सध्या बिग बॉसची सगळीकडेच चर्चा आहे. कोणता स्पर्धक टिकणार, कोण बाहेर पडणार, कोणाला बोलणी खावी लागणार, कोणाचं लफड कानावर पडणार आणि त्या बिग बॉसच्या घरातील अगणित गॉसिप्स आपल्या कानावर पडत असतात. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा कायम असते. सध्याच्या सीझनमध्ये साजिद खानच्या एंट्रीमुळे वातावरण चांगलंच तापलं आणि हा कार्यक्रम आणखी चर्चेत आला. हिंदी आणि मराठीसह हा शो इतरही भारताच्या प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होतो. सलमान खान, महेश मांजरेकर, कमल हासन, मोहनलाल, सूर्या असे मनोरंजनसृष्टीतील मातब्बर लोक या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. आज आपण याच कार्यक्रमाचा इतिहास जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात हा कार्यक्रम बिग बॉस नावाने प्रचलित आहे. या कार्यक्रमाचं मूळ नाव आहे ‘बिग ब्रदर’. नेदरलँड्समध्ये जॉन दे मोल यांनी सर्वप्रथम हा कार्यक्रम सुरू केला. ३ महीने काही स्पर्धक एका घरात एकत्र राहणार ही संकल्पना सगळ्यांसाठीच नवीन होती. पेन, पेपर, टीव्ही, मोबाइल, इंटरनेट, घडयाळ या सगळ्या सुखसुविधा नसतानाही हे स्पर्धक या घरात कसे टिकून राहतात याची परीक्षा घेणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग ब्रदर’. शिवाय दर आठवड्याला यातील एक खेळाडू घराबाहेर जाणार त्यामुळे हा खेळ अधिकच रंजक होत जातो.

आणखी वाचा : ‘वास्तव’च्या सेटवर संजय नार्वेकर यांना पायऱ्यांवर बसलेलं पाहून संजय दत्त म्हणाला…

याच काऱ्यक्रमाला भारतीय स्वरूप देऊन २००६ सोनी टीव्हीवर ‘बिग बॉस’ या नावाने आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रथम यात केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीजनाच सामील करून घेतलं जायचं, पण मग नंतर विविध क्षेत्रातील लोकांनाही यात स्पर्धक म्हणून घ्यायला सुरुवात झाली. पहिल्या सीझनचं सूत्रसंचालन अभिनेता अर्शद वारसी याने केलं, त्यानंतर शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, संजय दत्त यांनीही ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन केलं. अखेर गेली काही वर्षं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचं सूत्रसंचालन करत आहे.

सर्वप्रथम या कार्यक्रमाचे हक्क सोनीकडे होते, पण नंतर या कार्यक्रमाच्या रचनेत होत गेलेले बदल यामुळे शोचे निर्माते आणि सोनी टेलिव्हिजन यांच्यात काही कुरबुरी झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हा कार्यक्रम कलर्स टेलिव्हिजन या वाहिनीवरुन प्रसारित होऊ लागला. हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या ६ भाषांमध्ये हा कार्यक्रम सादर होतो. कार्यक्रमाची रचना आहे तशीच आहे केवळ प्रत्येक राज्यात दाखवले जाणार असल्याने काही छोटेसे बदल याच्या संकल्पनेत करण्यात आले आहेत.

आणखी वाचा : चित्रपटगृहापाठोपाठ ओटीटीवरही दाक्षिणात्य चित्रपटांची चलती; तेलुगू चित्रपट ‘बिंबिसार’ने रचला इतिहास

घरात राहणाऱ्या स्पर्धकांचा बाहेरच्या जगाशी संबंध पूर्णपणे बंद केलेला असतो आणि बिग बॉसच्या या घरातील खेळ सारा देश कॅमेराच्या माध्यमातून लाईव्ह बघत असतो. दर आठवड्याला वोटिंगच्या सहाय्याने एक स्पर्धक यातून बाहेर पडतो आणि जो शेवटपर्यंत या घरात टिकून राहील तो या कार्यक्रमाचा विजेता घोषित करण्यात येतो. बिग बॉस हा भारतातील एक वादग्रस्त कार्यक्रम आहे ज्याची सतत चर्चा होत असते, शिवाय TRP च्या शर्यतीत या कार्यक्रमाने सासू सुनेच्या मालिकांनाही केव्हाच मागे टाकलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is history and origin of bigg boss televsion reality show and why it is popular in india avn