच्या त्या भाषणानं त्या काळातील भारत-चीन संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला नवी बळकटी मिळाली होती. आता पंतप्रधान मोदी यांनी चीनचा दौरा केल्यानंतर पुन्हा पंचशील तत्त्वांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे दोन्ही देश या तत्त्वांचं पालन करण्यात कितपत यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.