अनिकेत साठे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ची देखभाल, दुरुस्ती जवळपास दोन वर्षांनंतर पूर्णत्वास जाणार आहे. लवकरच तिच्या सागरी चाचण्या सुरू होतील. अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांतवर लढाऊ विमानांशी संबंधित चाचण्या पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित आहे. येत्या वर्षभरात एकाच वेळी दोन विमानवाहू युद्धनौका हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात नौदलाचे सामर्थ्य वाढवतील.

युद्धनौकांची देखभाल, दुरुस्ती कशी होते?

साधारणत: दोन वर्ष कार्यरत राहिलेल्या जहाज आणि पाणबुडींची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नियमित देखभाल-दुरुस्ती (रिफीट) केली जाते. जहाजाच्या आकारमानानुसार त्यास दोन आठवडे ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर सहा वर्षांनी सामान्य दुरुस्ती होते. त्याचा कालावधी चार महिने ते दीड वर्षापर्यंत असू शकतो. जहाजे, पाणबुड्या आणि विमानवाहू नौका यांच्या देखभाल-दुरुस्तीत फरक आहे. विमानवाहू युद्धनौकेचे भव्य आकारमान आणि यंत्रणा गुंतागुंतीची असते. त्यामुळे देखभाल, सुधारणा यासाठी बराच वेळ लागतो. रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य ४४ हजार ५०० टन वजनाची आहे. २२ मजली इमारतीइतकी उंच आणि तीन फुटबॉल मैदानाइतकी लांब असे तिचे अवाढव्य स्वरूप आहे. तिच्या मोठ्या देखभाल-दुरुस्तीसाठी १८ महिने गृहीत धरण्यात आले होते.

विश्लेषण : देशातील विविध शहरांमध्ये हवेच्या प्रदुषणाची सद्यस्थिती काय आहे?

काम पूर्ण होण्यास विलंब का झाला?

आयएनएस विक्रमादित्य २०१३मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्यानंतर दोन वेळा तिची प्राथमिक देखभाल-दुरुस्ती झाली होती. यातील २०१८मध्ये शेवटची देखभाल-दुरुस्ती कोची शिपयार्डमध्ये पाच महिने चालली. त्यास सुमारे ७०० कोटी रुपये खर्च आला. देखभाल-दुरुस्ती कार्यक्रमात नौकेची दीर्घ देखभाल दुरुस्ती २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र त्याच वेळी भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. युद्धजन्य स्थितीमुळे देशाची गरज म्हणून विक्रमादित्य सज्ज ठेवण्यात आली. त्यामुळे देखभालीचा कालावधी काहीसा लांबणीवर पडला. डिसेंबर २०२०पासून तिच्या पहिल्या मोठ्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले. नौदलाच्या कारवार तळावर १८ महिन्यांत हे काम पूर्णत्वास जाणार होते. दुरुस्तीअंती जुलै २०२२ मध्ये तिच्या चाचण्याही सुरू झाल्या. पण, याच दरम्यान समुद्रात नौकेत आग लागली आणि वेळापत्रक विस्कळीत झाले. आता जानेवारी अखेरपासून तिच्या चाचण्या नव्याने सुरू होतील.

दोन्ही विमानवाहू युद्धनौका कधीपर्यंत सज्ज होणार?

मोठ्या देखभाल-दुरुस्तीनंतर आयएनएस विक्रमादित्य कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असताना स्वदेशी बनावटीच्या विक्रांतला पूर्ण क्षमतेने सज्ज करण्याच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे. या विमानवाहूू नौकेसाठी आठ प्रशिक्षक आणि २६ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे. फ्रान्सचे ‘राफेल-एम’ आणि अमेरिकेचे ‘एफ-१८’ हे या स्पर्धेत असून चाचणी अहवाल संरक्षण मंत्रालयाकडे सादर झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय नौदलासाठी निर्मित ‘एलसीए तेजस’ची आयएनएस विक्रांतच्या धावपट्टीवर चाचणी घेतली जाणार आहे. आयएनएस विक्रमादित्यच्या भात्यामध्ये रशियन बनावटीचे ‘मिग-२८’ हे मुख्य शस्त्र आहे. त्यामुळे येत्या वर्षात नौदलाकडील दोन्ही विमानवाहू युद्धनौका पूर्ण क्षमतेने कार्यरत असतील.

युद्धनौकांच्या तैनातीचे नियोजन कसे असेल?

देशाला पूर्व आणि पश्चिमेकडे विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे. चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणारे धोके, व्यापारी मार्गांची सुरक्षा पाहता दोन्ही क्षेत्रातील नौदल मुख्यालयांकडे प्रत्येकी एक नौकेची गरज आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत पूर्ण करतील. पूर्व समुद्रकिनाऱ्यावर विशाखापट्टणम येथे अवाढव्य युद्धनौका हाताळण्यासाठी जेट्टीची व्यवस्था केली जात आहे. ही जेट्टी तयार होईपर्यंत दोन्ही विमानवाहू युद्धनौका पश्चिम किनाऱ्यावर असतील. विमानवाहू नौकांना गोदीत आणण्यासाठी भारतीय नौदल चेन्नईतील कट्टुपल्ली बंदरातील एक जेट्टी भाड्याने घेण्याबाबत विचार सुरू आहे. अंदमान आणि निकोबार येथील कॅम्पबेल बे येथेही तशीच व्यवस्था केली जाऊ शकते.

विश्लेषण: कधीकाळी जगातील श्रीमंतापैकी एक होते निजाम; आठव्या निजामाचा नुकताच झाला मृत्यू

युद्धनौकांमुळे नौदलाचे प्रभाव क्षेत्र कसे विस्तारणार?

विमानवाहू युद्धनौकांचे अतिशय विस्तृत सागरी क्षेत्रावर नियंत्रण असते. सुदूर सागरातील (ब्लू वॉटर) कारवाईसाठी त्या महत्त्वाच्या ठरतात. भारतीय नौदलाचे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आधीपासून वर्चस्व आहे. दोन विमानवाहू युद्धनौकांनी हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र आणि त्या पलिकडे प्रभाव विस्तारणार आहे. सध्या नौदलाच्या ताफ्यात एकूण १३२ युद्धनौका आणि पाणबुड्य़ा आहेत. येत्या चार वर्षांत ही संख्या १७०वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात आता तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचा अंतर्भाव करण्याचेही निश्चित झाले आहे. येत्या काळात चीनचे नौदल तीन विमानवाहू युद्धनौकांसह हिंद महासागरात वर्चस्व निर्माण करण्याची शक्यता आहे. हे आव्हान लक्षात घेता शक्तीचे संतुलन साधण्यात विमानवाहू नौका महत्त्वाची भूमिका बजावतील. क्वॉड सदस्य देश (भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया) चीनची वाढती दादागिरी रोखण्यासाठी सरसावले आहेत. दोन विमानवाहू युद्धनौकांमुळे भारतीय नौदलास आफ्रिकेच्या पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यापासून ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत जबाबदारी सांभाळता येणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ins vikramaditya repairing to be launched with vikrant fighter gets tests print exp pmw