सध्या अभिनेता चिन्मय मांडलेकर चर्चेत आहे. त्याने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याचा उल्लेख केल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं. या संदर्भात त्याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत जहांगीर या नावामागचा अर्थ सांगितला, तसेच हे नाव पर्शिअन असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या व्हिडिओत त्यांनी जमशेदी नवरोज या पारसी सणाचा तसेच जे.आर.डी.टाटा यांचाही उल्लेख केला आहे. इतक्या स्पष्टीकरणानंतरही मुघल बादशहा जहांगीर याच्या नावाचा संदर्भ देऊन अश्लाघ्य भाषेत ट्रोलिंग सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर जहांगीर या नावामागील इतिहास जाणून घेणं नक्कीच माहितीपूर्ण ठरणारं आहे.

अधिक वाचा: दख्खनमधील ‘या’ गुलामाने केला होता मुघलांचा पराभव

Kedarnath Temple, Uttarakhand
मोक्ष प्रदान करणाऱ्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती ठरतेय वादग्रस्त; काय आहे या मंदिराचा प्राचीन इतिहास?
Jagannath Rath Yatra: The Origin of the English Word 'Juggernaut' from Lord Jagannath
Jagannath Rath Yatra : ‘या’ इंग्रजी शब्दाचे मूळ भगवान जगन्नाथाच्या नावात; इतिहास काय सांगतो?
James Cunninghame Grant Duff
मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ‘हा’ ब्रिटिश अधिकारी नक्की कोण होता?
beaufort wind scale developed in 1805 by sir francis beaufort of england
भूगोलाचा इतिहास : असाही एक ‘वायुदूत’
maharani yesubai latest marathi news
महाराणी येसूबाईंची कर्तृत्वगाथा इतिहासात आजही उपेक्षित : राजेंद्र घाडगे
Ancient 'scholar warriors' now in the Indian Army; What exactly is this concept?
प्राचीन ‘विद्वान योद्धा’ आता भारतीय लष्करात; काय आहे नेमकी ही संकल्पना?
Mumbai, rain, experience,
ज्याचा-त्याचा पाऊस.. : निळया ताडपत्रीचा दृष्टांत
Loksatta entertainment Articles about Bollywood Singer Instrumentalist Musician Dinesh Ghate
संगीतकारांचा निस्सीम मित्र

जहांगीर हे पर्शियन नाव आहे. जहाँ म्हणजे जग किंवा विश्व, तर गीर म्हणजे विजेता. ‘विश्वविजेता’ असा या नावाचा अर्थ आहे. हे फारसी भाषेतील नाव आहे. मुघल शासक जहांगीर याच्या नावामुळे हे मुस्लीम नाव आहे, अशी सर्वसाधारण धारणा आहे. मुघल बादशहा जहांगीर याची इतिहासातील प्रतिमा क्रूर आहे. त्यामुळे चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या सुज्ञ आणि इतिहासाची जाण असणाऱ्या कलाकाराने आपल्या मुलाला हे नाव देणं अनेकांच्या पचनी पडलेलं नाही.

परंतु कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी काही गोष्टींचा शोध घेणे येथे अनिवार्य ठरते. १. जहांगीर या मुघल शासकाची नक्की प्रतिमा कशी होती?, २. जहांगीर हे मुस्लीम नाव आहे का? (सध्या सुरु असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने घेतलेला प्रश्न), ३. जहांगीर हे पर्शियन नाव आहे, तर मुस्लीम म्हणून का प्रसिद्ध झाले? आणि या नावाचा पारसी समाजाशी नेमका संबंध काय आहे?

१. जहांगीर या मुघल शासकाची नक्की प्रतिमा कशी होती?

