Pune Porsche Accident and Salman Khan hit and run case : रविवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातल्या कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन गर्भश्रीमंत मुलाने पोर्श कारने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली, या धडकेत त्या दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर या मुलाला अटक करण्यात आली आणि जामीनही मिळाला. सध्या बाल न्याय मंडळाने या मुलाची रवानगी पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात केली आहे. दरम्यान या मुलाच्या पालकांनी त्यांच्या कुटुंबासाठी चालक म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीस आमिष दाखवून गुन्हा स्वतःवर घेण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे घडलेही, असे पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपण गाडी चालवत होतो आणि तो अल्पवयीन मुलगा मागच्या सीटवर बसला होता असे चलकाने सांगितले. त्या मुलाच्या बरोबर असलेल्या त्याच्या मित्रांनीही या गोष्टीला स्वीकृती दिली आहे. नंतर मात्र ते खोटे असल्याचे उघडकीस आले, असे आयुक्तांनी सांगितले. एकूणात, या घटनेनंतर अनेकांना सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणाची आठवण करून दिली. अनेकांनी हे प्रकरण आणि सलमान खानचे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण यात साम्य असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या. त्याच पार्श्वभूमीवर सलमान खानच्या रन अ‍ॅण्ड हीट केस प्रकरणाचा हा घेतलेला आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री नेमके काय घडले?

२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमान खानची पांढरी टोयोटा लँड क्रूझर मुंबईतील वांद्रे येथील हिल रोड येथील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीजवळ फुटपाथवर आदळली. यात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले. यानंतर चाचणीसाठी सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यात परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा अधिक मद्यपान सलमानने केल्याचे आढळून आले, त्याला अटक करण्यात आली होती. लगेचच त्याला जामीनही मंजूर झाला. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC), मोटार वाहन कायदा, १९८८ आणि बॉम्बे प्रोहिबिशन अ‍ॅक्ट, १९४९ अंतर्गत विविध आरोप ठेवण्यात आले होते.

कोणती कलमे लावण्यात आली?

आयपीसी- ३०४अ- (बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल दोन वर्षांपर्यंत शिक्षा), २७९ (बेदरकारपणे वाहन चालवून मनुष्यहानीस कारणीभूत ठरणे- रॅश ड्रायव्हिंग), ४२७ (हेतूत: किंवा हेतूशिवाय नुकसान).
मोटार वाहन कायदा- परवान्याशिवाय वाहन चालवणे.
बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट- दारू पिऊन गाडी चालवणे

सुरुवातीला, कलम ३०४अ (बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर २००३ साली, कलम ३०४ (II) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (culpable homicide not amounting to murder)

पहिला एफआयआर कोणी दाखल केला?

दरम्यान, मुख्य साक्षीदार असलेला सलमान खानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याचा टीबीने मृत्यू झाला. रवींद्र पाटील यानेच अभिनेत्याविरुद्ध पहिला एफआयआर दाखल केला होता. त्यानेच सलमान खान हा चालकाच्या सीटवर होता अशी साक्ष दिली होती. परंतु सलमान खानने हा दावा फेटाळला. डावीकडचा दरवाजा नादुरुस्त झाल्याने त्याला ड्रायव्हरच्या सीटवरून बाहेर पडावे लागले असे त्याने सांगितले होते.

अधिक वाचा: विश्लेषण: जहांगीर हे नाव आलं कुठून? त्या मागचा इतिहास काय सांगतो?

या खटल्यातील महत्त्वाचे मुद्दे

१. या खटल्यात सलमान खानने मद्यपान केल्याचा दावा फेटाळला होता. परंतु त्याने जुहू येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल आणि वांद्रे येथील रेन नावाच्या बारमध्ये गेल्याचे नाकारले नाही. तिथल्या वेटरने सलमान खानने रम मागवल्याची साक्ष दिली होती. परंतु ते पाणी असल्याचा दावा सलमान खानने केला होता. पेये आणि खाद्यपदार्थांचे बिल त्याच्या नावावर नव्हते असे त्याने सांगितले. नक्की तिथे त्याने मद्यप्राशन केले का हे सिद्ध करता आले नाही. तरी अपघाताच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता, असे रासायनिक विश्लेषण अहवालातून स्पष्ट झाले.

