जागतिक आरोग्य संघटनेने उच्च रक्तदाबाच्या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला असून, भारताबाबत अनेक धक्कादायक तथ्य या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. उच्च रक्तदाब असलेल्या निम्म्या लोकांनी जर आतापासून या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले तर २०४० पर्यंत भारताला किमान ४६ लाख मृत्यू टाळता येऊ शकतात, असे या अहवालात सांगितले गेले आहे. या अहवालानुसार भारतातील १८.८३ कोटी लोकं सध्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. मात्र, त्यातील फक्त ३७ टक्के लोकांनाच आजाराची कल्पना आहे. जगभरातील ३३ टक्के लोकसंख्या उच्च रक्तदाबाच्या विळख्यात अडकली आहे. त्यापैकी फक्त निम्म्या लोकांना उपचार मिळत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी या अहवालासंबंधी माहिती देताना सांगितले, “उच्च रक्तदाब खूपच हानिकारक आहे. जगभरात हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार मृत्यूचे प्रमुख कारण बनत आहे. मलाही उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यामुळे हा आजार किती धोकादायक आहे, हे मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. मी नशीबवान आहे की, वेळीच या आजाराचे निदान झाले आणि मला योग्य व उत्तम उपचार मिळत आहेत. मात्र, दुर्दैवाने जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना उच्च रक्तदाब आहे, याचीच माहिती नसल्यामुळे ते उपचारापासून दूर आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाब हा बेमालूमपणे मृत्यूस (सायलंट किलर) कारणीभूत ठरत आहे.”

हे वाचा >> High Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ सवयी करतात मदत

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उच्च रक्तदाबाच्या प्रश्नावर काम करत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. याचे निदान होण्यापासून त्यावर उपचार आणि यशस्वीरित्या नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक आव्हाने उभी राहतात, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने आपल्या लेखात दिली आहे.

अहवालाने कोणता धोक्याचा इशारा दिला?

अहवालातील आकडेवारीनुसार भारतात १८.८३ कोटी लोकांना उच्च रक्तदाबाने ग्रासलेले असून त्यापैकी केवळ ३७ टक्के लोकांमध्ये रोगाचे निदान झाले आहे. यातही निदान झालेल्या अनेक लोकांनी अद्याप उपचार घेण्यास सुरुवात केलेली नाही. यापैकी केवळ ३० टक्के लोकांनी उच्च रक्तदाबावर उपचार घेण्यास सुरुवात केली आहे; तर १५ टक्के लोकांना उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता आले आहे.

देशात अनियंत्रित उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या प्रौढांची संख्या घसरत असली तरी ही बाब फारशी दिलासादायक नसल्याचे अहवालाने नमूद केले आहे. उच्च रक्तदाबाने ग्रासलेल्या ज्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, त्यापैकी निम्मे रुग्ण हे उच्च रक्तदाबाच्या प्राथमिक टप्प्यात आहेत. जर भारताने योग्य प्रयत्न केले, तर देशाला हृदयविकार आणि स्ट्रोकमुळे होणारे ४६ लाख मृत्यू रोखता येणार आहेत. डब्लूएचओच्या अहवालानुसार, भारतात अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार बळावतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण ५२ टक्के एवढे आहे. जर भारताने महत्त्वाकांक्षा बाळगून उच्च रक्तदाबावर ७५ टक्क्यांपर्यंत नियंत्रण मिळवले तर बरेच मृत्यू रोखता येऊ शकतील.

चेन्नईच्या डॉ. मोहन डायबिटिज स्पेशालिटी सेंटरचे डॉ. व्ही. मोहन यांनी याबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले असून त्यांची माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. ते म्हणाले, “कोणत्याही देशात एकूण लोकसंख्येपैकी उच्च रक्तदाब असलेल्या निम्म्याच लोकांचे निदान होत असते. निदान झालेल्या रुग्णांपैकी अर्ध्याच लोकांना उपचार मिळतात. जे रुग्ण उपचार घेतात, त्यातील अर्ध्याच लोकांना रक्तदाब नियंत्रणात आणण्यात यश मिळते. काही विकसित देशांमध्ये, संपूर्ण लोकसंख्येची आरोग्य तपासणी केली जाते आणि उपचारही मोफत दिले जातात, त्या देशात हे प्रमाण निम्म्यापेक्षा चांगले असू शकते. तसेच कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जसे की, या अहवालात भारताचा उल्लेख केला आहे. भारतासारख्या देशात हे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी आहे.”

हे वाचा >> High BP: ‘या’ चुकांमुळे कमी वयातच होतो रक्तदाबाचा आजार; लक्षणे दिसताच त्वरीत सावध व्हा

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या आणि औषधांवर भर का?

उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, ही डॉक्टरांच्या समोरची सर्वात महत्त्वाची चिंता आहे. तसेच, अनियंत्रित उच्च रक्तदाब अनेक वर्षांपासून असेल तर केवळ हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकच येत नाही, तर त्यामुळे हृदय आणि मूत्रपिंडाचे न भरून येणारे नुकसानही होऊ शकते.

नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) हृदयरोग तज्ज्ञ (cardiology) विभागाचे प्राध्यापक डॉ. राकेश यादव यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, अनेकदा रुग्ण जेव्हा इतर आजारावरील उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात, तेव्हा चाचण्यांनंतर किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यानंतरच त्यांना उच्च रक्तदाब असल्याचे निष्पन्न होते. चिंताजनक बाब अशी की, निदान झाल्यानंतरही रुग्ण औषध घेण्यासाठी टाळाटाळ करतात. लोकांना वाटते की, ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. मात्र, उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आहे. जोपर्यंत अधिक गुंतागुंतीचे गंभीर परिणाम समोर येत नाहीत, तोपर्यंत याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

डॉ. मोहन म्हणाले की, काही लोक तर आरोग्य तपासणी शिबिरालाही येत नाहीत. त्यांना वाटते की ते पूर्णपणे ठीक आहेत. डॉ. यादव यांनी सुचविले की, विसाव्या आणि तिसाव्या वर्षांच्या उंबरठ्यावर दर दहा वर्षांतून एकदा उच्च रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे. जेव्हा ५० वय ओलांडले जाईल, तेव्हा दर पाच वर्षांनी तपासणी करायला हवी.

उपचार सुरू ठेवणे महत्त्वाचे का?

उच्च रक्तदाब होऊ नये यासाठी जीवनशैलीत बदल करायला हवेत. आरोग्यदायी आहार घेणे, मीठाचे प्रमाण कमी करणे, धुम्रपान आणि मद्यपान न करणे, शारीरिक हालचाली वाढविणे, तणाव कमी करणे आणि पुरेशी झोप घेणे यांसारखे बदल करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांना निदान झाले आहे, त्यांनी नियमित औषधे घेणे सुरू केले पाहिजे.

आपल्या देशात उच्च रक्तदाबावरील औषधे सहज उपलब्ध होतात, तसेच ती फारशी महागडीही नाहीत. हे उपचार कदाचित आयुष्यभर घेण्याची गरज भासू शकते. तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जे रुग्ण उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत, त्यांनी त्यांच्या डॉक्टरकडे वर्षातून किमान तीन ते चार वेळा पाठपुरावा करण्यासाठी गेले पाहिजे. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी औषधांचे प्रमाण किती असावे, हे ठरविण्यासाठी मदत होईल.

डॉ. यादव म्हणाले, “जर एखाद्याला उच्च रक्तदाबाचे निदान झाले असेल, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणे सुरू केले पाहिजे. भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी हे आवश्यक आहे. प्रकृतीत सुधारणा होत आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नियमित घेणेही गरजेचे आहे.” डॉ. यादव आणि डॉ. मोहन या दोघांनीही सांगितले की, पाठपुराव्यासाठी आलेले रुग्ण इलेक्ट्रॉनिक बीपी यंत्राद्वारे त्यांच्या रक्तदाबाच्या पातळीचे मोजमाप स्वतःच करू शकतात.

आणखी वाचा >> BP Control Tips: रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी करा ‘हे’ ५ नैसर्गिक उपाय

डॉ. मोहन म्हणाले की, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठ कमी करणे हा सर्वात सोपा उपाय आहे, ज्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने दिवसातून केवळ दोन ग्रॅम मीठ आहारात घेण्याची शिफारस केली आहे. मात्र, अहवालात असे दिसून आले की, भारतीय नागरिक एका दिवसात सरासरी १० ग्रॅम मीठाचे विविध पदार्थांच्या माध्यमातून सेवन करतात. भारतातील ३४ टक्के लोक शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय म्हणजे फार हालचाल करत नाहीत, चार टक्के लोक लठ्ठ आहेत आणि २८ टक्के लोक धूम्रपान करतात किंवा तंबाखूचे सेवन करतात, अशीही आकडेवारी अहवालातून देण्यात आली आहे.

इंडिया हाइपरटेंशन कंट्रोल इनिशिएटिव काय करते?

देशातील लोकांमध्ये उच्च रक्तदाबानिमित्त जागृती करणे आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि जागतिक आरोग्य संघटना, भारत आणि राज्य सरकारांच्या वतीने इंडिया हाइपरटेंशन कंट्रोल इनिशिएटिव (IHCI) ही पंचवार्षिक पुढाकार योजना हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांची आरोग्य तपासणी करणे, ठरवून दिलेल्या मानकानुसार उपचार आणि औषधे पुरवून उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यावर लक्ष केंद्रित करणे, असे IHCI ने उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच २०२५ पर्यंत उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असलेल्या ७५ दशलक्ष रुग्णांची काळजी घेण्याचेही उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

IHCI ने यापूर्वीच २७ राज्यांमधील ५.८ दशलक्ष उच्च रक्तदाब असलेल्या लोकांची नोंदणी केली आहे. मात्र, उच्च रक्तदाबाशी संबंधित औषधे वेळेवर खरेदी न केल्यामुळे या उपक्रमाकडे रुग्ण पाठ फिरवत असून आता उपचार केंद्राकडे रुग्ण फिरकत नसल्याची गंभीर बाब जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात नमूद केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What the who report on hypertension says about india how to prevent 4 6 million deaths due to heart attacks kvg