Bullet train India Japan पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याबरोबर जपानच्या प्रसिद्ध बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. प्रवासापूर्वी पंतप्रधान मोदींनी सध्या जपानमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय ट्रेनचालकांचीही भेट घेतली. त्यानंतरच बहुप्रतीक्षित शिंकान्सेन बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे. हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच असणार आहे .
डिसेंबर २०१५ मध्ये नवी दिल्ली आणि टोकियो यांनी जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई आणि अहमदाबाददरम्यान भारताचा पहिला हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. जपानला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हा दौरा दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध आणि सभ्यतेची गाथा अधिक दृढ करण्याची संधी असेल. काय आहे भारत-जपानमधील बुलेट ट्रेन प्रकल्प? एक तासात २५० किलोमीटर अंतर गाठणारी बुलेट ट्रेन भारताला कधी मिळणार? E 10 बुलेट ट्रेन काय आहे? जाणून घेऊयात…
बुलेट ट्रेन : हाय स्पीड रेल्वे प्रणाली
- बुलेट ट्रेन ही एक हाय स्पीड रेल्वे प्रणाली आहे. फ्रान्ससारख्या देशांमध्ये ही प्रणाली आधीपासूनच कार्यरत आहे.
- चीन, दक्षिण कोरिया, तुर्की, स्पेन, जर्मनी, इटली, नेदरलँड्स व बेल्जियम यांसारख्या इतर देशांमध्येही अशाच सेवा कार्यरत आहेत.
- बुलेट ट्रेनचा वेग २५० किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असावा लागतो.
- E10 मालिकेची रचना जपानच्या प्रसिद्ध चेरी ब्लॉसम किंवा साकुरापासून प्रेरित आहे आणि त्यात एक प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या ट्रेन भूकंपरोधक यंत्रणांनी सक्षम आहेत.
- भूकंपादरम्यान ट्रेनला रुळांवरून घसरण्यापासून थांबविण्यासाठी E10 ही ट्रेन ‘L-shaped vehicle guides’ तंत्रज्ञानाचा वापर करते.
- त्यात कंपन कमी करणारे आणि नुकसान मर्यादित करणारे ‘डॅम्पर्स’देखील आहेत, जे रुळांवरून घसरण्यापासून अतिरिक्त सुरक्षा प्रदान करतात.
या ट्रेनमध्ये व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी खिडकीजवळची विशेष जागा असेल आणि एक नवीन आसनव्यवस्था असेल, जी अधिक प्रवासी किंवा मालवाहतुकीच्या जागेच्या गरजेनुसार बदलता येऊ शकेल. ईस्ट जपान रेल्वे कंपनीने विकसित केलेली E10 ही ट्रेन ३२० किलोमीटर प्रतितास या वेगापर्यंत पोहोचू शकते, जो E5 च्या वेगाइतकाच आहे. मात्र, E10 चा वेग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मर्यादित आहे. दुसरी मोठी सुधारणा म्हणजे त्याची ब्रेकिंग सिस्टीम. ‘NDTV’च्या वृत्तानुसार, E10 जास्तीत जास्त वेगाने जात असताना ३.४ किलोमीटरपेक्षा कमी अंतरात थांबू शकते. हे वैशिष्ट्य भारतासाठी विशेषतः महत्त्वाचे आहे. कारण- भारतातील बहुतांश रेल्वेमार्ग गर्दीच्या आणि भूकंपप्रवण भागातून जातात.
E10 मध्ये अपग्रेड केलेले इंजिनदेखील आहेत, जे अधिक कार्यक्षम आहेत. जपानमध्ये E10 हळूहळू E5 व E2 मॉडेल्सची जागा घेईल आणि २०३० पर्यंत तेथे सेवेत दाखल होणार आहे. तोपर्यंत जपानने भारताला एक E5 व एक E3 सह तात्पुरते संच देण्याची ऑफर दिली आहे. या अहवालानुसार, भारताच्या बुलेट ट्रेनमध्ये E5 पेक्षा मोठ्या जागा, लेदर रिक्लिनर्ससह एक प्रीमियम बिझनेस क्लास, फोल्ड-आउट डेस्क व ऑनबोर्ड वाय-फायची सुविधा असेल. या ट्रेन हिरव्या रंगाच्या शेड्समध्ये असतील.
भारत-जपान करार
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि जपान पुढील पिढीच्या E10 शिंकान्सेन बुलेट ट्रेनचे उत्पादन भारतात एकत्र मिळून करू शकतात. E10 शिंकान्सेन प्रकल्प दोन्ही देशांमधील नवीन वाहतूक आणि गतिशीलता भागीदारीचा एक भाग असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि इशिबा हे बुलेट ट्रेनच्या डब्यांचे उत्पादन पाहण्यासाठी सेंडाई येथील तोहोकू शिंकान्सेन प्रकल्पालाही भेट देण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे (MAHSR) प्रकल्पाचे सप्टेंबर २०१७ मध्ये उदघाटन झाले होते. तेव्हा पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन जपानी पंतप्रधान शिन्झो आबे यांनी गुजरातमधील साबरमती येथे या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.
डिसेंबर २०१५ मध्ये भारत आणि जपानने देशातील पहिला हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाददरम्यान विकसित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. सुरुवातीला जपानमध्ये सध्या धावणारी E5 मालिकेची बुलेट ट्रेन या मार्गासाठी भारतात पाठविण्याची योजना होती. परंतु, डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, जपानने २०३० पर्यंत E10 मालिका सुरू करण्याची योजना जाहीर केली. त्यानंतर जपानने भारताला नवीन मॉडेलची ऑफर दिली.
‘दी इकॉनॉमिक टाइम्स’ला एका अधिकाऱ्याने सांगितले, “नवीनतम जपानी ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉरवर धावतील.” भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प २०२७ मध्ये व्यावसायिक सेवा सुरू करील, अशी अपेक्षा आहे. तर २०२६ मध्ये प्रोटोटाईपची चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. ५०८ किलोमीटरच्या या मार्गात गुजरातमधील ३५२ किलोमीटर आणि महाराष्ट्रातील १५६ किलोमीटरचा समावेश आहे.