जहांगीर हा चौथा मुघल सम्राट होता. भारतीय इतिहासातील सलीम- अनारकली या कथित प्रेमकथेतील हा नायक. अकबर आणि मरियम- उज- जमानी यांचा हा मुलगा. प्रचलित ऐतिहासिक संदर्भानुसार अकबराला अनेक वर्षे पुत्ररत्नाचा लाभ न झाल्याने अनेक उपास- तापासानंतर सलीमच्या रूपात पुत्ररत्नाचा लाभ झाला. म्हणूनच त्याने त्याचे नाव सुफी संत सलीम चिश्ती यांच्या नावावरून ठेवले होते. सलीमचा जन्म ३१ ऑगस्ट १५६९ रोजी फतेहपूर सिक्रीत झाला होता. इतर मुघल सम्राटांच्या तुलनेत सलीम हा मद्यपी, सुखासीन म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या या व्यसनाचे वर्णन खुद्द जहांगीरने तुज़क- ए – जहांगीरी या आपल्या आत्मचरित्रात केले आहे. इतकेच नाही तर बादशहा होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा तीव्र होती. त्यासाठी त्याने १५९९ साली अकबर दक्खनमध्ये गुंतलेला असताना, सत्ता संपादनासाठी बंड केले. परंतु नंतर पिता-पुत्रात समझोता झाला. परंतु सत्तेच्या या लढाईत जहांगीरने अकबराचा निकटवर्तीय अबुल फजल याची हत्या घडवून आणली. याचे वर्णन जहांगीरनेच त्याच्या आत्मचरित्रात केले आहे.

अकबराच्या मृत्यूनंतर २४ ऑक्टोबर १६०५ रोजी जहांगीरच्या हातात सत्ता आली. अबुल मुजफ्फर नुरुद्दीन मुहम्मद जहांगीर बादशाह गाझी या नावाने तो गादीवर विराजमान झाला. म्हणजेच गादीवर बसल्यावर त्याने पदवीच्या स्वरूपात ‘जहांगीर’ या नावाचा स्वीकार केला. त्याचे मूळ नाव ‘सलीम’च होते. १६०५ ते १६२७ या कालखंडात त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने राज्य केले. तो त्याच्या क्रौर्यासाठी प्रसिद्ध होता. आपल्याच मोठ्या मुलाने बंड केले म्हणून त्याने ख़ुसरो मिर्ज़ाचे डोळे काढले होते. त्याच्या क्रौर्याचा तपशील एलिसन बँक्स फिंडली यांनी ‘नूरजहाँ: एम्प्रेस ऑफ मुघल इंडिया’ या पुस्तकात दिला आहे. याशिवाय त्याच्या २२ वर्षांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने अनेक लष्करी मोहिमांवर लक्ष केंद्रित केले होते. जहांगीरने एकूण २० वेळा लग्न केले. यामुळेच तो इतिहासात मद्य आणि बाई या व्यसनांसाठी बदनाम होता. त्यामुळेच जहांगीर या नावाला या मुघल बादशहाच्या नकारात्मक इतिहासाचे वलय आहे.

२. जहांगीर हे मुस्लीम नाव आहे का?

परंतु, लक्षात घेण्याचा एक मुद्दा असा की, मुघल ज्या भागातून भारतात आले. तो भाग इसवी सन पूर्व ५५९ ते ३३१ या कालखंडात राज्य करणाऱ्या पर्शियन साम्राज्याचा होता. याच साम्राज्याला अकेमिनाईड म्हणून ओळखले जाते. पर्शियन भाषेचे मूळ अकेमिनाईड साम्राज्यात सापडते असे अभ्यासक मानतात. तसे पुराभिलेखीय पुरावे उपलब्ध आहेत. पर्शियातील पर्सुआ जमातीतील लोक ही भाषा बोलत होते. पर्शियन किंवा फारसी ही एक इंडो-युरोपियन भाषा आहे. संस्कृत आणि पर्शियन भाषेचे समान इंडो-इराणी मूळ आहे.

आधुनिक काळातील इराण, इजिप्त, तुर्की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा काही भाग पर्शियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली येत होता. इराण सभोवतालच्या परिसरात इस्लामचा प्रचार इसवी सनाच्या सहाव्या शतकात झाला. म्हणजे त्या आधी कित्येक वर्ष फारसी ही भाषा अस्तित्त्वात होती. त्यामुळे केवळ एका मुघल शासकाचं नाव जहांगीर आहे, म्हणून त्या नावाचा मूळ इतिहास बदलत नाही.

