Who Was Koundinya? भारतीय नौदलात दाखल झालेल्या INSV (इंडियन नेव्हल सेलिंग व्हेसेल) कौंडिण्य या नौकेच्या निमित्ताने भारताच्या सागरी इतिहासातील किमान २००० वर्षांची परंपरा ढवळून निघाली आहे. भारतीय सागरी व्यापाराची परंपरा किमान ५००० वर्षे प्राचीन असल्याचे इथे वेगळे नमूद करायला नको. भारताच्या पहिल्या नागरीकरणापासूनच म्हणजे हडप्पा संस्कृतीपासूनच भारताचा जगातील इतर प्रांतांशी समुद्रमार्गे व्यापार चालत होता हा इतिहास आहे आणि हे सिद्ध करणारे अनेक पुरातत्त्वीय पुरावे याची साक्ष आजही देतात. हीच सागरी व्यापाराची परंपरा मध्ययुगीन कालखंडापर्यंत अविरत सुरु होती. किंबहुना याच समुद्र मार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे भारताला सुवर्णयुगाची झळाळी आली होती. याच समृद्ध इतिहासाला साक्ष ठेवून भारतीय नौदलाने INSV कौंडिण्यचा समावेश नौदलामध्ये केला आहे. त्याच निमित्तानं हे नाव या जहाजाला का देण्यात आले? ..या मागची अज्ञात प्रेमकथा नेमकं काय सांगते याचा घेतलेला हा आढावा.

कौंडिण्य हा प्राचीन भारतातील एक व्यापारी होता. केवळ व्यापारी ही त्याची इतकीच ओळख नव्हती तर तो शूर लढवय्याही होता. आजच्या सारखं तंत्रज्ञान त्यावेळी विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे समुद्रमार्गे व्यापारासाठी एखादा व्यापारी निघाला की, तो पुन्हा घरी येईल याची शाश्वती नव्हती. दूरदेशी व्यापारासाठी जाणं म्हणजे कित्येक महिने जातील आणि त्यातही जीवितहानीचा धोका यामुळे या व्यापाऱ्यांना समाजात विशेष महत्त्व होतं. २००० वर्षांपूर्वी कौंडिण्य हा मेकाँग डेल्टावरून म्हणजे दक्षिण व्हिएतनामवरून प्रवास करत होता. त्याच दरम्यान त्याच्या जहाजावर चाच्यांचा हल्ला झाला. कौंडिण्याने मोठ्या शौर्याने त्यांचा प्रतिकार केला. परंतु, त्याच्या जहाजाचे प्रचंड नुकसान झाले. दुरुस्तीसाठी म्हणून ते समुद्रकिनारी आणावे लागले. परंतु, स्थानिक राणीच्या सैन्याने कौंडिण्य आणि त्याच्या दलाला वेढा घातला. त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. परंतु, सोमा म्हणजेच स्थानिक राणी या भारतीय व्यापाऱ्याच्या बघताक्षणी प्रेमात पडली. तिने थेट त्याला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे कौंडिण्यानेही लग्नाला होकार दिला. पुढे, याच जोडप्याने फुनानचे राज्य स्थापन केले. या साम्राज्यात आग्नेय आशियातील आजच्या कंबोडिया, थायलंड आणि व्हिएतनामच्या काही भागांचा समावेश होत होता. हे राज्य इसवी सनाच्या पहिल्या ते सहाव्या शतकादरम्यान अस्तित्वात होते.

अजिंठा लेणी

अजिंठा लेणीतील भित्तीचित्रामध्ये असलेल्या पाचव्या शतकातील जहाजाला प्रमाण मानून ‘शिवलेले जहाज’ (stitched ship) आता पुन्हा तयार करण्यात आले आहे. हे जहाज प्राचीन शिवण तंत्रांचा वापर करून केरळमधील कारागीर आणि पारंपरिक जहाजबांधणी तज्ज्ञांनी उभारले आहे.

या जहाजाच्या बांधणीत नारळाच्या शेंड्यांपासून तयार केलेली दोरी, पारंपरिक लाकडी सांधण तंत्र, नारळाच्या दोऱ्यांचा वापर आणि नैसर्गिक राळ वापरली गेली आहे. तसेच, या जहाजाला गती देण्यासाठी कापसापासून तयार केलेल्या पारंपरिक पालांचा (sails) वापर करण्यात आला आहे. अशाप्रकारचे जहाज तयार करण्याची संकल्पना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी मांडली होती. या जहाजाला कौंडिण्य हे नाव का देण्यात आले, याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. कौंडिण्य हा पहिला ज्ञात भारतीय जलप्रवासी आहे. तो समुद्र ओलांडून आग्नेय आशियात पोहोचला आणि जागतिक इतिहासावर आपली अमिट छाप सोडली, असे सान्याल यांनी इंडियन एक्प्रेसशी बोलताना सांगितले.

