संदीप कदम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमान संघाने ३-१ अशी विजय आघाडी घेतली आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय युवा खेळाडूंनी केलेली लक्षवेधक कामगिरी. अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताच्या या खेळाडूंनी दाखवलेली चमक वाखाणण्याजोगी आहे. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या खेळाडूंची कारकीर्द पाहता आता भारताच्या भविष्यातील खेळाडूंबाबत चर्चा सुरू झाली आहे. हे खेळाडू कोण आहेत, त्यांच्याकडून आगामी काळात काय अपेक्षा असतील, हे खेळाडू दडपणाखाली खेळण्यात सक्षम आहेत का, याचा घेतलेला आढावा…

सलामीवीर यशस्वी जैस्वाल…

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक लक्ष वेधले. त्याने आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यांत ९३.५७च्या सरासरीने ६५५ धावा केल्या आहेत. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच, त्याने दुसऱ्या व तिसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. त्याची या मालिकेतील कामगिरी पाहता भारताच्या भविष्यातील सलामीचा प्रश्न सुटल्यासारखे दिसत आहे. शिखर धवनची लय बिघडल्यानंतर भारताने सलामीला अनेक प्रयोग केले. रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला येऊ लागला. त्याला कायम साथीदार मात्र मिळत नव्हता. मयांक अगरवालने काही काळ चांगली फलंदाजी केली. मात्र, तोही संघाबाहेर गेला. यशस्वी जैस्वालने विंडीज दौऱ्यात आपली छाप पाडली व आताही तो चांगल्या लयीत आहे. त्यामुळे आगामी काही वर्षे तरी तो सलामीला उतरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही (एकदिवसीय व ट्वेन्टी-२०) भारताला त्याच्या रूपाने चांगला पर्याय मिळाला आहे. त्यापूर्वी, जैस्वालने प्रथम श्रेणी व ‘आयपीएल’ क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली होती. त्यातच ‘बीसीसीआय’ने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारात त्याला ‘ब’ श्रेणीत स्थान देऊन त्याच्यावर आणखी विश्वास दाखवला आहे.

हेही वाचा >>> माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या

शुभमन गिल भावी कर्णधार?

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत दुसऱ्या सर्वाधिक धावा या शुभमन गिलने (३४२ धावा) केल्या आहेत. गिल आक्रमक फलंदाजीसह तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाज आहे. तसेच, गेल्या काही काळात त्याने संघासाठी निर्णायक कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत त्याने २४ कसोटी सामन्यांत १३८२ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४४ एकदिवसीय सामन्यांत त्याने २२७१ धावा केल्या होत्या. त्यामध्ये सहा शतकांचाही समावेश आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही तो आक्रमकतेने खेळताना दिसतो. आगामी ‘आयपीएल’ सत्रात तो गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्या रूपाने चांगल्या फलंदाजीसह नेतृत्व करणारा एक खेळाडूही संघाला मिळेल. रोहित शर्मा आपल्या कारकीर्दीतील अखेरच्या काही वर्षांमध्ये आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन गिलच्या नावाचा गांभीर्याने विचार करू शकते. गिल कसोटीत मध्यक्रमात तर, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये सलामीला येतो. तसेच, सर्वच परिस्थितीत त्याला खेळण्याचा चांगला अनुभवही आहे. ‘बीसीसीआय’ करारात गिलचा समावेश ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंमध्ये आहे.

यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल… 

रांची येथील चौथ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षक- फलंदाज ध्रुव जुरेल याने निर्णायक खेळी करीत भारताच्या विजयात योगदान दिले. पहिल्या डावात ९० व दुसऱ्या डावात त्याने नाबाद ३९ धावांची खेळी केली. फलंदाजांसाठी आव्हानात्मक असणाऱ्या खेळपट्टीवर जुरेलने संयमाने खेळ केला. त्याच्या बचावात्मक खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे भारताला चांगला यष्टीरक्षक-फलंदाज गवसल्याची चर्चा सर्वत्र आहे. वृद्धिमान सहानंतर युवा ऋषभ पंतवर भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी होती. मात्र, पंतचा अपघात झाल्याने तो संघाबाहेर गेला. त्याच्याजागी आलेल्या केएस भरतला फारसे प्रभावित करता आले नाही. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या व चौथ्या कसोटीत जुरेलला संधी दिली. त्याने या संधीचे सोने करताना सर्वांना प्रभावित केले. त्यातच केएल राहुलची दुखापतही त्याच्या पथ्यावर पडली. जुरेलने फलंदाजीसोबतच यष्टीरक्षणातही आपली छाप पाडली. त्यामुळे भविष्यात भारतासाठी तो आणखी सामने खेळताना दिसेल. जुरेलने १७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९६५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : रामदेव बाबांच्या पतंजलीचे दावे फसवे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने कशाबद्दल फटकारले?

मधल्या फळीत सर्फराज खान?

आपल्या तंदुरुस्तीविषयी नेहमीच भल्याबुऱ्या चर्चेत असलेल्या सर्फराज खानला जुरेलसोबत भारताच्या कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारतीय संघात येण्यापूर्वी प्रथम श्रेणीचा दांडगा अनुभव सर्फराजच्या गाठीशी होता. त्याच्या ४७ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने ४०५६ धावा केल्या आहेत. तसेच, त्याने १४ शतके झळकावली आहेत. भारताकडून पदार्पण करण्यापूर्वी सर्फराज १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता. तसेच, भारताच्या ‘अ’ संघाकडून खेळतानाही त्याने योगदान दिले आहे. सर्फराज आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. राजकोट कसोटीतील दोन्ही डावात त्याने अर्धशतकी खेळी करीत हे दाखवून दिले. सर्फराजमुळे भारतीय मध्यक्रमाचा प्रश्न मार्ग लागू शकतो. इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीला चोख प्रत्युत्तर देताना त्याने चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे येणाऱ्या काळात तो स्वत:ला संघानुरूप कसे सामावून घेतो हे पाहावे लागेल. मात्र, त्याच्या रूपाने मध्यक्रमात चांगला पर्याय संघाकडे उपलब्ध झाला आहे.

आकाश दीपमुळे अष्टपैलू खेळाडू?

रांची कसोटीत भारताने जसप्रीत बुमराच्या जागी संघात आकाश दीपला संधी तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, आकाशने कर्णधाराचा निर्णय सार्थकी लावताना भारताला चांगली सुरुवात दिली. पहिल्याच डावात त्याने तीन गडी बाद करीत सर्वांचे लक्ष वेधले. आकाश हा मूळचा बंगालच खेळाडू आहे. त्याने ३१ प्रथम श्रेणी सामन्यांत आतापर्यंत १०७ गडी बाद केले आहेत. तसेच, तळाला उपयुक्त फलंदाजी करताना त्याने ४३२ धावाही केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाकडून त्याला अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे. भारताकडे रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजाच्या रूपात दोन आघाडीचे अष्टपैलू आहेत. मात्र, हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे भारताला वेगवान गोलंदाजीसह चांगली फलंदाजी करणारा खेळाडू मिळालेली नाही. कदाचित आकाश दीप भारताला तो पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो का, हे येणाऱ्या सामन्यांमध्ये कळेलच. मात्र, गेल्या सामन्यातील कामगिरीने त्याने सर्वांना प्रभावित केले आहे.