२. अपघाताच्या वेळी सलमान खान बरोबर उपस्थित असलेला सेलिब्रिटी गायक कलाम खान खटल्या दरम्यान अनुपस्थित राहिला. त्याच्या वकिलांनी तो इंग्लंडमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याची साक्ष झाली नाही. यामुळेच संतोष दौंडकर यांनी पोलिसांविरोधात अर्ज दाखल केला होता. CrPC च्या कलम २७५ नुसार साक्षीदाराला ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष देण्यास सांगितले जाऊ शकते असे त्या अर्जात म्हटले होते. संतोष दौंडकर यांच्या वकील आभा सिंह यांनी कमाल खानची तपासणी न केल्याने पोलिसांनी एक महत्त्वाचा पुरावा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

३. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची केस डायरी इतर काही खटल्यांच्या कागदपत्रांबरोबर गहाळ झाल्याचे न्यायालयात सांगितले.

४. तर सलमान खानने तो गाडी चालवत नव्हता असा दावा केला. त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत असल्याचे त्याने म्हटले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशोक सिंग या ड्रायव्हरने आपणच गाडी चालवत होतो, असे सांगितले. अशोक सिंग तब्बल १३ वर्षांनी या प्रकरणात समोर आला होता. 

५. अभिनेत्याने दावा केला की, बाळा शंकर या व्यक्तीने त्याच्या रक्ताचे नमुने घेतले होते, जो स्वतः यात तज्ज्ञ नव्हता. याच रक्ताच्या नमुन्यात ६२ मिलीग्राम अल्कोहोल होते आणि जे परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होते हे स्पष्ट झाले होते. 

या सर्व बाबींचा विचार करून मुंबईच्या सत्र न्यायालयाने अभिनेत्याला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली, सलमान खानाने सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते.

निकाल काय लागला?

मुंबई उच्च न्यायालयाने १० डिसेंबर २०१५ रोजी निर्णय दिला. फिर्यादी पक्ष सलमानचा अपराध वाजवी संशयापलीकडे सिद्ध करू शकला नाही असे निरीक्षण नोंदवले. अभिनेता दारूच्या नशेत होता किंवा गाडी चालवत होता हे सिद्ध होऊ शकले नाही. साक्षीदाराकडून एफआयआरमध्ये न सांगितलेल्या अनेक गोष्टी आता सांगणे हे अनैसर्गिक आहे असे न्यायमूर्तीनी सांगितले. शिवाय सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे, अपीलकर्त्याला दोषी ठरवता येत नाही असा निकाल देण्यात आला. 

अधिक वाचा: विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

निकाला नंतरचे अनुत्तरीत प्रश्न:

गाडी कोण चालवत होते?

बचाव पक्षाने सांगितले की, सलमान खान मद्यधुंद नव्हता. तो गाडीही चालवत नव्हता. अशोक सिंग हा सलीम खान यांचा चालक १३ वर्षांनी समोर आला. तो गाडी चालवत होता, मात्र हा युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. शिवाय सलमानला निर्दोष मुक्त केले, त्यामुळे अपघाताच्या वेळेस गाडी नेमकं कोण चालवत होता हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.

रवींद्र पाटील यांचे काय झाले?

कोर्टात त्यांची साक्ष बदलण्यासाठी पाटील यांच्यावर प्रचंड दबाव होता, पण त्यांनी तसे केले नाही. आणि त्याच वर्षी त्यांचे निधन झाले. हातात नोकरी राहिली नाही, टीबीने बेजार अशी त्यांची अवस्था होती. न्यायालयाने त्यांचे म्हणणे अविश्वसनीय ठरवून फेटाळले. पुणे पोर्श कार अपघाताची अवस्था सलमान खान प्रकरणासारखी होऊ नये, असे मत अनेक नेटकरांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche accident and salman khan hit and run case svs
First published on: 25-05-2024 at 15:04 IST