कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली वाघनखे आणि अन्य मराठाकालीन शस्त्रांचे ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ हे प्रदर्शन येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचा मंगळवारी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या प्रदर्शनामध्ये लंडन येथील ‘ व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट ‘ संग्रहालयातून करार तत्वावर आणलेली वाघनखे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ‘ऑनलाईन’ उपस्थिती लावून केले. ज्येष्ठ अभिनेते गंगाराम गव्हाणकर यांचे निधन आणि कॅबिनेटची बैठक यामुळे आपण प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगत मंत्री शेलार यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच, लवकरच या प्रदर्शन स्थळी उपस्थित राहू, असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
या वेळी शेलार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम जगासमोर यावा यासाठी राज्य शासनायावतीने या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यासाठी इंग्लंड मधील व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाशी करार केला आहे. या संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली वाघनखे आणली आहेत. त्याचे प्रदर्शन यापूर्वी सातारा , नागपूर येथे करण्यात आले आहे. आता ते कोल्हापूरकरांना पहावयाला मिळत आहे. आपला देश आणि महाराष्ट्राचा पराक्रमी इतिहास लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे असेही शेलार या वेळी म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाच्या जोडीलाच निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करावे. पोलीस अधीक्षकांनी व्याख्याने, चर्चासत्राचे आयोजन करावे. या कामी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी मार्गदर्शन करावे. हे सर्व उपक्रम पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली व्हावेत, अशी अपेक्षाही शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणारी वाघनखे प्रत्यक्ष पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळत आहे ही मनस्वी आनंद देणारी घटना असल्याचा उल्लेख केला.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयेन एस. उपस्थित होते. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी स्वागत केले.
लोकप्रतिनिधींची पाठ
दरम्यान पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाकडे जिल्ह्यातील मंत्री, दोन खासदार, सत्तारूढ तसेच विरोधी ११ आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
खासदार शाहू महाराज, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक वगळता एकही प्रमुख नागरिक या प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित नव्हते. एका शाळेतील मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाला सुरुवात झाली. हे विद्यार्थी गेल्यानंतर मोकळे पडलेले प्रदर्शन नजरेत ठळकपणे खटकत होते.