३. या नावाचा पारसी समाजाशी नेमका संबंध काय आहे?

मुघल शासक जहांगीर वगळता भारतात फारसी समाजात जहांगीर हे नाव सामान्य आहे. जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा हे त्यातीलच एक प्रसिद्ध नाव. प्रसिद्ध भारतीय उद्योगपती. भारताच्या इतिहासातील पहिल्या एअरलाईन्स निर्मितीचे आणि टाटा समूहाच्या विस्ताराचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. टाटा यांचा जन्म भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण फ्रान्समध्ये गेले होते. फ्रान्स, जपान आणि इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर टाटांनी एक वर्ष फ्रेंच सैन्यात सेवा केली. त्यांना केंब्रिज विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची इच्छा होती. परंतु १९२५ साली कौटुंबिक व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना भारतात परतावे लागले. १९३२ मध्ये जे आर डी टाटांनी कराची, अहमदाबाद, मुंबई आणि मद्रास (आताचे चेन्नई) यांना जोडणारी एअर मेल- कुरिअर सेवा स्थापन केली. वयाच्या ३४ व्या वर्षी म्हणजेच १९३८ साली त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी एअरमेल सेवेला टाटा एअरलाइन्स असे नाव दिले तर १९४६ साली कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया केले.

अधिक वाचा: ‘या’ क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! नेमके काय घडले होते?

पुढील अर्धशतकात जे आर डी टाटांनी पोलाद, ऊर्जा आणि हॉटेल्स यांसारख्या विद्यमान व्यवसायांना बळकटी दिली आणि समूहाला रसायने, ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतात वैज्ञानिक, वैद्यकीय आणि कलात्मक प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड सायन्सेस आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स यांचा समावेश होता. ते कुटुंब नियोजनाचे पुरस्कर्ते होते. १९७१ मध्ये त्यांनी फॅमिली प्लानिंग फाउंडेशनची स्थापना केली. टाटा यांना १९५७ साली पद्मविभूषण, विमानचालनासाठी १९८८ साली डॅनियल गुगेनहेम पदक आणि १९९२ साली संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविण्यात आले. जे आर डी टाटानंतर ‘जहांगीर’ नाव असलेली एक व्यक्ती म्हणजे जहांगीर साबावाला, हे प्रसिद्ध भारतीय चित्रकार होते. यांचा जन्म अर्देशिर पेस्तनजी व मेहेरबाई या दांपत्यापोटी झाला. या घराण्याच्या देणगीतून मुंबईतील प्रसिद्ध ‘जहांगीर आर्ट गॅलरी‘ची स्थापना झाली. याशिवाय होमी भाभा हे नाव सर्वांनाच माहीत आहे. या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाचे संपूर्ण नाव ‘होमी जहांगीर भाभा’ होते. ही सर्व व्यक्तिमत्त्वे पारशी आहेत. याचाच अर्थ पारशी समाजात हे नाव सामान्य आहे. त्यामुळेच भारतीय पारशी समाजाचा आणि पर्शियाचा संबंध नेमका काय हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

भारतीय पारशी आणि पर्शिया

पारशी म्हणजे पर्शियातून आलेले. इसवी सन ६४१ पर्यंत पर्शियामध्ये झोरास्ट्रियन धर्माचे प्राबल्य होते. नेमक्या याच वेळा अरबांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली आणि ते पर्शियापर्यंत पोहोचले. त्यावेळी पर्शियावर ससानियन वंशाचे राज्य होते. पर्शियन शासक यज्देगर्द शहरयारचा अरबांशी झालेल्या युद्धात पराभव झाला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो मारला गेला. म्हणूनच धार्मिक छळापासून वाचण्यासाठी झोरास्ट्रियन समाजाने पर्शियातून स्थलांतर करण्यास सुरुवात केली. हे स्थलांतर पुढील अनेक शतके चालू राहिले. आणि याच कालखंडात पारशी समुदाय भारतात पोहोचला आणि भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणून स्थायिक झाला. या समाजाने भारताच्या इतिहासात आणि विकासात मोलाची भूमिका बजावलेली आहे.