पालघर: गणेशोत्सव आणि गौरी उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी पालघर जिल्ह्यांतून कोकणाकडे ६५५ जादा बससेवा सुरू करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट पासून सोडण्यात येत असलेल्या या विशेष नियोजित बससेवेमुळे कोकणवासियांना गावी जाणे अधिक सुलभ झाले आहे.

एसटी परिवहन महामंडळाकडून पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीकरिता या जादा बससेवांचे नियोजन २३ ऑगस्टपासून सुरू झाले असून २६ ऑगस्टपर्यंत या बसेस कोकणाकडे धावणार आहेत. या चार दिवसांच्या नियोजनानुसार,२३ ऑगस्ट रोजी ८८, २४ ऑगस्ट रोजी २८५, २५ ऑगस्ट रोजी १७६, तर २६ ऑगस्ट रोजी १८ बसेस कोकणाकडे रवाना होणार आहेत. विरार, मानवेल पाडा, नालासोपारा, नवघर आणि वसई अर्नाळा येथून या बसेस सुटत आहेत, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी विभागण्यास मदत झाली आहे.

या विशेष बससेवेमुळे पालघर एसटी विभागाला गणेशोत्सवाच्या काळात सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. या नियोजनामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला असून गावी जाऊन सण साजरा करण्याचा आनंद त्यांना मिळाला आहे. हे विशेष नियोजन यशस्वी करण्यासाठी एसटी महामंडळाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

इतर विभागाकडून बसेसची मागणी

पालघर विभागाकडे कोकणात जाण्यासाठी 158 बसचे नियोजन करण्यात आले होते. या व्यतिरिक्त प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या विशेष सेवेसाठी पालघर विभागाने इतर विभागांकडून अतिरिक्त बसेस मागवल्या आहेत. यात रत्नागिरी विभागातून ९९, अमरावती प्रदेशातून १७३ आणि नागपूर प्रदेशातून १५० बसेसचा समावेश आहे. एकूण ६५५ बसेस कोकणाकडे धावणार आहेत. या बसेसचे आगाऊ बुकिंग पूर्ण झाले असून जवळपास २६ हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.