मंगल हनवते

मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असणारी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ ही मार्गिका सुरुवातीपासूनच तोट्यात आहे. आधी बांधकाम खर्च वाढल्याने आणि नंतर अपेक्षित प्रवासीसंख्या न मिळाल्याने मेट्रो १ चा तोटा वाढू लागला. आता मेट्रो १ चे संचलन करणारी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनी अडचणीत आली आहे. या कंपनीविरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाने दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. पण एमएमओपीएवर दिवाळखोरीची वेळ का आली, मेट्रो १ मार्गिका तोट्यात का आहे, आणि आता पुढे काय होणार, याचा आढावा…

मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका…

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ३३७ किमीचा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात एकूण १४ मेट्रो मार्गिकांचा समावेश असून त्यातील पहिली मेट्रो मार्गिका मुंबईत सुरू करण्यात आली. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी ही मार्गिका असून त्याची उभारणी रिलायन्स उद्योग समूहाकडून रिलायन्स इन्फ्राच्या माध्यमातून करण्यात आली. रिलायन्स इन्फ्राने मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून २००७-०८ मध्ये मेट्रो १ च्या कामास सुरुवात केली. एमएमओपीएल हा रिलायन्स इन्फ्रा आणि एमएमआरडीएचा संयुक्त उपक्रम आहे. त्याच कंपनीच्या माध्यमातून मेट्रो १ चे संचलन केले जाते.

मेट्रो १ मार्गिका वाहतूक सेवेत कधीपासून?

मेट्रो १ चे कंत्राट एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्राला दिले. त्यानुसार रिलायन्स इन्फ्राने एमएमओपीएलच्या माध्यमातून कामास सुरुवात केली. २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तर ११.४ किमीची आणि १२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली ही मार्गिका ८ जून २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली. या मार्गिकेच्या माध्यमातून मुंबईत पहिली मेट्रो धावू लागली आहे. या मार्गिकेमुळे पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरात कमी वेळात पोहोचणे शक्य होऊ लागले. लोकलच्या गर्दीतून अनेकांची सुटका झाली.

पण मग अजूनही अपेक्षित प्रतिसाद का नाही?

मुंबईकरांना पंचतारांकित आणि जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रो प्रकल्प आणण्यात आला. लोकलवरील ताण कमी करणे हा मेट्रो प्रकल्पाचा मुख्य उद्देश मानला जात आहे. मात्र मेट्रो १ मार्गिका सेवेत दाखल होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही या मार्गिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. या मार्गिकेच्या आराखड्यानुसार २०२१ पर्यंत दिवसाला ६ लाख ६५ हजार प्रवासी प्रवास करतील असा दावा केला जात होता. तर २०३१ पर्यंत दिवसाला ८ लाख ८३ प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करतील असा अंदाज आहे. पण प्रत्यक्षात मेट्रो १ नऊ वर्षे झाली तरी २०२१ पर्यंतची दैनंदिन ६ लाख ६५ हजारांची प्रवासीसंख्या गाठू शकलेली नाही. आज मेट्रो १ मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या अंदाजे ३ लाख २५ हजार ते तीन लाख ४० हजारांच्या घरात आहे. म्हणजेच अपेक्षित प्रवासी संख्येच्या तुलनेत ५० टक्के प्रवासीही मेट्रोचा वापर करत नसल्याचे दिसते आहे.

मेट्रो १ तोट्यात का?

घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिका ही मुंबईतील पहिला मार्गिका असल्याने तिला खूप चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज होता. त्यानुसार मुंबईकर या मेट्रोतून प्रवास करत आहेत. पण दैनंदिन अपेक्षित प्रवासी संख्येचे लक्ष्य अद्यापही एमएमओपीएल गाठू शकलेले नाही. त्यामुळे ही मार्गिका तोट्यात आहे. या मार्गिकेच्या बांधकामासाठी २ हजार ३५६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता आणि त्यानुसारच या कामाचे कंत्राट एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्राला दिले होते. मात्र अनेक कारणाने कामास विलंब झाला. परिणामी २ हजार ३५६ कोटींचा खर्च थेट ४ हजार ३२१ कोटी रुपयांवर गेला. बांधकाम खर्चातील वाढ आणि मार्गिकेला म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने मेट्रो १ सेवेत दाखल झाल्यापासूनच तोट्यात आहे. अशात वाढीव बांधकाम खर्चाची रक्कम वसूल करण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी एमएमओपीएल न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण त्यात त्यांना यश आले नाही.

एमएमआरडीए मार्गिका ताब्यात घेणार?

वाढीव बांधकाम खर्च वसूल होऊ शकत नसल्याने आणि मार्गिका तोट्यात असल्याने एमएमओपीएल अडचणीत आहे. त्यामुळे या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी रिलायन्स इन्फ्राने मेट्रो १ मार्गिका एमएमआरडीएने ताब्यात घ्यावी अशी विनंती केली आहे. मुळात एमएमओपीएल हा रिलायन्स इन्फ्रा आणि एमएमआरडीएचा संयुक्त उपक्रम आहे. त्यात मेट्रो १ ची ७६ टक्के हिस्सेदारी एमएमओपीएलकडे तर २४ टक्के हिस्सेदारी एमएमआरडीएकडे आहे. त्यामुळे एमएमआरडीएनेच ही मार्गिका ताब्यात घ्यावी अशी विनंती एमएमओपीएलने केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने ही मार्गिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने २०२१ मध्ये सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र याविषयी अद्याप पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

एमएमओपीएलविरोधात दिवाळखोरीची याचिका…

एमएमओपीएलविरोधात स्टेट बँक आँफ इंडियाने दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. एमएमओपीएलने एसबीआयसह कँनरा बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि अन्य काही बँकाकडून कर्ज घेतले आहे. मात्र कर्जाची परतफेड केली जात नसल्याचे नमूद करून, ४१६.०८ कोटींची थकबाकी असल्याचे म्हणत एसबीआयने एमएमओपीएलविरोधात दिवाळखोरीचा याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे एमएमओपीएलच्या अडचणी वाढल्या आहेत.

मेट्रो १ चे पुढे काय होणार?

एमएमओपीएलविरोधात थेट दिवाळखोरीची याचिका दाखल झाल्याने आता मेट्रो १ मार्गिकेचे पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही मार्गिका वित्तसंस्थेच्या ताब्यात जाणार का, मेट्रो १ मार्गिका बंद पडणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र मेट्रो १ मार्गिका कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार ही मार्गिका एमएमआरडीएच ताब्यात घेण्याची शक्यता आहे.