विश्लेषण : आदिवासी आणि वनवासी शब्दावरून घमासान, राहुल गांधींचा आक्षेप आणि भाजपा-RSS चं स्पष्टीकरण काय?

आदिवासी आणि वनवासी या शब्दांचा इतिहास काय? आदिवासी आणि वनवासी या दोन शब्दांमधील फरक काय? हा वाद नेमका कधी सुरू झाला? राहुल गांधींचे आक्षेप काय? त्यावर भाजपा आणि संघाचं स्पष्टीकरण काय याचा हा खास आढावा…

Rahul Gandhi Mohan Bhagwat 3n
राहुल गांधी व सरसंघचालक मोहन भागवत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२१ नोव्हेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपाकडून आदिवासींसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘वनवासी’ या शब्दप्रयोगावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच भाजपा आणि संघ आदिवासी येथील प्रथम रहिवासी आहात हे मान्य करत नाही, असा आरोपही राहुल गांधींनी केला. यानंतर आदिवासी आणि वनवासी हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी आणि वनवासी या शब्दांचा इतिहास काय? आदिवासी आणि वनवासी या दोन शब्दांमधील फरक काय? हा वाद नेमका कधी सुरू झाला? राहुल गांधींचे आक्षेप काय? त्यावर भाजपा आणि संघाचं स्पष्टीकरण काय याचा हा खास आढावा…

राहुल गांधींचा नेमका आक्षेप काय?

राहुल गांधी महुआमध्ये आदिवासींना उद्देशून म्हणाले, “भाजपाचे लोक तुम्हाला आदिवासी म्हणत नाही. ते आदिवासींना वनवासी असं म्हणतात. तुम्ही भारताचे पहिले मालक आहेत असं ते तुम्हाला सांगत नाही. ते तुम्हाला सांगतात की, तुम्ही जंगलात राहतात. याचा अर्थ तुम्ही शहरात रहावं, तुमच्या मुलांनी डॉक्टर-इंजिनियर व्हावं, विमान चालवावं, इंग्रजी बोलावं असं भाजपाच्या लोकांना वाटत नाही.”

आदिवासी की वनवासी?

भारतीय संविधानात आदिवासींसाठी ‘अनुसुचित जमाती’ असा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. असं असलं तरी अनेक आदिवासी स्वतःला आदिवासी म्हणवून घेणं पसंत करतात. त्यांच्यामते आदिवासीचा अर्थ सर्वात पहिले रहिवासी असा आहे. आदिवासी हा शब्द अनेक वर्षांपासून सार्वजनिक संवादात, कागदपत्रांमध्ये, पुस्तकांमध्ये आणि माध्यमांमध्ये वापरला जातो.

वनवासी याचा अर्थ जंगलात राहणारे रहिवासी. वनवासी या शब्दाचा वापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संलग्न संस्था संघटनांकडून केला जातो. आदिवासी समुहाची बदलती संस्कृती आणि हिंदू धर्मापासून वाढतं अंतर असे मुद्दे उपस्थित करत संघाने हा शब्दप्रयोग वापरात आणला. रमाकांत देशपांडे यांनी दुसरे संघचालक माधव गोळवलकर यांच्याशी चर्चा करून २६ डिसेंबर १९५२ रोजी छत्तीसगडमधील जशपूर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची (ABVKA) स्थापना केली.

वनवासी कल्याण आश्रमाचा पहिला प्राधान्यक्रम आदिवासींना हिंदू धर्माचा भाग बनवणं हा आहे. हे करणं राष्ट्रीय एकतेसाठी आणि आदिवासींची वेगळी ओळख आणि संस्कृती जपण्यासाठी आवश्यक असल्याचं मत संघाकडून व्यक्त केलं जातं. विशेष म्हणजे आदिवासी भागातील वनवासी कल्याण आश्रमाच्या या कामाचा भाजपाला निवडणुकीत फायदा होतानाही दिसलं आहे.

वनवासी या शब्दप्रयोगावर RSS ची भूमिका काय?

वनवासी या शब्दप्रयोगावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना संघाचे नेते राम माधव म्हणाले, “आम्ही वनवासी असं म्हणतो. आम्ही त्यांना आदिवासी म्हणत नाही. कारण, त्याचा अर्थ ते मूळ रहिवासी आहेत आणि इतर सर्वजण बाहेरून आले आहेत असा होतो. संघाच्या मते आपण सर्वच जण मूळचे भारतातीलच आहोत.”

“आर्य बाहेरून आले आणि येथे स्थायिक झाले हा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही. आदिवासींसाठी भारतीय संविधानात वापरलेला अनुसुचित जमाती हा शब्दही संघाला मान्य आहे,” असंही राम माधव यांनी नमूद केलं.

वनवासी हा शब्दप्रयोग १९५२ मध्ये सुरू झाल्याची माहिती संघाचे नेते आणि राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाचे प्रमुख हर्ष चौहान यांनी दिली. तसेच जंगलात राहणाऱ्यांसाठी परंपरेनुसार वनवासी हाच शब्द वापरला जातो. आदिवासी शब्द ब्रिटिशांना आणला, असा दावा चौहान यांनी केला.

आदिवासी-वनवासी वादाचा इतिहास काय?

आदिवासींसाठी वनवासी शब्दप्रयोग वापरावरून याआधी अनेकांनी आदिवासी हे केवळ जंगलात राहत नाही, असा मुद्दा उपस्थित केला आहे. संविधान निर्मितीच्या वेळी संविधान सभेच्या चर्चांमध्ये हॉकी खेळाडू आणि आदिवासींचे संविधान सभेतील सदस्य जयपाल सिंग मुंडा यांनीही तेव्हा ‘आदिवासी’ शब्दप्रयोग वापरासाठी आग्रही भूमिका घेतली होती. तसेच संविधान सभेच्या चर्चा हिंदीत भाषांतरीत होताना भाषांतर समितीकडून ट्रायबल या इंग्रजी शब्दाचा होणाऱ्या ‘बनवासी’ या हिंदीतील अनुवादावर मुंडा यांनी तीव्र आक्षेप घेतले होते.

जयपाल सिंग मुंडा म्हणाले होते, “संविधान सभेच्या अनेक समित्यांकडून भाषांतर करताना आदिवासी या शब्दाचा वापर का केला जात नाही? आदिवासी हा शब्द न वापरता वनवासी हा शब्द का वापरला जात आहे? अनेक आदिवासी जंगलात राहत नाहीत, तरीही आदिवासी ऐवजी वनवासी असा शब्दप्रयोग का केला जातो?”

हेही वाचा : विश्लेषण : RSS चा गणवेश आणि खाकी हाफ पँट; काँग्रेसच्या ट्वीटनंतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु, नेमका काय आहे इतिहास?

“वनवासी या शब्दाचा अर्थ असंस्कृत आणि रानटी असा होता. असं असताना हा अपमानास्पद शब्दप्रयोग का केला जात आहे हे मला समजत नाही. संविधान सभेने भाषांतर समितीला अनुसुचित जातींसाठी आदिवासी हा शब्द वापरण्याबाबत सूचना द्याव्यात,” असंही जयपाल सिंग मुंडा यांनी नमूद केलं होतं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 11:00 IST
Next Story
विश्लेषण: सौदीविरुद्ध अर्जेंटिनाला अतिआत्मविश्वास भोवला का? बाद फेरीचा मार्ग किती खडतर?
Exit mobile version