“भारतीय सागरी परंपरा कांस्ययुगापासून अस्तित्वात आहे, परंतु त्या काळातील सागरी प्रवास करणाऱ्या नाविकांची नावे आपल्याला माहीत नाहीत. कौंडिण्य हा असा पहिला नाविक होता ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. त्याचे उल्लेख कंबोडिया आणि दक्षिण व्हिएतनामच्या ऐतिहासिक संदर्भात येतात. मात्र, भारतीय नोंदींमध्ये त्याचे नाव आढळत नाही. आपल्याला हेही माहीत नाही की, कौंडिण्याचे जहाज कसे दिसत होते. परंतु, त्याकाळातील सर्वसाधारण जहाजांच्या रचनेप्रमाणे हे नवे जहाज तयार करण्यात आले आहे”, असेही त्यांनी नमूद केले.

कौंडिण्याच्या समुद्रप्रवासाची आख्यायिका सांगताना संजीव सान्याल यांनी सांगितले की, “कौंडिण्य आणि सोमा यांनी स्थापन केलेल्या राजवंशाने आजच्या कंबोडिया आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये भारतीय संस्कृतीवर आधारित पहिले राज्य निर्माण केले. याला चिनी ऐतिहासिक स्रोतांनीही दुजोरा दिला आहे. ख्मेर आणि व्हिएतनामच्या चाम्स वंशाच्या सर्व पुढील राजवंशांनी आपली नाळ सोमा आणि कौंडिण्यशी जोडली आहे.” ही नौका २०२५ च्या अखेरीस ओमानकडे प्रस्थान करणार असून प्राचीन मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे.

या नौकेवरून भारतीय नौदलाचे १५ नौसैनिक असलेल्या पथकासह ऐतिहासिक प्रवासासाठी निघण्याची शक्यता आहे. ही नौका २०२५ च्या अखेरीस ओमानकडे प्रस्थान करणार असून, प्राचीन व्यापारी मार्गाचा मागोवा घेत हा प्रवास केला जाणार आहे. भारताच्या समृद्ध समुद्री वारशाला पुन्हा उजाळा देण्याच्या उपक्रमाचा हा एक भाग असून, हा प्रकल्प भारतीय नौदल, सांस्कृतिक मंत्रालय आणि गोवा स्थित होडी इनोव्हेशन्स (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड या जहाजबांधणी संस्थेतील त्रिपक्षीय कराराच्या माध्यमातून राबवला जात आहे.

“प्रश्न असा आहे की, हडप्पा काळातली ही समुद्रगामी जहाजं नेमकी कशी दिसायची, याचे कोणतेही ठोस पुरावे आज उपलब्ध नाहीत. प्राचीन जहाजाचे पहिले स्पष्ट चित्रण अजिंठा लेणींमध्ये दिसून येते आणि त्यामुळेच हे चित्रच एक आराखड्याच्या स्वरूपात आधार ठरले. याशिवाय, युक्तिकल्पतरूसारखे काही ऐतिहासिक ग्रंथसुद्धा होते. आम्ही त्याचबरोबर त्या काळात भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या विदेशी प्रवाशांच्या नोंदींचाही आधार घेतला, या ग्रंथांमध्ये अशा शिवलेल्या जहाजांचे वर्णन आहे,” असेही सान्याल म्हणाले.

या नौकेत मुख्य मस्तूल, मिजेन मस्तूल आणि बोस्प्रिट मस्तूल अशी पारंपरिक रचना असून दिशानियंत्रणासाठी स्टीयरिंग वल्हाचा (Oar) वापर केला जातो. या जहाजामध्ये मागील बाजूस लांबसर वल्ह, चौरस आकाराचे पालं आणि लवचिक हूल (जहाजाचा तळभाग) आहे. यामध्ये आधुनिक जहाजांप्रमाणे रडार (directional rudder) नसतो. आजच्या नौकांमध्ये प्रामुख्याने त्रिकोणी पालांचा वापर केला जातो. हे काही बाबतीत फायदेशीर असले तरी त्यामध्ये अनेक मर्यादा आहेत. कारण, अशा जहाजांना मुख्यतः वार्‍याच्या दिशेनुसारच चालवावं लागतं. त्यामुळे, चौरस पालांचा वापर करताना पारंपरिक नौकानयनकौशल्य पुन्हा आत्मसात करणे अत्यावश्यक ठरणार आहे, असे सान्याल यांनी स्पष्ट केले.

या नौकेच्या पालांवर ‘गंडभेरुंड’ या द्विमुखी गरुडाचे चिन्ह आहे. या नौकेच्या रचनेत अनेक सांस्कृतिक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या नौकेवर गंडभेरुंड, सूर्य, व्याल या सांस्कृतिक प्रतिमांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, नौकेच्या डेकवर सिंधू संस्कृतीतील शैलीतील प्रतीकात्मक दगडी नांगर ठेवलेला आहे.