पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली या गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप आहे. यावरून राज्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्यात संघर्ष सुरू आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत ते तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचे भाजपने नमूद केले. ही घटना गंभीर असून, विविध तपास संस्थांद्वारे चौकशी केली जातेय. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजान शेख बेपत्ता आहे तर दोघांना अटक करण्यात आलीय. कोलकात्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावरील हे गाव संघर्षाचा केंद्रबिंदू ठरतेय. 

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

तृणमूलची कोंडी?

लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारची कोंडी झाली. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडावे अशी मागणी केली. काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांनी संबंधित गावात जाण्याचा प्रयत्न केला. एकूणच राज्य सरकारसाठी ही घटना अडचणीची ठरतेय. राज्यात लोकसभेच्या ४२ जागा असून, गेल्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला २२ तर भाजपने मुसंडी मारत १८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ दोन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. अशा स्थितीत भाजप हा कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा करून ममतांना रोखू पाहात आहे. 

हेही वाचा – विश्लेषण: प्राणीसंग्रहालय सुरू करण्याचा सरकारला अधिकारच नाही! सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल का दिला?

नेमके प्रकरण काय?

बांगलादेश सीमेवरील या गावात शहाजान शेखचा प्रभाव आहे. कौटुंबिक तंटे सोडवण्यात त्याचा पुढाकार असतो. विविध निर्णयात त्याचा शब्द अंतिम असतो असे गावकरी सांगतात. संदेशखाली १ व २ अशा दोन्ही पंचायती बिनविरोध झाल्या. याखेरीज बशीरहट लोकसभा मतदारसंघात तृणमूलचा खासदार आहे. त्या विजयातही शेखचा वाटा आहे. हा भाग त्या लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे पक्षासाठी तो किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. ५ जानेवारीला संदेशखाली येथील घटना उजेडात आली. रेशन घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी छापा टाकण्यासाठी शेखच्या घरी आले असता, त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. याच दरम्यान समाजमाध्यमावर एका महिलेची चित्रफीत आली. त्यामध्ये महिलांवर अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी महिलांनी संदेशखाली पोलीस ठाण्याला घेराव घातला. शेखला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर या प्रकरणावरून भाजपने रान पेटवलेय. न्यायालयानेही कडक ताशेरे ओढलेत. यामुळे कारवाईसाठी राज्य सरकारवर चौफेर दबाव आहे.

राजकीय संघर्षाचा इतिहास

६९ वर्षीय ममता बॅनर्जी या २०११ मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. त्यापूर्वी अनेक हल्ले पचवत डाव्या आघाडीची जवळपास तीन दशकांची राजवट त्यांनी उलथवली. गेल्या म्हणजेच २०२१च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले होते. मात्र ममतांनी राज्यातील विधानसभेच्या २९४ पैकी २१५ जागा जिंकल्या. जवळपास २७ टक्के असलेला मुस्लीम समाज हा ममतांची भक्कम मतपेढी आहे. गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने प्रचंड विजय मिळवला असला तरी, मोठा हिंसाचार झाला. आताही लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असाच संघर्ष होईल. तृणमूल काँग्रेस जरी विरोधी पक्षांच्या आघाडीत असला तरी, डाव्या पक्षांशी त्यांचे हाडवैर आहे. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत होईल. काँग्रेसला त्यांनी दोन जागा देऊ केल्या. मुळात सध्या काँग्रेसचे दोन खासदार आहेत. मग आघाडीचा फायदा काय, असा काँग्रेसचा सवाल आहे. डाव्या पक्षांनीही गेल्या काही महिन्यांत विविध कार्यक्रम आयोजित करून वातावरण निर्मिती केली. राज्यातील ४२ लोकसभा जागांवर साऱ्याच पक्षांचे लक्ष्य दिसते. भाजपला संदेशखाली मुद्द्यातून जागा वाढतील असे वाटते. काही जनमत चाचण्यांमध्येही तसा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर लोकसभेला भाजपला तृणमूल काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या तर, दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे भाजपला त्याचा लाभ होईल. अर्थात लोकसभा तसेच विधानसभेची गणिते वेगळी असतात. लोकसभेला पंतप्रधानांच्या प्रतिमेवर मतदान होईल. विधानसभेला स्थानिक अस्मिता त्याच बरोबर ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता हा मुद्दा राहील. इंडिया आघाडीतील घटक पक्षांना बाजूला ठेवून ममतांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून जर भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या तर, राष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम होतील.

हेही वाचा – विश्लेषण : लष्कराच्या नव्या कोअरचा चीन सीमेवर उपयोग कसा?

तिसऱ्या क्रमांकासाठी प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेसपाठोपाठ तिसरा क्रमांक राखण्याचा तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे महत्त्व वाढते. तसेच इंडिया आघाडीतही शब्दाला वजन राहते, याद्वारे प्रखर भाजपविरोधक ही प्रतिमा बळकट होते. संदेशखालीच्या मुद्द्यावर राज्यात संताप निर्माण होऊन राज्य सरकारविरोधात वातावरण तयार झाले तर ममतांना लोकसभेच्या २० जागा जिंकणे कठीण होईल. मग द्रमुकला लोकसभेच्या एकूण जागांत तिसरे स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तमिळनाडूत विरोधकांमधील फाटाफुटीने द्रमुकसाठी अनुकूल वातावरण आहे. तेथे भाजप व अण्णा द्रमुक वेगळे लढण्याची चिन्हे आहेत. आधीच राज्यात द्रमुक आघाडी सामाजिक समीकरणात भक्कम आहे. तृणमूलपेक्षा ते पुढे गेल्यास ममतांचे दिल्लीत महत्त्व कमी होईल. त्यामुळेच संदेशखालीच्या मुद्द्यावर ममता सावध दिसतात. नेहमी जनतेत राहून त्यांनी राजकारण केले आहे. लढाऊ नेत्या अशी त्यांची ओळख असून, सहजासहजी हार मानत नाहीत. पक्षाची संघटित यंत्रणा तसेच केंद्रातील सत्ता याच्या जोरावर भाजप आता संदेशखालीच्या मुद्द्यावर ममतांना रोखू पाहात आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेसाठी हाच मुद्दा केंद्रस्थानी राहील. यामुळे ममता सरकार त्यात काय कारवाई करते, यातून जनतेत एक संदेश जाईल. यावर लोकसभेच्या राज्यातील निकालाची दिशा ठरेल.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc dilemma in sandeshkhali case lok sabha key issue for bjp print exp ssb
First published on: 23-02-2024 at 08:35 IST